प्रस्तुत लेखांमधील विचार कोणत्याही पाठय़पुस्तकात सापडणार नाहीत, कारण ते नवीन आहेत. निसर्गात आणि व्यवहारातही आपल्याला असे दिसून येईल की आपल्या सभोवार घडणाऱ्या घटना या अनेक घटकांवर अवलंबून असतात, आणि बहुतेक वेळी त्यांना लागणारे सर्व घटक योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याने ती क्रिया ज्या कार्यक्षमतेने घडावयास हवी, त्या कार्यक्षमतेने ती घडू शकत नाही. ज्या घटकांच्या कमतरतेमुळे एखाद्या प्रक्रियेची कार्यक्षमता कमी होते, अशा घटकांना मर्यादा घालणारे घटक असे संबोधले जाते. असे घटक शोधून काढून ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केल्यास असे दिसेल की, शेतीतून चांगले उत्पन्न हवे असेल तर आपण निवडलेले बी, आपल्या जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, प्रकाशसंश्लेषणासाठी योग्य प्रमाणात कार्बन डायॉक्साइड आणि प्रकाशाचा पुरवठा, कीटक, रोग आणि तणांचा योग्य बंदोबस्त, इ. अनेक घटकांवर आपले उत्पन्न अवलंबून असते. यांपकी जमीन, पावसाचे पाणी, सूर्यप्रकाश आणि हवेतला कार्बनडयॉक्साइड हे शेतकऱ्याला फुकट मिळतात, त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. याउलट रासायनिक खते, कीटक आणि रोगनाशक रसायने, तण काढण्यासाठी मजूर इ. घटकांसाठी त्याला पसे मोजावे लागतात. पसे न खर्चता या घटकांचा प्रभाव कमी कसा करता येईल, अशी उपाययोजना केल्यास कदाचित शेतीतून मिळणारे एकूण उत्पन्न कमी होईल, पण खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला मिळणारा नफा वाढलेला दिसेल.
या संपूर्ण लेखमालेत शेती यशस्वी होण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरणारे विविध घटक दूर कसे करावयाचे याचेच विवेचन केलेले आहे. प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला असे आढळून येईल की मर्यादा घालणारा एक घटक आपण दूर केला की दुसरा कोणतातरी घटक त्या प्रक्रियेवर मर्यादा घालू लागतो, आणि आपल्याला मग तो अडथळाही दूर करावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला जे उद्दिष्ट गाठावयाचे आहे, ते गाठणे ही एक अडथळ्यांची शर्यतच होते. वाचकांनी या लेखमालेवरील आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.
डॉ. आनंद कर्वे  (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग,
चुनाभ ट्टी, मुंबई२२   office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. : २ मॉर्निग वॉक
रविन मायदेव थत्ते
‘मॉर्निग वॉक’ या मराठीत प्रचलित झालेल्या शब्दाहून जास्त बेक्रूड शब्द माझ्या परिचयाच्या नाही. एक मला म्हणाला, काय हो तुम्ही ‘मॉर्निग वॉक’ घेता की नाही?  माझ्यापेक्षा हा वीस वर्षांने लहान आणि माझ्याहून दुप्पट पोट सुटलेला तेव्हा हा बेक्रूड शब्द वापरत मला हा प्रश्न त्याने विचारणे म्हणजे खरे तर उपमर्दच. मी त्याला म्हटले, मी ‘इव्हिनिंग वॉक’ घेतो. तेव्हा हा बिचकला. कारण संध्याकाळी ‘फिरायला’ जातात. सकाळचा मात्र ‘मॉर्निग वॉक’ असतो. हा ‘वॉक’ तीन ते चार हजार रुपयांचे जोडे घालून केला जातो. मला वाटते हे जोडे आपल्या हवामानाला संपूर्णपणे अयोग्य आहेत. या जोडय़ांना साजेसे मोजे असतात तेही शेकडय़ाच्या किमतीत असतात. हे जोडे आणि हे मोजे पावसाळ्यात भिजले तर लवकर वाळत नाही म्हणून काही लोक जोडय़ाची जोडी घेतात. मी आमच्या घराच्या जवळच महाराष्ट्र लेदर वर्क्स असे इंग्रजी नाव मराठीत लिहिलेले दुकान आहे, तिथे साडेतीनशे रुपयांचे जोडे मिळतात ते वापरतो. वर्षभर टिकतात म्हणजे सरासरी दिवसाला रुपया पडतो. मग थोडे झिजले तर त्या दुकानाचा मालक जो हाडाचा कारागीर आहे तो मला ४० रुपयांची एक चामडय़ाची माझ्या जोडय़ाच्या आकाराची मऊ चकती देतो. ती आत घातली की हे आणखी चार-सहा महिने टिकतात. मग हळुहळू बायको त्या जोडय़ाकडे बघू लागते आणि म्हणते, हा चिकूपणाचा कळस आहे. तुझ्यासारख्या प्लास्टिक सर्जनने असे वागणे म्हणजे मला लाज वाटते. तेव्हा मग मी जोडे बदलतो. हा चिकूपणा नाही असे माझे म्हणणे आहे. हल्लीहल्लीच हे असले महागडे जोडे काही कामाचे नाहीत त्यामुळे पायाला अपायच होतो असे छापून येऊ लागले आहे. कोठेतरी कोणाचे तरी बिनसले असणार किंवा वैमनस्यही असेल. माध्यमांना ‘प्रथमं वंदे’ हेच खरे! सुदैवाने माझी पावले चांगल्या आकाराची आहेत. बहुतेकांची तशीच असतात. निसर्गाने स्वत:चे जोडे करताना पावलांच्या खालची त्वचा जाड केली आहे आणि पावलाच्या ज्या भागावर वजन येते त्याच्या खाली एक विशिष्ट प्रकारची चरबी आणून ठेवली आहे. शिवाय हा भाग कमानीसारखा आहे. अर्थात जंगलाच्या राजाच्या म्हणजे सिंहाच्या पायातही जसा काटा जाऊ शकतो आणि पुढे तो उंदराला काढावा लागतो तसेच माणसाच्या पायाचेही असल्यामुळे पायताण गरजेचे असते. सिद्धिविनायकाला मालाड-गोरेगावहून अनवाणी चालत जाण्याची हल्ली फॅशन झाली आहे. मुंबईचे गलिच्छ रस्ते लक्षात घेता या पायातून आत काय काय जात असेल याची कल्पना करवत नाही. या चालत जाणाऱ्यांमध्ये पोरापोरींचे घोळके असतात ते एकमेकांकडे चोरून बघत असतात. गणपती येईपर्यंत हेच चालू असते. मग गणपतीचे दर्शन घेतले जाते. गणपती हा ज्ञानविज्ञानाचा देव समजला जातो. त्याच्याकडे, मी घरीच बसून प्रार्थना करतो की, ‘यांना कृपा करून साधी पायताणे घालण्याची बुद्धी दे.’
