सर्व रशियन राज्यांमध्ये प्रबळ बनलेल्या मास्कोच्या राज्याला ‘मस्कोव्ही’ असेही म्हटले जाते. मस्कोव्हीचा राज्यकाल इ.स. १२७२ ते १५४७ असा झाला. या काळात इ.स. १४३१ मध्ये जोनास याची प्रमुख धर्मगुरुपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून मॉस्कोचे ऑर्थोडॉक्स चर्च हे स्वतंत्र धर्मपीठ बनले, सर्व धर्माधिकाऱ्यांनी मॉस्कोच्या राजाचे प्रभुत्व मान्य केले. १४८० पर्यंत मॉस्कोच्या राजांनी तातार मंगोलियनांच्या ‘गोल्डन होर्ड’ या प्रबळ टोळीचे मांडलिकत्व राखले. मस्कोव्ही राज्यकालात डॅनील प्रथम, इव्हान तृतीय द ग्रेट आणि व्हॅसिली तृतीय हे प्रमुख राजे झाले. इव्हान तृतीय याने मोठा राज्यविस्तार करून १५०३ पर्यंत मॉस्कोचे राज्यक्षेत्र तिप्पट करून स्वत:ला सर्व रूस लोकांचा ‘झार’ म्हणजे सम्राट घोषित केले. त्याने अखेरच्या बायझंटाइन सम्राटाच्या पुतणीशी लग्न करून स्वत:च्या मॉस्को राज्याला ‘तिसरे रोमन साम्राज्य’ घोषित केले! या पुढचे मॉस्कोचे सर्व राज्यकत्रे स्वत:ला झार म्हणवून घेऊ लागले, राण्या झारिना. व्हॅसिली तृतीय नंतर इव्हान चतुर्थ ऊर्फ इव्हान द टेरिबल हा मॉस्कोचा शासक झाला. या काळात गोल्डन होर्ड या मंगोल टोळींचे मॉस्कोवरील वर्चस्व संपले होते. पिटर द ग्रेट या कर्तृत्ववान झारने आपल्या इ.स. १६८२ ते १७२१ अशा कारकीर्दीत संपूर्ण रशियन क्षेत्र आपल्या राज्यात सामील करून मॉस्कोचे साम्राज्य ‘रशियन एम्पायर’ म्हणून घोषित केले. रशियन साम्राज्याचा पाडाव १९१७ साली झालेल्या रशियन क्रांतीनंतर झाला. या साम्राज्य काळात स्वीडन आणि फिनलँडचा बराच प्रदेश घेऊन एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रशियन साम्राज्याकडे एकूण २.२४ कोटी चौ.कि.मी. एवढे विशाल राज्यक्षेत्र होते. केवळ तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याकडे रशियाहून अधिक जमीन होती. १५ मार्च १९१७ रोजी झार निकोलस द्वितीय याची हकालपट्टी करून राज्यक्रांती झाली आणि रशियन प्रजासत्ताक निर्माण झाले. हे प्रजासत्ताक केवळ आठ महिने टिकले. ऑक्टोबर १९१७ मध्ये आंदोलन होऊन मॉस्कोत रशियन सोव्हिएत सरकार फेडरेटिव्ह सोश्ॉलिस्ट रिपब्लिक (एस.एफ.एस.आर.) स्थापन झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

तूर

तुरीचे शास्त्रीय नाव कॅजॅनस कजान असून ही वनस्पती फॅबिअसी कुळातील आहे. ती झुडूप या प्रकारात असून तिची सोटमुळे रायझोबियमयुक्त गाठींनी भरलेली असतात. खोडाला अनेक फांद्या असतात व त्या फांद्यांचा विस्तार मोठा असतो. पाने संयुक्त प्रकारची असून फुले पिवळ्या रंगाची असतात. या फुलांना वळणदार शेंगा येतात, या शेंगांमध्ये ५ ते ८ दाणे असतात. शेंगा वाळल्यावर तपकिरी रंगाच्या होतात. एकदा लावलेले तुरीचे झाड पाच वर्षांपर्यंत शेंगा देऊ शकते. तुरीची लागवड पावसाची कमतरता असलेल्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर केली जाते, तसेच ज्वारी, बाजरी, मका, या पिकात तूर आंतरपीक म्हणून घेण्याची पद्धत भारतात आढळते.

तुरीची लागवड भारतात ३५०० वर्षांपासून केली जात आहे असे दाखले मिळतात. भारतातून ही तूर आफ्रिकी, युरोपीय, अमेरिकी देशांमध्ये पसरली आणि आता तर सर्व देशांमध्ये तूर कडधान्य म्हणून वापरतात.

ओली तूर, वाळलेली तूर, मोडवलेली तूर, तूरडाळ अशा स्वरूपात आपण तूर खातो, तूरडाळीचे वरण, आमटी, सांबर आवडीने खाण्याची पद्धत आहे, अख्ख्या तुरीची, ओल्या तुरीची उसळ चविष्ट आणि रुचकर लागते, काही प्रदेशात तुरीच्या कोवळ्या पाल्याचीसुद्धा भाजी करतात.

तूरडाळीत प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते, तसेच  शरीरास आवश्यक अशी अमिनो आम्ले जसे मेथिओनिन, ट्रिप्टोफॅन, लायसिन, थ्रिओनिन, ल्युसीन, आयसोल्युसीनसुद्धा तुरीत मोठय़ा प्रमाणावर आढळतात. या सर्व अमिनो आम्लाचा उपयोग शरीरात प्रथिनबांधणीसाठी होतो, कबरेदके, तंतुमय कबरेदके, जीवनसत्त्वे बी १, बी २, बी ३, बी ५, बी ६, बी ९, ‘क’, ‘के’, ‘ई’ इत्यादी तुरीत मुबलक प्रमाणावर आढळतात. खनिजे जसे मॅग्नेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, सोडिअम, िझक यांचीही वर्णी तुरीच्या पोषणमूल्यात वाढ करते.

पोषणमूल्याबरोबर तूर पर्यावरणीय मूल्यसुद्धा चांगले जपते, मुळांवरील गाठी वातावरणातील नायट्रोजनचे  स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवतात. थायलंडमध्ये तुरीची लागवड लाखेच्या किडय़ांचे खाद्य म्हणून करतात.

आजकाल बहुतांश शेतकरी जास्त पसा देणाऱ्या पिकांच्या शेतीवर अधिक भर देऊ देत असल्याने तुरीसारख्या अतिशय उपयोगी पिकाची शेती कमी झाली आहे.

डॉ. मनीषा करपे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org