स्वतंत्र इस्रायलची घोषणा (१९४७ साली) केल्यावर इस्रायलने विस्तारवादी धोरण स्वीकारले. परंतु त्यांना जेरुसलेम शहरावर ताबा मिळवता आला नाही. १९६७ च्या युद्धामध्ये इस्रायलने जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या उर्वरित जेरुसलेमचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी जेरुसलेमच्या ज्यूकरणाची मोहीम तीव्र केली. अरबांच्या वस्तीच्या भोवतालच्या जमिनी ताब्यात घेऊन तिथे मोठय़ा प्रमाणात घरबांधणी प्रकल्प राबविले. अरबांची संख्या वाढू नये म्हणून इस्रायली शासन नेहमी प्रयत्नशील असते. त्यांना घरबांधणीसाठी मर्यादित चटई निर्देशांक देण्यात आला. पूर्व जेरुसलेममध्ये जेथे अरबांची वस्ती आहे तेथे चार मजल्यांहून उंच इमारती बांधता येत नाहीत. त्यांना नाममात्र नागरी सुविधा पुरविण्यात येतात. पश्चिम जेरुसलेममधील ज्यू वस्त्यांमधील रस्ते रुंद आणि सरळसोट आहेत तर अरब वस्तीतील रस्ते मुद्दाम निमुळते आणि नागमोडी वळणाचे केलेले आहेत. संघर्षांच्या वेळी त्यांना दळणवळणात अडथळे यावेत म्हणून हे सर्व! १९६७ सालच्या युद्धातील विजयानंतर जेरुसलेम नगर प्रशासनाने पूर्व शहरातील अरब नगरपालिका बरखास्त केली. पूर्व भागातील अरबांना नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्कआहे. परंतु देशाच्या केंद्रीय विधिमंडळासाठी त्यांना मतदान करता येत नाही, त्यांना इस्रायली नागरिकत्व नाकारण्यात आले आहे. पूर्व जेरुसलेमच्या अरब नागरिकांना परदेशी जाण्यासाठी इस्रायल सरकारकडून विशिष्ट प्रकारचा परवाना काढावा लागतो. असा परवाना घेऊन अरब व्यक्ती सहा वर्षांहून अधिक काळ परदेशात राहू शकत नाही. त्याहून अधिक काळ राहिल्यास त्या व्यक्तीची जंगम मालमत्ता जप्त केली जाते आणि परत जेरुसलेममध्ये प्रवेशाला परवानगी मिळत नाही. सध्या सव्वाआठ लक्ष लोकवस्तीच्या जेरुसलेम शहरात ७६ टक्के ज्यू धर्मीय, २१ टक्के इस्लाम धर्मीय अरब, दोन टक्के ख्रिश्चन आणि एक टक्का लोकांनी आपला धर्म जाहीर केलेला नाही. जेरुसलेम शहरात १२०४ सिनेगॉग म्हणजे ज्यू प्रार्थना मंदिरे, ७३ मशिदी आणि १५८ चर्च आहेत.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

महाराष्ट्र निसर्ग उद्यान

पुस्तकी शिक्षणाऐवजी प्रत्यक्ष अनुभवातून निसर्ग शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधेच्या स्वरूपात देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेद्वारा मुंबईतील धारावी येथे महाराष्ट्र  निसर्ग उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. निसर्ग शिक्षण हाच हेतू असलेले असे हे भारतातील एकमात्र उद्यान आहे, शहराच्या क्षेपणभूमीवर (कचरा टाकण्यासाठी निश्चित केलेली जागा) निर्मित असे हे एकमेव उद्यान. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी आंबा, वड, िपपळ, उंबर व फणस या पक्ष्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाच्या पाच वृक्षांचे रोपण करून या उद्यानाच्या निर्मितीला सन १९८४ साली सुरुवात केली.

आज सुमारे १४ हेक्टर परिसरावर पसरलेल्या या उद्यानात सुमारे २२ हजार इतके विविध प्रकारचे वृक्ष आहेत. जवळपास १५८ प्रकारची फुलपाखरे आणि ३२हून अधिक प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. भारतातील सर्वात विषारी नाग, मण्यार, फुरसे, याशिवाय अजगर, धामण, हरणटोळ असे बिनविषारी साप, अशा अनेक प्रकारच्या जैवविविधतेचा समावेश आहे. उद्यानातील वनस्पती सृष्टीमध्ये जवळपास ३००हून अधिक प्रकारच्या औषधी वनस्पती, नानाविध दुर्मीळ वृक्ष, कुमुदिनी, सात प्रकारचे वेगवेगळे बांबू पाहायला मिळतात.

निसर्ग शिक्षणाचे बारकावे उदा. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष व त्यांच्यासोबत त्या वृक्षावर येणाऱ्या पक्षी किंवा कीटकांचा संबंध निसर्गातील विविध प्रकारच्या जीवसाखळ्या, जैवविविधतेचे घटक व त्या घटकांचा अन्योन्य संबंध मानवनिर्मित बाबी उदा.

वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, आवाजाचे प्रदूषण तसेच जागतिक तापमान वाढ व त्या अनुषंगाने होत असलेले ऋतुबदल, अनियंत्रित लोकसंख्या वाढ, अर्निबधित शहरीकरण या व अशा प्रकारच्या समस्यांचा निसर्गावर होणारा परिणाम तसेच निसर्गाने अशा संकटांवर केलेली मात हे सर्व प्रत्यक्ष अनुभवता येते व शिकता येते.

निसर्ग उद्यानाची भेट ही केवळ निसर्ग अभ्यास व निसर्ग शिक्षण यासाठीच असल्याने या उद्यानास पिकनिक किंवा सामान्य विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून भेट देण्याचे टाळावे. भेटीआधी फोन करून पूर्वकल्पना देणे व माहिती करून घेणे केव्हाही चांगले. त्यामुळे आपल्या निसर्ग उद्यानाच्या भेटीचा आनंद द्विगुणित होईलच यात शंका नाही.

अविनाश कुबल (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org