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २ जानेवारी  
संजय वझरेकर
१८९२ वैद्यकीय, शास्त्रविषयक ग्रंथकर्ते भिषग्रत्न गणेश पांडुरंग परांजपे यांचा जन्म.
१९४० इतिहास संशोधक वासुदेव विष्णू जोशी यांचा जन्म.
१९५२ ‘महाराष्ट्रधर्म’ या संशोधनग्रंथाचे कर्ते आणि मराठय़ांचे इतिहासकार भास्कर वामन भट यांचे निधन. वाई (जि. सातारा) येथे २७ डिसेंबर १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला, तेथेच प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईला आले व पुढे मुंबईतच कायद्याचा अभ्यास करून ‘डिस्ट्रिक्ट कोर्ट प्लीडर’ म्हणून धुळे येथे त्यांची कारकीर्द सुरू झाली. मात्र, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या भेटीनंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इतिहासाचार्याचे शिष्योत्तम आणि ‘संशोधन’ या मासिकाचे संस्थापक-संपादक अशी भट यांची ओळख आहे.  भट यांना असलेली इतिहासाची आवड वाढलीच, तिला संशोधकीय शिस्तही आली. याच शिस्तीतून त्यांनी समर्थ रामदासांचाही अभ्यास केला. ‘शिवाजीची राजनीती’ हा त्यांचा ग्रंथ तर, मूळ कागदपत्रांच्या आधाराने छत्रपती शिवरायांचे प्रशासनकौशल्य उलगडून दाखवणारा संदर्भग्रंथ मानला जातो. ‘राजवाडे चरित्र’ हा ग्रंथ, हीच त्यांची गुरुदक्षिणा होती.

वॉर अँड पीस : आयुष्याचा वेद
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
मानवी जीवनाच्या प्रारंभापासून आयुर्वेद- ‘आयुष्याचा वेद’ स्वास्थरक्षण व रोगनिवारणाचे कार्य करीत आहे. ज्या तत्त्वांचे शरीर बनले आहे, रोग बनले आहेत. त्या तत्त्वांची आयुर्वेदाची हत्यारे बनली आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश या तत्त्वांनी सर्व जीवन व्यापलेले आहे. शरीर ‘पाच तत्त्वांचे आहे.’ रोग याच तत्त्वांच्या कमीअधिक प्रमाणामुळे बनतात, अशी आयुर्वेदाची धारणा आहे. मग त्याकरिता औषधांची उपचारांची प्रकृतीसुद्धा पांचभौतिकच असणार. आधुनिक विज्ञानामुळे, मूलतत्त्वे आता सव्वाशेच्या आसपास आहेत. माझ्या लहानपणी ब्याण्णव होती. मूळ तत्त्व खरे म्हटले तर शाश्वत हवे. त्यामुळे आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाची पांचभौतिक बैठक जास्त शास्त्रीय वाटते. या पंचमहाभुतांचा मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटु, कषाय या षड्सांचा व गुरू लघु, स्निग्ध, रूक्ष इत्यादी वीसच्या वर गुणांचा विचार करून मानवी जीवनातील विविध अनारोग्य समस्यांचा सामना करता येतो. आयुर्वेद चिकित्सा विचार हा ‘कार्य आणि कारण’ या तत्त्वांवर आधारित आहे. ज्या कारणांनी रोग झाला त्यांची जडणघडण बघून कोणत्या तत्त्वांची कमी आहे, कोणती तत्त्वे वाढवायला हवी, कमी करावयास हवी, त्यांचे विंशति गुण यांचा महासागर आमच्या पुढे आहे. त्यातील नेमकी निवड ‘नीर क्षीर विवेक’ न्यायाने करावयास हवी.
खरे म्हणजे वनस्पती, पंचकर्म उपचार, ही काही कोणा शास्त्राची मक्तेदारी नाही. आयुर्वेदीय तत्त्वज्ञान आयुर्वेदाचे वेगळेपण सांगते. पण वनस्पती, प्राणिज द्रव्ये, भस्मे, पंचकर्म, उपचारांची यंत्रे ही सर्वाची आहेत. त्यांना वैश्विक व्यापकत्व येणार आहे, पण ती साधने वापरण्यामागची सैद्धान्तिक भूमिका समजून घेणे फार आवश्यक आहे.