सर्वाना २०१७ या नवीन वर्षांच्या शुभेच्छा. २००६ साली ‘लोकसत्ता’ मध्ये ‘कुतूहल’ हे वाचकांचे कुतूहल जागविणारे सदर सुरू झाले. दरवर्षी या सदरासाठी एकेक वेगळा विषय निवडून गेली अकरा वष्रे मराठी विज्ञान परिषद हे सदर चालवत आहे. वर्षभरात साधारण २५० ते २६० लेख या सदरामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. हे सदर  ‘लोकसत्ता’च्या सर्वच आवृत्त्यांतून प्रसिद्ध होत असल्याने त्याला सगळीकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. या लेखांबरोबर ‘लोकसत्ता’ चित्र छापत असल्याने वाचकांना तो विषय समजण्यास सुलभ जातो. ग्रामीण भागातील कित्येक शाळात या सदराचे प्रार्थनेनंतर सार्वजनिक वाचन होत असल्याने त्या शालेय पातळीला समजेल अशा भाषेत हे सदर लिहिण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.

रानटी व भटक्या अवस्थेतून मानव जसजसा विकसित झाला तसा तो टोळ्यांनी राहू लागला, बोलू लागला, शेती करू लागला, स्थिर होऊ  लागला. त्याची जसजशी प्रगती होऊ लागली, तसे त्याचे वेगवेगळ्या बाबींचे मोजमापन सुरू झाले; पण ते हाकेच्या अंतरावर, कासराभर, मूठभर अशा ढोबळ पद्धतीचे होते. ही मापे माणसागणिक व स्थान बदललेले की बदलत. जसजशी प्रगती होत गेली तशी ही अडचण लक्षात येऊ लागली, टप्प्याटप्प्याने मोजमापणाचे प्रमाणीकरण होत गेले. मोजमापनात नेमकेपणा येत, ते आजच्या प्रगत अवस्थेत आले. मग नवनवीन शास्त्रे जशी उदयाला आली. तशी त्यातील मोजमापे अस्तित्वात आली, या सदराचे हे बारावे वर्ष. १२ या संख्येला वस्तू मोजताना डझन, वर्षांमध्ये कालावधी मोजत असू तर तप म्हणतात. आपण अंदाजात, देवाणघेवाण करण्यासाठी, व्यवहारात नेमकेपणा येण्यासाठी, तुलना करण्यासाठी अनेक बाबींचे मोजमापन करीत असतो. विविध बाबी मोजण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, ती उपकरणे शोधणारे शास्त्रज्ञ, त्या मोजमापनाची एकेक या सर्वाचा इतिहास ते वर्तमान या सर्वाची माहिती विषयवार येते. वर्षभर आपण या सदरातून घेणार आहोत. चला तर मग उद्यापासून मोजमापनाचे विविध पलू पाहू या !

– डॉ. जयंत जोशी , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना

भाषा आणि संस्कृती यातील विविधता आणि त्या विविधतेतून एकता, हे भारताचे ठळक वैशिष्टय़. या विविधतेतून एकता टिकवणे, जोपासणे अनेक स्तरांवर सुरू असते. जैन कुटुंबीयांनी ज्ञानपीठाची स्थापना करून असेच एकसूत्री बहुमोल कार्य साहित्य क्षेत्रात केले आहे. विविध भारतीय भाषांत सतत साहित्यनिर्मिती होत असते. दरवर्षी अनेक पुरस्कार उत्कृष्ट साहित्यकृतींना प्रदान करण्यात येतात, पण ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा प्रतिष्ठेचा, सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला जातो. मान्यताप्राप्त २२ भारतीय भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा विचार या पुरस्कारासाठी केला जातो.

तसे पाहिले तर, या पुरस्काराअगोदरच या भारतीय ज्ञानपीठाने अनेक साहित्यिक, सांस्कृतिक योजना सुरू केल्या होत्या. १९४४ मध्येच या कार्याला सुरुवात झाली. अनेक अप्रकाशित साहित्यांचे प्रकाशन, जुन्या ग्रंथांचे संशोधन, भारतातील विविध भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथांचा अनुवाद, असे मौलिक कार्य हाती घेतले गेले. संस्कृत, प्राकृत, कानडी, तामीळ अशा भाषांतील दुर्मीळ हस्तलिखिते व ग्रंथ यांचे संशोधन, भाषांतर व पुनर्मुद्रणाचे कठीण आणि खर्चीक कार्य प्रथम हाती घेण्यात आले. यासाठी मूर्तिदेवी ग्रंथमाला, लोकोदम ग्रंथमाला सुरू करण्यात आल्या. भारतातील विद्वान साहित्यिक, संशोधक, विद्यापीठातील भाषाप्रमुख यांच्या मार्गदर्शनातून ग्रंथ प्रकाशनाचे हे कार्य ज्ञानपीठाने चालविले होते. सुरुवातीपासूनच या ज्ञानपीठाच्या अध्यक्षा होत्या रमादेवी जैन. हे कार्य सुरू असतानाच ‘ज्ञानपीठ पुरस्काराची’ योजना आखली गेली. अनेक चर्चासत्रे, साहित्यिकांशी, जाणकारांशी विचारविनिमय करूनच पुरस्काराचे निश्चित स्वरूप ठरवले गेले. योजनेला मूर्तस्वरूप देण्यात आले, ते आजतागायत सुरू आहे.

सुरुवातीला या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये होती. १९८२ पासून ती दीड लाख करण्यात आली. वाढत वाढत आता ती अकरा लाख इतकी आहे. यासोबत वाग्देवीची मूर्ती आणि मानपत्राने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामागील प्रेरणा आहे ती रमा जैन यांची. त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टमधून या पुरस्काराची रक्कम दिली जाते. सुरुवातीला भारतीय भाषेतील (इंग्रजी सोडून) एका सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीला पुरस्कार दिला जायचा; पण आता १९८२ पासून लेखकाच्या संपूर्ण साहित्याचा विचार केला जातो.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com