आपण मारुती-800, अल्टो-800, होंडा CD-100 अशी नावे सर्रास वापरतो आणि गम्मत म्हणजे ती सगळ्यांना कळतात. या वाहनाच्या नावापुढे असलेले हे आकडे आपल्याला नक्की काय माहिती देतात ते आपण आज पाहू या.

मोटारीच्या किंवा कोणत्याही अंतज्र्वलन इंजिनामध्ये एक किंवा एकाहून अधिक नळकांडी म्हणजेच सिलिंडर असतात. या सिलिंडरमध्ये मागेपुढे किंवा वरखाली करणारा एक दट्टय़ा असतो. दट्टय़ा जेव्हा खाली जातो तेव्हा आत पोकळी निर्माण होऊन बाहेरची हवा आत खेचून घेतली जाते. खाली जाता जाता हा दट्टय़ा एका नीचतम बिंदूला पोहोचतो. त्यानंतर तो वर जायला लागतो आणि सिलिंडरमधील हवा दाबली जाऊ लागते. वर जाता जाता हा दट्टय़ा एका उच्चतम बिंदूला पोहोचतो. या वेळी सिलिंडरमध्ये इंधनाचे ज्वलन होऊन ऊर्जा निर्माण होते. या दाबामुळे दट्टय़ा पुन्हा खाली जायला सुरुवात होते.

सतत पुनरावृत्ती होणाऱ्या या क्रियेत प्रत्येक सिलिंडरमधील दट्टय़ा नीचतम बिंदूपासून उच्चतम बिंदूपर्यंत प्रवास करीत असतो. या अंतराला इंजिनाची धाव (Stroke) म्हणतात. इंजिनातल्या सिलिंडरांची संख्या, सिलिंडरचा व्यास आणि ही धाव यांच्यापासून इंजिनाचे विस्थापन घनफळ (Displacement Volume) पुढील सूत्राने काढता येते : या विस्थापन घनफळाचे मूल्य बहुधा घनसेंटिमीटरमध्ये लिहितात किंवा कधी कधी लिटरमध्ये लिहितात.

अल्टोसाठी जर आपण हे मूल्य काढले तर, ते येते ७९६ घनसेंटिमीटर. त्याच्या सर्वात जवळचा पूर्णाक म्हणजे ८००. म्हणून मोटारगाडीच्या या मॉडेलचे नाव आहे अल्टो 800. होंडाच्या दुचाकीचे जर आपण विस्थापन घनफळ काढले तर ते येते ९७ घनसेंटिमीटर. म्हणून या दुचाकीच्या मॉडेलचे नाव होंडा CD-100. इंजिनाची शक्ती आणि विस्थापन घनफळ यांचा एकमेकांशी समप्रमाणात संबंध असतो. पण समान विस्थापन घनफळाच्या दोन वेगळ्या मॉडेलच्या मोटारी समान शक्ती देतील, असे मात्र नाही. कारण इंजिनापासून निर्माण होणारी शक्ती ही झडपांचे चालन, इंजिनाचे मेलन (tuning) इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

बऱ्याचशा देशांमध्ये मोटारींवरील कर हा तिच्या इंजिनाच्या विस्थापन घनफळानुसार लावला जातो, म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. हल्ली मात्र काही देशांमध्ये हा कर त्या मोटारींमुळे होणाऱ्या प्रदूषणानुसार लावला जातो. जेवढे प्रदूषण जास्त तेवढा कर जास्त.

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

राजेंद्र शाह यांची काव्य – वैशिष्टय़े

निसर्ग, अध्यात्म, प्रेमभावना, शृंगार, विरह तसेच स्वत:च्या भावजीवनातील अनुभूती आणि लोकसाहित्यात रुजलेल्या संस्कृतीचे प्रवाहीपण राजेंद्र शाह यांच्या गीतामधून दिसते. त्यांनी काव्याचे विविध प्रकार हाताळले आहेत. विशेषत: गीत आणि सुनीत (सॉनेट) यांसारख्या कविता, छंदोबद्ध कविता आणि लोकांच्या ओठावर राहतील अशा गीतरचनाही त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कवितांचा सर्जनशील प्रवास गुजराती वाचकांनी रसिकतेने आणि स्वत:च्या सुख-दु:खाशी जोडून घेत अनुभवला आहे. हिन्दी आणि मराठीतील स्वैर रूपांतरामुळे इतर भाषकांनीही आस्वाद घेतला आहे. . बंगालीबरोबरच ब्रज भाषेतील, राजस्थानी भाषेतील कवितांचा प्रभाव त्यांच्या गीतरचनांवर दिसतो. निरंजन भगत यांच्याशी मैत्री झाल्यावर इंग्रजी कवितांचेही त्यांनी अध्ययन केले. त्याचाही परिणाम त्यांच्या लेखनावर झाला आहे.

स्त्रीजीवनावरील गीतातही किती विविधता आहे. प्रेमाच्या विविध छटा, ग्रामीण स्त्रीचे प्रेम बोलीभाषेत व्यक्त केले आहे. काही भजन स्वरूपातील गीतांमध्ये योगाची परिभाषा जाणवते. विशेषत: शाक्त संप्रदायाचा प्रभाव दिसतो. ‘अकेला’ कवितेत ते म्हणतात-

‘घर को छोडकर जानेवाले को मिलती

विशालता विश्व की

पीछे अकेले छुटनेवाले को

निगलती शून्यता घर की।’

किंवा

‘सरकते युग के से पल

लगते सिर्फ खाली

हृदय में जडम पल नन्हा सा

स्मृती से भरा भरा’

अशा प्रकारे त्यांच्या कवितेत तत्त्वज्ञान स्वानुभवाच्या रूपात व्यक्त होताना दिसते. नरसी मेहता, कबीर यांच्या प्रभावामुळे त्यांच्या कवितेत रहस्यवादाचा स्वरही दिसतो. राजेंद्रजी योगमार्गाकडे वळले आणि कबीराप्रमाणे योगिक अनुभूतीवर कविता केल्या. उतारवयात ‘हूं तो इंधणा वीणवा गई ती’ यासारखी त्यांची लोकगीतेही प्रसिद्ध आहेत. एखाद्या अमूर्त विषयावर आयुष्यभर अत्यंत प्रभावशाली, चैतन्यपूर्ण काव्य लिहिणे राजेंद्रजींसारख्या प्रतिभाशाली कवीलाच शक्य आहे. नवी सृष्टी, नव्या रूपात व्यक्त करणारी त्यांची कविता म्हणूनच रसिकप्रिय, वाचकप्रिय आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com