एड्रियाटिक समुद्राचे सान्निध्य आणि घराचे दार उघडल्यावर बाहेर असते कालव्याचे पाणी. त्यामुळे व्हेनिसची मुले चालायला शिकतात, त्याबरोबरच नौकानयन आणि पोहायलाही शिकतात. व्हेनिसकरांचे अनेक सणवारही समुद्राशी निगडित आहेत. त्यातील महत्त्वाचा आहे ‘फेस्टा डेला सेन्सा’ ऊर्फ ‘मॅरेज ऑफ सी’ म्हणजेच व्हेनिसचा सागराशी विवाह! गेल्या एक हजार वर्षांपासून, इ.स. १०००पासून दरवर्षी हा फेस्टा व्हेनिसकर मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. १००० साली तत्कालीन डोज म्हणजे व्हेनिसचा सर्वोच्च अधिकारी पिएट्रो द्वितीय याने मिळविलेल्या दोन महत्त्वाच्या सागरी विजयांच्या स्मरणार्थ त्यानेच हा ‘मॅरेज ऑफ सी’ समारंभ सुरू केला. डोज पिएट्रोने त्यांचे पारंपरिक बलिष्ट शत्रूराज्य डालमेशियावर मिळविलेला विजय आणि क्रोशियन लोकांची चाचेगिरी समूळ नष्ट केली. या दोन घटनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा समारोह सुरू झाला. या समारोहात शिरोभागी डोजची बोट, त्यामागे व्हेनिसच्या प्रचंड मोठय़ा तीनशे खलाशी सनिकांची क्षमता असलेल्या चार युद्धनौका, या युद्धनौकांमागे प्रत्येकी पन्नास खलाशी सनिकांनी युक्त अशा चारशे युद्धनौका यांची बिगुल वाजवत काढलेली सागरी मिरवणूक असे याचे स्वरूप होते. इ.स. ११७७ साली व्हेनेशियन लोकांचे पोपशी असलेले वैमनस्य संपले आणि त्यानंतर या ‘मॅरेज ऑफ सी’ला एक धार्मिक अधिष्ठान लाभले. त्यावर्षी डोज फ्रेडरिक आणि पोप अलेक्झांडर तृतीयने आपसात करार करून सलोखा निर्माण झाला आणि समारोहाचे स्वरूप बदलले. व्हेनिसच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रथम मास भरविला जातो. त्यानंतर ख्रिश्चन पुरोहितांकडून समुद्रदेवतेची प्रार्थना केली जाते की ‘व्हेनिसच्या सागरी मोहिमा, व्यापारी दळणवळणाच्या वेळी समुद्रदेवता शांत राहावी.’ डोज आणि त्याच्या कुटुंबावर (सध्या  व्हेनिसचा मेयर) पवित्र पाणी िशपडले जाते. त्यानंतर डोज, समुद्राला सोन्याची अंगठी प्रदान करून प्रथम मेयरची बोट, त्यानंतर युद्धनौका आणि रंगीबेरंगी वस्त्रे परिधान केलेल्या नागरिकांच्या शे-दीडशे बोटींच्या सागरी मिरवणुकीने हा समारोह होतो. समारोहाच्या शेवटी बोटींची शर्यत ‘रिगाटा’ होते. सध्याही हा समारोह तेवढय़ाच उत्साहाने भरतो.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

सुंदरी

बंगालच्या सुंदरबनाचा एकुलता एक वृक्ष मुंबईतही होता. जिजामाता उद्यान, भायखळा,  मुंबई येथे सुंदरीचा एक वृक्ष होता. या वृक्षाकडे बघताच त्याच्या दर्शनाने सुंदरी नावाची सार्थकता पटते. हा वृक्ष या ठिकाणी साधारण १० ते १२ मीटर उंच वाढला होता. त्याची मुळं खोडाच्या भोवताली पसरलेली होती. या वृक्षाची पाने साधारण वडाच्या पानाच्या आकाराची असतात. वरून हिरवी आणि खालच्या बाजूला चंदेरी व थोडी खरखरीत असतात. नर-मादी फुलं एकाच झुपक्यात येतात आणि सर्व फुलांवर नाजूक लव असते. फुलं घंटेच्या आकाराची ५ मिमी लांबीची, साधारण पिवळट हिरव्या रंगाची असतात. फळ टणक, होडीसारखे, गडद भुरकट रंगाचे आणि  ४-८ सेमी लांब असते.

सुंदरीस इंग्रजीत लकिंग ग्लास मॅग्रोव्ह म्हणतात. हे नाव कदाचित पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे आले असावे. हा वृक्ष साधारण समुदकिनारी वाढताना आढळतो. बंगालमधील सुंदरबनाच्या दलदलीत हा वृक्ष मोठय़ा प्रमाणात आढळतो. सुंदरबन हे नाव त्या जागेस कदाचित या वृक्षाच्या नावावरूनच आले असावे. सुंदरी हे या वृक्षाचे स्थानिक नाव आहे.

जुन्या व संपूर्ण वाढ झालेल्या वृक्षास रिबनसारखी नागमोडी वळणाची आधारमुळे असतात. ही मुळे फारच भव्य दिसतात. आणि वृक्षास एक वेगळेच स्वरूप प्रदान करतात.

हा वृक्ष महाराष्ट्रात तसा दुर्मीळच. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी एकमेव आणि सुंदर  देवराईत आहे. दुगोंबा राईत सुंदरीचे पन्नासएक वृक्ष असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे या वृक्षास मोठय़ा आधारमुळ्या तयार झाल्या आहेत. सुंदरीला या भागात समुद्रकांडोळ  असे नाव आहे.

खेदाने सांगावे लागेल की सुंदरीचा एकुलता एक वृक्ष आता जिजामाता उद्यानात पण नाही. अगोदर या वृक्षाची एक फांदी पावसाळ्यात तुटली आणि नंतर संपूर्ण वृक्ष कापण्यात आला. पूर्वी ज्यांनी उद्यानात सुंदरी वृक्ष बघितला ते भाग्यवानच म्हणायचे.

तिवरांच्या गटात मोडणारा हा वृक्ष ज्या अर्थी जिजामाता उद्यानात होता, त्याअर्थी हा वृक्ष समुद्रापासून लांब ठिकाणी वाढू शकतो. तरी या वृक्षाच्या बिया रुजवण्याचा प्रयत्न केल्यास वृक्षसंवर्धनाचे काम केल्याचे समाधान मिळेल आणि हा वृक्ष पुन्हा प्रस्थापित होईल.

– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org