31 May 2016

कुतूहल – सेंद्रिय खतामुळे वनस्पतीला कसा फायदा होतो ?

गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून

- डॉ. विठ्ठल चापके, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२ -office@mavipamumbai.org | January 18, 2013 12:01 PM

गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. यात वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकाना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना संपूर्ण वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.
सेंद्रिय खताचे मुख्य दोन प्रकार आहेत –
भरखते : शेणखत – जनावरांचे शेण, मूत्र व गुरांनी खाऊन राहिलेले चारा-वैरणीचे अवशेष हे यात मोडतात. चांगले कुजून तयार झालेल्या शेणखतात नत्र ०.७५ टक्के स्फुरद ०.५० टक्के व पालाश ०.७५ टक्के असते.
कंपोस्ट – शहरातील तसेच खेडय़ातील केरकचऱ्याचे जीवाणूंमुळे विघटन होऊन हे तयार होते. यात नत्र १.५ टक्के, स्फुरद एक टक्का व पालाश १.२ टक्के एवढे असते.
एफवायएम – फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे एफवायएम हे खत शेतातील गवत, पिकाचे कापणीनंतर उरलेले भाग, भुसा, ऊसाचे पाचट वगरे कुजवून तयार केले जाते. यात जनावरांचे शेण किंवा मूत्र वापरले जात नाही. त्यामुळे शेणखत वा कंपोस्ट खतापेक्षा या खतात नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण कमी असते.
हिरवळीचे खत – दाट पेरणी केलेले शेंगवर्गीय पीक फुलोऱ्यात आले की ते शेतातच गाडून कुजवतात. पिकाच्या निवडीप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. कोरडवाहू विभागात या खताचा वापर कमी दिसतो.
गांडूळ खत – नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गुरांचे कुजलेले शेण, मूत्र, गांडुळांची विष्ठा, गांडुळांची अंडी आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा यात समावेश असतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा हे सेंद्रिय खत पिकांना जास्त प्रभावी ठरते.
जोरखते : या वर्गात हाडाचे खत, मासळी खत, खाटीक खान्यातील रक्तखत, कोंबडीखत आणि तेलबियांच्या पेंडी इत्यादी नमूद करता येतील. भरखताच्या तुलनेत जोरखतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. यामुळे ही खते भरखतापेक्षा कमी प्रमाणात पिकांना दिली तरी अन्नाची गरज भागते.

