पृथ्वीवरच्या पहिल्या सजीवाची निर्मिती ही जीवशास्त्रीय नव्हे तर रासायनिक प्रक्रियांमधून झाली आहे. जवळपास साडेचार हजार दशलक्ष वर्षांपूर्वी सूर्यापासून पृथ्वी आणि सूर्यमालेतील इतर ग्रहांची निर्मिती झाली. तेव्हा अर्थातच पृथ्वीवर सजीवांचं अस्तित्व नव्हतं. त्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात असणाऱ्या हायड्रोजनची पृथ्वीवरच्या वातावरणातल्या नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया होत गेली आणि पृथ्वीवर अमोनिया, मिथेन, पाणी यांसारखी संयुगं तयार होत गेली. त्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात मुक्त ऑक्सिजन नव्हताच. त्यामुळेच या तयार होत गेलेल्या संयुगांचं ऑक्सिडीकरण न होता त्यांच्यापासून पुढे इतर रासायनिक पदार्थाची निर्मिती शक्य झाली.
सूर्यप्रकाशातले अतिनील किरण, आकाशात चमकणाऱ्या विजा, ज्वालामुखींच्या उद्रेकांमधून बाहेर टाकली जाणारी उष्णता यांच्या एकत्रित परिणामांतून अमोनिया, मिथेन, पाणी यांच्यापासून अमिनो आम्ल, डीएनए, आरएनए यांसारखी जटिल रसायनं निर्माण झाली. पावसाच्या पाण्याबरोबर ही रसायनं समुद्राच्या पाण्यात जाऊन मिसळली.
त्या वेळी समुद्राच्या पाण्याचं तापमान हे सध्याच्या समुद्राच्या पाण्याच्या तापमानापेक्षा खूपच जास्त होतं. त्या विशिष्ट तापमानाला वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया घडून आल्या आणि त्यामधून अधिकाधिक क्लिष्ट रचना असलेले रेणू तयार झाले. डीएनए आणि आरएनए रेणूंमध्ये स्वत:सारखेच रेणू तयार करण्याची क्षमता होती. या अभिक्रियांदरम्यान डीएनए रेणूंभोवती मेदाचे आवरण तयार होऊन पेशीसदृश रचना अस्तित्वात आली. ही रचना इतकी साधी होती की, सध्या अस्तित्वात असणाऱ्या अगदी साध्या पेशींची रचनासुद्धा त्याहून कितीतरी क्लिष्ट आहे.
मेदाचं आवरण असलेल्या पेशीसदृश रचनेत हळूहळू बदल होत गेले. त्यातूनच पुढे क्लोरोफिल रेणूंचं अस्तित्व असणाऱ्या पेशी निर्माण झाल्या. या पेशींना प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया करून पेशीमध्येच ग्लुकोजची निर्मिती करणं शक्य झालं. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून वातावरणामध्ये मुक्त ऑक्सिजन बाहेर टाकला जाऊ लागला. जेव्हा प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या अशा एकपेशीय जीवांच्या संख्येत वाढ होत गेली, तेव्हा वातावरणातल्या मुक्त ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं. त्यामुळे ऑक्सिजनच्या साह्याने श्वसन करणाऱ्या सजीवांची उत्पत्ती शक्य झाली.  

मनमोराचा पिसारा: ‘आपल्यापैकी’ !
समाजमानसशास्त्रामध्ये मानवी मनाच्या सांदिकोपऱ्यातले बारकावे तपासून पाहतात म्हणजे या विषयातील संशोधनात सर्वसाधारण परिस्थितीत (नॅचरल कंडिशन) विशिष्ट घटनेला माणसे कसा प्रतिसाद देतात? या प्रतिसादामागील मानसिकता कोणती? याचे निरीक्षण, विश्लेषण समाजमानसशास्त्रज्ञ करतात.
मदत करणे हा स्वभाव की अबोध पातळीवरून येणाऱ्या प्रेरणेवर विवेकाचा वचक असतो, या प्रश्नावर संशोधन करायला सरसावले.
