तंतूनिर्मिती झाल्यानंतर तो रंगवणे अशक्य असल्यामुळे तंतुद्रवात विशिष्ट रंग मिसळून रंगीत तंतू म्हणूनच जो निर्माण करावा लागतो, असा एकमेव तंतू आहे पॉलिप्रॉपिलीन. खनिज तेलांपासून नॅप्था मिळतो, या नॅप्थावर रासायनिक प्रक्रिया करून पॉलिप्रॉपिलीन बहुवारिकाची निर्मिती केली जाते. या तंतूला वैशिष्टय़पूर्ण तंतूचे स्वरूप प्राप्त झाले, ते त्याच्या अनेक वैशिष्टय़पूर्ण गुणधर्मामुळे.
हा तंतू अधिक ताकदवान आणि लंबनक्षम आहे. यामुळेच जड वस्तू वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी पोती, पिशव्या, पॉलिप्रॉपिलीनपासून बनवल्या जातात. बुरशी, किटाणू, किडे, सूर्यप्रकाश यांना हा तंतू चांगल्या प्रकारे विरोध करतो. त्यामुळे वेष्टन कापडाकरिता हा तंतू आदर्श ठरतो.
विविध रसायनांना कमालीचा विरोध हा या तंतूचा गुणधर्म. त्यामुळे ठिकठिकाणी लागणाऱ्या गाळण वस्त्रांकरिता हा तंतू वापरला जातो. मोटारी आणि अन्य वाहनांमध्ये आम्ल बॅटरी वापरावी लागते. या बॅटरीमध्ये पॉलिप्रॉपिलीनचा भराव घालून तिचे आयुष्य आणि तिची उपयुक्तता वाढवली जाते.
रस्ते, धरणे, कालवे, रेल्वेमार्ग, बंदरे अशा अनेक ठिकाणी जमिनीची धूप होऊन अपरिमित नुकसान होते. पॉलिप्रॉपिलीनची भूवस्त्रे वापरून जमिनीची धूप आणि नंतरचे नुकसान नियंत्रित करता येते. हा तंतू पाणी शोषून घेत नाही व त्वरेने ते वाहून नेतो. या गुणधर्माचा उपयोग क्रीडावस्त्रे आणि आरोग्यवस्त्रांमध्ये केला जातो. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांसाठी त्वचेचे आरोग्य चांगले राहावे म्हणून घाम आणि अन्य द्रव खेचून घेऊन त्वचा कोरडी ठेवणारी आरोग्यवस्त्रे फायदेशीर ठरतात.
या तंतूत स्थितिस्थापकत्व मोठय़ा प्रमाणात असते, म्हणून गालिचे तयार करण्यासाठी या तंतूचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. कुठल्याच द्रवाची आसक्ती नसल्यामुळे पॉलिप्रॉपिलीनच्या कापडावर कायमचे डाग पडू शकत नाहीत. तात्पुरते डाग पडलेच तरी ते लगेच धुता येतात. यामुळे रासायनिक कारखान्यामध्ये पूरक वस्त्रे व आधार वस्त्रे म्हणून अशा कापडाचा वापर होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्य या तंतूत असल्यामुळे कोणत्याही प्रदूषणाचा धोका निर्माण होत नाही.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

 संस्थानांची बखर – कलाकार, खेळाडूंचे जन्मस्थान इंदूर
संगीत, चित्रपट आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्तींचे जन्मस्थान असलेले इंदौर किंवा (मराठी उच्चारानुसार -) इंदूर हे स्वातंत्र्यपूर्व काळात २५,६०० चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे संस्थान होते. संगीत आणि चित्रपट क्षेत्रांतील लता मंगेशकर, असिफ शाह, सलमान खान, जॉनी वॉकर, विजयेंद्र घाटगे, तर क्रीडा क्षेत्रातील राहुल द्रविड, नरेंद्र हिरवानी यांचा जन्म इंदूरचा. पद्मश्री, पद्मभूषण असे बहुमान मिळालेले प्रसिद्ध चित्रकार एन.सी. बेंद्रे यांचा जन्मही इंदुरातलाच. नुकतेच पायउतार झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही जन्म इंदुरातच झाला.
सध्याचे इंदूर जिथे वसले आहे ती जागा सतराव्या शतकात मोगलांचा स्थानिक सरंजामदार राव नंदीलाल चौधरी याने वसविली होती. चौधरी स्वत:ची दोन हजारांची फौज राखून होता. पुढे मोगलांशी त्याचे संबंध बिघडले आणि मराठेही माळव्यात शिरजोर झाले. मोगल आणि मराठय़ांच्या सततच्या हल्ल्यांनी बेजार झालेल्या चौधरीने सरस्वती नदीजवळचा काही भाग सुरक्षित असल्याचे पाहून आपली वस्ती तिथे हलवली. तिथे असलेल्या इंद्रेश्वर मंदिरामुळे  (छायाचित्र पाहा) त्याने आपल्या छोटय़ा राज्याला इंद्रपूर हे नाव दिले. या इंद्रपूरचेच पुढे इंदूर झाले. सोळाव्या शतकात इंदौर हे दिल्ली आणि दख्खनमधील एक महत्त्वाचे व्यापारी देवाणघेवाणीचे केंद्र म्हणून विकसित झाले होते. आता २१ व्या शतकात औद्योगिक क्षेत्रात भरारी मारलेल्या इंदूरमध्ये विविध उत्पादनांचे १५०० लहान-मोठे व्यवसाय उभे राहिले आहेत. अमेरिका, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांनी येथील औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com