जे देखे रवी..      
संधिकाळातले पुणे
कामशेतच्या शाळेचा प्रयोग फसला हे कानिटकरांना झोंबले असणार तेव्हा त्यांनीच स्थापन केलेल्या  मॉडर्न हायस्कूलमध्ये मला त्यांनी प्रवेश मिळवून दिला (१९५१.) मागे वळून बघितले तर असे वाटते की, पुणे स्थित्यंतराच्या वेशीवर उभे होते. त्याआधीच्या शतकात पुण्यात जहाल-मवाळ, डावे-उजवे, पुरोगामी किंवा स्थितीवादी अशी लेबले लावता येतील, असे अनेक मतप्रवाह खळखळून वाहिले होते. त्या प्रवाहातले नावाडी मात्र अस्सल प्रामाणिक आणि आदर्शवादी होते. समाजात विषमता होती ती थोडय़ाफार प्रमाणात सर्वत्र असते; परंतु त्या विषमतेतही नैतिकता घट्ट होती. आता विषमता वाढली आहे, असे म्हणतात आणि नैतिकतेच्या नावाने तर बोंबच आहे.
सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रातल्या अग्रणीच्या विरुद्ध कोणाचीही ब्र काढण्याची ताकद नव्हती. कारण त्यांचे वर्तनही तसेच होते. कॅम्प सोडला तर पुणे अस्सल मराठी मुलुख होता. गावातले गल्लीबोळ सोडले तर हमरस्ते रुंद होते. जवळ जवळ सगळ्या शाळांना विस्तीर्ण मैदाने होती. शाळांची नावे इंग्रजीत असली तरी माध्यम मराठी होते. त्या काळात पुण्याची ‘विद्येचे माहेरघर’ ही ख्याती टिकविता यावी म्हणून युनिव्हर्सिटी टाऊन म्हणून विकसित करावे, असा एक प्रस्ताव होता. तो डावलला गेला.
 त्यानंतरच्या काळात पुणे झपाटय़ाने बदलणे अपरिहार्य होते. पुणे बहरले की बिथरले की, बिघडले हा प्रश्न मी तसाच सोडून देतो; परंतु तिथे नव्याने आलेले रहिवासीही कबूल करतील की पुणे आता एक प्रदूषित बहुभाषिक आणि अक्राळ-विक्राळ गर्दीने भरलेले आणि व्यक्तिमत्त्व हरवलेले शहर झाले आहे.
त्या काळात मॉडर्न हायस्कूल एक उत्तम शाळा होती. परंपरागत हुशार कुटुंबातली अनेक मुले तिथे शिकायला येत. मला एवढी चांगली शाळा एक नवलच होते. तिथले शिक्षक मातबर होते त्यांचा दरारा होता आणि सर्व प्रकारच्या खेळांसाठी (देशी-विदेशी) एक मैदान तर उपलब्ध होतेच, पण व्यायाम आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र शिक्षक होते. ज्याला अभ्यास म्हणतात त्यात १९५१ ते १९५४ माझा बोऱ्याच उडाला. माझे गणित कच्चे होते, संस्कृत जेमतेमच होते आणि विज्ञान विषयातले आडाखे मला अनैसर्गिक वाटत असत. जेमतेम काठावर पास होणे एवढेच जमले. शाळा सुटली की, मात्र मी फॉर्मात असे. जवळ जवळ सगळ्या देशी खेळांचे शाळेचे प्रतिनिधित्व मी केले. वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या, शाळेचे वार्षिक संमेलन (गॅदरिंग )असे त्यात मी झाडू मारण्यापासून तर नाटकातला हीरो अशा अनेक कामगिऱ्या पार पाडल्या. एकदा असा प्रस्ताव आला की, घाटी लेझीम दोन्ही बाजूला जळते पलिते लावून रात्री खेळण्याचा प्रयोग करावा. पोरं भ्याली. पालक कां कू करू लागले तेव्हा व्यायाम शिक्षक म्हणाले, ‘‘त्या थत्त्याला बोलवा तो तयार होईल.’’ मी बिनधास्त खेळलो आणि मग हजार एक लोकांसमोर तो प्रेक्षणीय कार्यक्रम रात्री सादर झाला.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस                                                       
अंग बाहेर येणे
अंग बाहेर येणे म्हणजे गुद या अवयवाच्या, तीन वलीतील, स्नायूंच्या आकुंचन-प्रसरण या प्रमुख कार्यात उणेपणा येणे. ताणले जाणे व पूर्ववत होणे हा स्नायूचा स्वाभाविक गुणधर्म. संडासचा वेग आल्यावर गुदाचे स्नायू प्रसरण पावून मलप्रवृत्ती होते. नंतर त्या स्नायूंचे आपोआप आकुंचन होत असते. या स्नायूंवर फाजील ताण पडला, पुन:पुन्हा मलप्रवृत्ती होत राहिली किंवा पक्वाशयात वारंवार वायू होत राहिला की गुदवली आकुंचन न होता बाहेर येते. काही रुग्णांच्या बाबतीत ती काही काळाने आत जाते, तर काही रुग्णांना बाहेर आलेले गुद हाताने आत ढकलावे लागते.
गुदभ्रंश या विकाराची कारणे खूप आहेत व ती टाळण्यासारखीही आहेत. वारंवार संडासचे वेग येतील असे वातूळ पदार्थ सातत्याने खाणे. उदा., शेव, भजी, चिवडा, शिळे अन्न, खूप थंड पदार्थ, मांसाहार इ. अवेळी, उशिरा किंवा भूक नसताना पुन:पुन्हा जेवण. शौचाला पुन:पुन्हा जाण्याची भावना होणे, कुंथावे लागणे, मलप्रवृत्तीकरिता जोर करायला लागणे, कमी पोषणामुळे शरीरातील मांस धातूचे, पर्यायाने स्नायूंचे पोषण कमी होऊन गुद अवयवाची काम करण्याची ताकद कमी होणे. जुलाबाची निष्कारण औषधे घेणे, ती औषधे तीव्र असणे, लहान बालकांना दात येण्याच्या काळात किंवा अन्य कारणाने खूप जुलाब होऊन गुदभ्रंश हा विकार होतो. वैद्यकीय चिकित्सकाकडून, रुग्णाने खाली बसून वा वाकून गुद बाहेर येते का? किती भाग येतो? किती वेळ राहतो? तसेच आत ढकलावा लागतो का? याचे परीक्षण करवून घ्यावे. औषधे निवडण्याकरिता, गुदवलीवर मोड, लाली किंवा आजूबाजूला कातरल्यासारखे-फिशर आहे का? याचेही परीक्षण व्हायला हवे. रोग प्राथमिक अवस्थेत असताना उपचार तुलनेने सोपे असतात. पोटात वायू धरतो का? व तो उपचारांनी कमी होतो का यावर लक्ष ठेवावे. मलमूत्राचे वेग कमी होतात का याकरिता विचार व्हावा? या गोष्टी सुधारल्या तर गुदभ्रंश कमी होणार, औषधे नीट काम करणार व शस्त्रकर्म करावे लागणार नाही, याची खात्री बाळगावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
१८ जानेवारी
१८८९ > ‘नाटय़छटा’ या साहित्यप्रकाराचे मराठीतील जनक गोविंद बळवंत दिवाकर यांचा जन्म. ‘दिवाकरांच्या नाटय़छटा’ हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय ठरलेच, पण ‘पंत मेले राव चढले’, ‘बोलावणं आल्याशिवाय नाही’, ‘वर्डस्वर्थचे फुलपाखरू’, ‘फाटलेले पतंग’ अशा त्यांच्या अनेक नाटय़छटा पिढय़ान्पिढय़ा सादर होत राहिल्या. अवघ्या एका दीर्घ परिच्छेदातून, एकाच व्यक्तीच्या तोंडून नाटय़ उभे करण्याचे कौशल्य दिवाकरांकडे होते.
१८९५ >  निबंध, व्यक्तिचित्रण आणि ललित निबंध या प्रकारांची ताकद मराठीजनांना दाखवून देणारे विठ्ठल दत्तात्रेय घाटे यांचा जन्म. पांढरे केस हिरवी मने, काही म्हातारे व एक म्हातारी हे संग्रह आजही वाचनीय आहेत. मनोगते, विचारविलसिते हे संग्रहदेखील गाजले. काही नाटकेही त्यांनी लिहिली.
१९३२ >  लेखक, कवी व ललित निबंधकार मधुकर केचे यांचा जन्म. कवितेपेक्षा ललित निबंधांनी केचे यांना रसिकप्रियता मिळवून दिली. वैदर्भी व्यक्तिरेखांचा ‘वेगळे कुटुंब’ हा संग्रह, आखर अंगण , पालखीच्या संगे हे अन्य ललितलेख संग्रह आणि दिंडी गेली पुढे, पुनवेचा थेंब, आसवांचा ठेवा हे काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
– संजय वझरेकर
navnit.loksatta@gmail.com

First Published on January 18, 2013 12:01 pm

Web Title: fertilizer benefit to lavender
टॅग Navneet,Navnit