साल १९७२. एप्रिल महिना. स्थळ अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन. प्रसंग अध्यक्ष निक्सन यांच्या युद्धखोर धोरणांविरुद्ध काढलेला मोर्चा. सहभागी २ लाख अमेरिकन नागरिक अर्थात मानवतावादी आणि शांतताप्रिय. प्रत्यक्षात मानसशास्त्रीय प्रयोगाची तयारी महिनाभर आधी सुरू झाली. संशोधक पीटर स्युएडफिल्ड, त्यांचे सहकारी यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी एका अभिनेत्याला सज्ज केलं. त्यानं महिनाभर दाढीबिढी वाढवली नि केस खांद्यापर्यंत म्हणजे त्याला त्या काळातला हिप्पी संप्रदायाचा ‘युनिफॉर्म’ दिला.  फुलाफुलांचा अघळपघळ कुर्ता इ. मोर्चात सहभागी होण्यासाठी ‘निक्सन चले जाव’ असा प्लॅकार्ड दिला आणि प्रयोगाची सुरुवात झाली. मोर्चात चालता चालता हा प्रयोगकर्मी (अभिनेता) फतकल घालून बसला, त्याच्या (सहकारी प्रयोगकर्मी) मैत्रिणीनं बावरल्याचं नाटक करून इतरांचं लक्ष वेधून घेतलं. ‘कृपया मला मदत करा, याला निदान प्रथमोपचार द्यायला साहाय्य करा.’ लगेच मोर्चेकरी आपणहून पुढे झाले. त्याच्यासाठी विसाव्याची जागा शोधली. घरी जायला  बसचं भाडंही देऊ केलं, त्याच्याबरोबर कुठे तरी शांत ठिकाणी जाण्यासाठी सात किलोमीटर चालत जाण्याची तयारी दाखवली. हा प्रयोग येथे पूर्ण झाला. प्रयोगकर्मी ताडकन उठून बसला व मोर्चेकऱ्यांचे आभार मानले. मोर्चेकरी चक्रावले, पण कारण समजल्यावर हस्तांदोलन करून हास्यरसात सामील झाले.
एकीकडे हा प्रयोग चालला असताना मोर्चात अन्य ठिकाणी दुसरा प्रयोग सुरू होता. तिथला प्रयोगकर्मी मात्र परीटघडीचे कपडे घालून ‘निक्सनला पाठिंबा द्या’ अशा तऱ्हेचा प्लॅकार्ड घेऊन चालला होता. पुढचं नाटक तसंच. फतकल घालणं नि मैत्रिणीने विनंती करणं इत्यादी. मोर्चेकऱ्यानं त्याच्यावर नजर टाकली. नीटनेटके केस, गुळगुळीत दाढी, स्वच्छ कपडे.. दिसताहेत. मोर्चेकऱ्यांनी म्हटलं, ‘व्हा रं फुडे.. व्हा चला बिगी बिगी.’ निक्सनला पाठिंबा म्हणणारा प्रयोगकर्मी मदतीविना तसाच मागे टाकून मोर्चेकरी पुढे गेले.
पीटर स्युएडफिल्ड यांनी या प्रयोगाविषयी शास्त्रीय जर्नलमध्ये लिहिलं आणि अर्थात खळबळ उडाली. हिप्पी सांप्रदायिक प्रयोगकर्मीला इतर मोर्चेकऱ्यांनी मदत केली, कारण तो त्यांना, कपडय़ावरून, हातातल्या प्लॅकार्डवरून ‘आपल्यापैकी’ वाटला. तर युद्धखोरी थांबवा, कनवाळू नि मानवतावादी शांतताप्रिय दृष्टीने जगाकडे पाहा, असं आवाहन करणाऱ्या त्याच मोर्चेकऱ्यांना दुसरा प्रयोगकर्मी ‘इतरां’पैकी वाटला, कारण त्याचे कपडे नि घोषणा..
