डॉ. त्रिलोक नाथ खोशू यांचे शिक्षण-योगदान कार्य फार लवकर सुरू झाले. लाहोरच्या पंजाब विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभाग सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. फाळणीनंतर ते खालसा महाविद्यालय, अमृतसर येथे रुजू झाले. जम्मू-काश्मीर विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्रमुख म्हणून थोडय़ा काळासाठी कार्य केल्यावर ते  १९६७ मध्ये लखनौच्या राष्ट्रीय वनस्पती उद्यानाचे साहाय्यक संचालक झाले आणि पुढे त्याच संस्थेचे संचालक झाले. योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी त्या उद्यानाचे १९७८ मध्ये राष्ट्रीय वनस्पतिशास्त्र संशोधन संस्थेत रूपांतर केले.

केंद्र सरकारने १९८२ मध्ये पर्यावरण विभाग सुरू केल्यावर डॉ. खोशू पहिले सचिव म्हणून नेमले गेले, देशासाठी पर्यावरण धोरण तयार करण्याचे कार्य त्यांच्याकडे होते. या वेळी त्यांच्या पुढाकाराने देशात निरनिराळ्या विद्यापीठांतून आणि संशोधन संस्थांतून पर्यावरण समस्या अभ्यासून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी अनेक प्रकल्प आखले गेले. त्यांपकी एक महत्त्वाचा प्रकल्प, वायुप्रदूषण आणि वनस्पती देशातील ७ संशोधन केंद्रांत राबवला गेला होता आणि त्या प्रकल्पाच्या समन्वयाचे कार्य मुंबईच्या विज्ञान संस्थेतून सदर लेखकाने केले होते.

डॉ. खोशू टेरी (दि एनर्जी रिसर्च इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली) येथे ‘प्रतिष्ठित फेलो’ म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणविषयक सामाजिक धोरणावर चर्चा घडवण्याचे कार्य करीत असत.  डॉ. खोशू यांना भारत सरकारने १९९२ मध्ये पद्मभूषण देऊन गौरवले. प्रतिष्ठेचा युनेपचा (राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम)  ‘सासाकावा पर्यावरण’ सन्मान त्यांना १९९६ मध्ये देण्यात आला.

वनस्पती जनुकविज्ञान, उत्क्रांती, ऊर्जा, वनसंरक्षणशास्त्र, जैववैविध्य आणि तिचे जतन व उपयोग, निसर्गस्रोतांचे संगोपन इत्यादी विषयांत २५० वर शोधनिबंध व लेख, ७ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत आणि आणखी १० पुस्तकांचे संपादन केले आहे. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही डॉ. खोशू चच्रेसाठी सहज उपलब्ध असत. त्यांचा हसतमुख, उत्साही स्वभाव प्रभावी असे. त्यांनी लिहिलेल्या एका अतिशय गाजलेल्या पुस्तकाचे शीर्षक पाहून त्यांच्या चतुरस्र विचार करण्याची कल्पना यावी. ते पुस्तक-    Mahatma Gandhi : An Apostle of Applied Human Ecology”, १९९६.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अलेक्झांड्रियातील सत्तांतरे

राणी क्लिओपात्रा सातवी हिच्या मृत्यूनंतर इ.स.पूर्व ३० ते इ.स. १४ या काळात इजिप्तमध्ये रोमन राजवटीचे सरकार आले. त्यापूर्वी इ.स.पूर्व ८० पासूनच अलेक्झांड्रिया हे रोमन प्रभावाखाली होते. सम्राट ऑगस्टसने ज्या महिन्याच्या एक तारखेला संपूर्ण इजिप्त रोमन साम्राज्यात सामील केले त्या महिन्याचे नाव ऑगस्टसच्या गौरवार्थ ऑगस्ट झाले! पुढे अलेक्झांड्रिया बायझन्टाइन अंमलाखाली आले. २१ जुल ३६५ रोजी क्रीट बेटावर झालेल्या भूकंपानंतर आलेल्या प्रचंड त्सुनामीने अलेक्झांड्रिया शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त होऊन मनुष्यहानी झाली. त्या घटनेला आता सतराशे वष्रे होत आलीत, पण दरवर्षी २१ जुल रोजी त्या स्मरणार्थ ‘डे ऑफ हॉरर’ पाळला जातो. इ.स. ६४१ मध्ये अरब मुस्लिमांनी काढलेल्या मोहिमेत १४ महिन्यांच्या वेढय़ानंतर अलेक्झांड्रियावर अरब सत्ता स्थापन झाली. अलेक्झांड्रियाचे नाव त्यांनी बदलून ‘इस्कंदरीयाह’ असे अरब शैलीप्रमाणे केले. पण अरबांनी लवकरच आपली राजधानी अलेक्झांड्रियाहून फुसात येथे नेली. पुढच्या काळात इ.स. ६४५, ६४६ मध्ये अलेक्झांड्रिया परत थोडय़ा काळाकरिता बायझंटाइन सत्तेकडे तर ८११ ते ८२७ या काळात ते स्पॅनिश चाच्यांच्या ताब्यात गेले. ९५६, १३०३ आणि १३२३ या वर्षांमध्ये भूकंपाच्या प्रचंड धक्क्यांनी या शहराची बसलेली घडी मोडली. सततच्या सत्तांतरात अलेक्झांड्रिया इ.स. १७९८ ते १८०१ या काळात नेपोलियनच्या अमलाखाली होते. १८०१ साली ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झालेल्या बॅटल ऑफ अलेक्झांड्रियात ते फ्रेंचांकडून ब्रिटिशांकडे आले. पुढे ओटोमान तुर्काकडे इजिप्तचे राज्य गेल्यावर त्यांचा गव्हर्नर मुहम्मद अलीने नाइल नदीतून महमूदिया कालवा काढल्यावर शहरासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी मिळाले. त्यायोगे शहराची भरभराट होऊन ते इजिप्तची उन्हाळी राजधानी झाले. १८४० साली अलेक्झांड्रियाची लोकसंख्या साठ हजारांवर पोहोचली. १९५४ साली हे शहर इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांचे लक्ष्य झाले. तसेच त्याच वर्षी शहरातल्या मन्शीया चौकात इजिप्तचे अध्यक्ष नासेर यांच्यावर खुनी हल्ला झाला. त्यातून ते बचावले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com