काही कालावधीसाठी अनेक कंपन्या सोयाबीनपासून तंतू उत्पादन करीत असत. अमेरिकतील फोर्ड मोटर कंपनी सोयाबीन तंतू बनवून ते गालिचे, शीट कव्हर यांसारख्या उपयोगासाठी वापरत असे. जपानमध्ये सोयाबीन तंतू उत्पादित केला जात असे व त्याला सिल्कुल असे म्हणत असत. या तंतूंमध्ये रेशीम व लोकर या दोन्ही तंतूंच्या गुणधर्माचा सुंदर संगम असल्याने हे नाव दिले गेले असावे. या तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेत सोयाबीनच्या बिया ठेचून त्यातील तेल काढून घेतले जाते. त्यानंतर तेल काढलेल्या बियांच्या उर्वरित भागाशी सौम्य सोडियम सल्फाइटशी रासायनिक प्रक्रिया केली असता त्यांतील प्रथिन सोडियम सल्फाइटमध्ये विरघळते. या प्रथिनाचा अ‍ॅसिडच्या साहाय्याने साका करून इतर पुनर्जनित प्रथिन तंतूंप्रमाणेच आद्र्र कताई पद्धतीने उत्पादन केले जाते. या तंतूंची ताकद खूपच कमी असते आणि ओले केल्यावर तर ती ६०% पेक्षा कमी होते. त्यामुळे ज्या प्रकारच्या कापडात तंतूंची ताकद कमी महत्त्वाची असते आणि जे वारंवार धुतले जात नाहीत, अशा कापडात या तंतूंचा वापर होतो.
प्रथिन तंतू आणि आरामदायीपणा :
लोकर हा तंतू सर्व प्रकारच्या वस्त्रांसाठी सर्वागाने उत्कृष्ट तंतू मनाला जातो आणि तो खूप महागही असतो. पुनर्जनित प्रथिन तंतू हे लोकरीच्या सर्वार्थाने जवळपास जाणारे तंतू आहेत. वस्त्रांमध्ये सर्वात महत्त्वाचे काय असेल, तर त्यांचा आरामदायीपणा. पुनर्जनित प्रथिन तंतू हे आरामदायीपणाच्या बाबतीत लोकरीइतकेच चांगले होते; परंतु या सर्व तंतूंचा कच्चा माल हा खाद्यपदार्थ असल्यामुळे तंतू बनविण्यासाठी तो मिळणे दुरापास्त झाले आणि म्हणूनच या तंतूंचे उत्पादन कालबाह्य़ झाले.
सध्याच्या जगात मानवनिर्मित तंतूंचा वापर वाढला असला तरी नसíगक तंतूंचा वापरसुद्धा सुरू आहे. विशिष्ट उपयोगासाठी नसíगक तंतूंचा वापर होतोच आहे. शिवाय मानवनिर्मित आणि नैसर्गिक तंतूंची वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रणे करून त्याचा वापर केला जात आहे. यामुळे दोन्ही प्रकारच्या तंतूंचे गुणधर्म आणि त्यापासून मिळणारे फायदे याचा ग्राहकाला लाभ होत आहे.
चं. द. काणे  (इचलकरंजी),मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – बस्तर राज्यस्थापना आणि विलय
छत्तीसगढ या २००० साली नव्याने तयार झालेल्या राज्यात अंतर्भूत झालेला बस्तर हा जिल्हा पूर्वी मध्य प्रदेशात होता. आदिवासी जमातींचे आधिक्य असलेल्या बस्तरच्या प्रदेशाला रामायणात ‘दंडकारण्य’ असे नाव होते. महाभारतात हा कोशल राज्याचा भाग होता. राजपुतांच्या भांज या घराण्यातील आनंद देव वर्मा याने १३२४ साली स्थानिक देवता दंतेश्वरीच्या आशीर्वादाने बस्तर येथे आपले छोटेसे राज्य स्थापन केले. आनंद देवाच्या वारसांनी बस्तरच्या आसपासच्या प्रदेशावर आपली जमीनदारी वाढवून बस्तर येथील आपले मुख्य ठाणे जगदाळपूर येथे हलविले. पुढे मराठे प्रबळ झाल्यावर अठराव्या शतकात बस्तरचे शासक त्यांना नियमितपणे खंडणी देत असत.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली हे राज्य आले. ब्रिटिशांनी मध्य भारतातील अनेक संस्थानांचे मिळून सेंट्रल प्रोव्हिन्सेस हा प्रांत १८६१ साली तयार केला. त्याच वर्षी ब्रिटिशांनी बस्तरचा प्रमुख शासक भौरामदेव याच्या राज्याला आणखी काही गावे जोडून बस्तरचे ‘संरक्षित संस्थाना’त रूपांतर केले. ३३८००चौ.कि.मी. अशा प्रचंड मोठय़ा राज्यक्षेत्राच्या या संस्थानाची लोकसंख्या १९०१ साली ३०६०० होती. बस्तर संस्थानात सध्याच्या दंतेवाडा, कांकेर आणि बस्तर या जिल्ह्यांचा प्रदेश अंतर्भूत होता. राज्याचा ७० टक्क्यांहून अधिक प्रदेश जंगलांनी व्यापलेला होता व त्यामुळे साहजिकच ८० टक्क्यांहून लोकसंख्या आदिवासी जमातींची होती. त्यामध्ये गोंड, मडिया, मुरिआ, ध्रुळ, हळबा या जमातींचे प्राबल्य होते. प्रत्येक जमातीची भाषा, संस्कृती, राहणीमान विभिन्न होते.
बस्तरचे अस्तित्व टिकवण्याच्या लढाया १८९९ पासून अनेकदा होत राहिल्या. प्रवीरचंद्र भांजदेव हा बस्तरचा विसावा शासक (हे आमदारही होते) २५ मार्च १९६६ रोजी भारत सरकारच्या पोलीस कारवाईत बळी पडला. त्यानंतर येथे डाव्या संघटनांनी पाय रोवणे सुरू केले. सध्या या प्रदेशात माओवादी संघटना आणि नक्षलवादी संघटनांनी अस्थिरता आणि अशांतता निर्माण केली आहे.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com