याचा अर्थ मदत करण्याची प्रेरणा अंत:स्फूर्तीमधून उद्भवते पण पुढे बुद्धी त्यावर नियंत्रण ठेवून कोणाला मदत करतोयेस? ती व्यक्ती आपल्यापैकी की इतरांपैकी, असा सवाल विचारते नि आपल्यापैकी(च) लोकांना मदत कर. अशी आज्ञा करते! ही झाली तुमची-माझी सर्वसामान्यांची गोष्ट. काही लोकोत्तर मात्र कपडे, घोषणा वा  आविर्भावाला भेदून समोरच्या व्यक्तीतल्या माणसाला ओळखतात, माणुसकीला श्रेष्ठ मानतात!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: स्त्री-पुरुष यांच्यातील समानतेचे आधार..
‘‘पवित्रतेचे अधिष्ठान माणसाचे मन आहे, शरीर नाही. हा नवीन संस्कार समाजात प्रस्थापित करावा लागेल. विज्ञानाच्या युगात आज शारीरिक शक्तीचे महत्त्व घटत आहे. वैज्ञानिक सामर्थ्यांचा सामना नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्यांनेच होऊ शकतो. हेच आत्मबळ आहे. हीच अहिंसेची शक्ती आहे. पुरुष वा स्त्री, दोहोंचीही मुख्य शक्ती आत्मबळ आहे आणि स्त्रीची तर विशेष रूपाने. स्त्री-जीवनाचा हा अंतिम मोर्चा आहे. ज्यांची मानसिक शक्ती शारीरिक शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे तेच समाजाचे नेतृत्व करू शकतील. ही परिस्थिती महिलांसाठी अनुकूल आहे. भारताची परिस्थिती आत्मबलाच्या प्रयोगासाठी अनुकूल वाटली म्हणून गांधींनी आपले अहिंसेचे ऐतिहासिक प्रयोग याच देशात केले. स्त्रियांचे संपूर्ण जीवनच आत्मबळासाठी आवाहन आहे. विज्ञानयुगात बुद्धिबळाचे महत्त्व आहे. बुद्धिबळ जेव्हा भावनेने संपन्न होऊन सामथ्र्यशील बनते तेव्हा ते आत्मबळात परिणत होते. हे आत्मबळ अगम्य, अमोघ आहे.’’ आचार्य दादा धर्माधिकारी ‘स्त्रीपुरुष सहजीवन’ (१९६०) या पुस्तकात लिहितात- ‘‘स्त्रीच्या जीवनात जेव्हा ब्रह्मचर्याची प्रतिष्ठा स्थापन होईल तेव्हा मातृत्व तिच्या विवशतेचे कारण बनणार नाही. अशा वेळी मातृत्व तिचा विशेषाधिकार होईल. समाजासाठी मातृत्व स्त्रीची विशेष सेवा मानली जाईल. मातृत्वामुळे तिच्या आत्मनिर्भरतेची क्षती होणार नाही. समाजात कोणीही व्यक्ती स्वावलंबी नसते. सर्व परस्परावलंबी असतात. स्त्री आणि पुरुष दोन्ही असेच परस्परावलंबी होतील. दोघांचीही प्रतिष्ठा समान राहील. स्त्रीच्या जीवनात जेव्हा ब्रह्मचर्य व संन्यास तितकेच प्रतिष्ठित होतील, जेवढे मातृत्व, त्या दिवशी मातृत्व आणि पितृत्वाची सांस्कृतिक भूमिका समान होईल. यात स्त्रियांच्या अभिक्रमाची आवश्यकता आहे. समाजाचा आधार समानता आहे. जिथे समानता नाही तिथे समाज बनतच नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानतेचा आधार दोघांची तुल्यता. मनुष्याच्या नात्याने दोन्ही समान आहेत. अर्थात दोहोंत काही समान गुण आहेत आणि काही विशेष गुण आहेत. या विशेषतांचे कारण निसर्गही आहे व संस्कारही आहे.’’