ग्राहकाच्या हातात कापड पडण्यापूर्वी आणि रंगाई वगरे सर्व प्रक्रिया संपल्यानंतर जी अंतिम प्रक्रिया कापडावर केली जाते, ती फिनिशिंग म्हणून ओळखली जाते. या प्रक्रियेचा उद्देश ग्राहकाला कापड वापरण्यास आल्हाददायक वाटावे, त्याची चमक वाढवून स्पर्शही मऊ मिळावा असा असतो. याच उद्देशाने फिनििशगची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत यांत्रिक प्रक्रिया किंवा रासायनिक प्रक्रिया किंवा दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. ब्लिचिंग, रंगाई आणि छपाई झालेले कापड प्रथम रासायनिक प्रक्रिया पार करून मग फिनििशगसाठी पाठवले जाते. या प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने कापडाला मुलायम स्पर्श लाभेल अशा उद्देशाने वापरली जातात तर यांत्रिक प्रक्रियेद्वारे कापडाचा पोत आणि चमक वाढेल असा उद्देश ठेवलेला असतो. रासायनिक प्रक्रिया दोन प्रकारच्या असतात. त्यामध्ये काही प्रक्रिया कापडाच्या गुणात भर घालणाऱ्या असतात तर दुसऱ्या काही प्रक्रिया कापडातील वापरण्याच्या दृष्टीने अनावश्यक घटक कमी करणाऱ्या असतात. कापडाच्या गुणात भर घालण्याच्या प्रक्रियांमध्ये वापरली जाणारी रसायने कापडात किंवा तंतूत शोषली जातात आणि त्यामुळे कापडाचे वजन वाढते. दुसऱ्या प्रकारच्या प्रक्रियांमध्ये कापडातील काही घटक काळजीपूर्वक आणि कापड खराब न होता काढले जातात. बऱ्याच वेळा ह्य़ा प्रक्रियेनंतर कापडाचे वजन कमी होते आणि ते स्वाभाविकच आहे. या रासायनिक प्रक्रियांद्वारे कापडाचा देखणेपणा वाढवला जातो, त्याचा स्पर्श बदलला जातो; कापडाची लांबी-रुंदी कायम राखली जाते, कापडाचा टिकाऊपणा वाढवून कापडातील तंतूंचे रक्षण करीत वापरण्यासाठी ते कापड सुयोग्य होईल, असे पाहिले जाते.
काही प्रक्रिया कमी कालावधी टिकणाऱ्या असतात तर इतर काही प्रक्रिया दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. ऑरगंडी साडीचा कडकपणा दीर्घकाळ टिकणारा परिणाम म्हणून लक्षात घेता येईल. सेंद्रिय द्रावणाचा वापर करण्याऐवजी अर्धप्रवाही माध्यमांचा वापर या पद्धतीत काही वेळा केला जातो. त्याद्वारे व्यावसायिक आणि पर्यावरणीय अशा दोन्ही बाजू यशस्वीपणे सांभाळल्या जातात. ही प्रक्रिया करताना रसायनांचे प्रमाण अचूक ठेवावे लागते. रसायन कमी प्रमाणात वापरले तर योग्य परिणाम साधता येत नाही. जर रसायनांचे प्रमाण जास्त झाले तर ते काढून टाकायचा उपाय करावा लागेल, त्यामुळे प्रक्रिया खर्चात वाढ होईल. एकूण खर्च मर्यादित ठेवण्यासाठी अचूकता सांभाळायला हवी.
सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – रझाकारी चळवळ
हैदराबाद संस्थानाचा अखेरचा निजाम उस्मानअली हा स्वत: इस्लाम धर्माचा सर्वोच्च नेता म्हणजे खलीफा बनून हैदराबाद या स्वतंत्र इस्लामी राष्ट्राचा अधिपती बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेला होता. १९४७ साल उजाडले आणि हिंदुस्थानला स्वराज्य मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली. हैदराबाद हे आपले स्वतंत्र राष्ट्र राहावे म्हणून निजाम उस्मान अलीने आपल्या आश्रयाखाली असलेल्या रझाकार संघटना, खाकसार पार्टी, दीनदार सिद्धिक संघटना, निजाम सेना इत्यादींमार्फत संस्थानात ८६ टक्के असलेल्या हिंदू प्रजेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्वात अग्रेसर होती कासीम रझवी याची ‘रझाकार’ ही संघटना. कासीम रझवी हा मूळचा लातूरचा राहणारा. विलक्षण धाडसी आणि धर्मवेडा कासीम हैदराबाद संस्थानात वकिली करीत होता. ब्रिटिश राजवट सत्तांतर करीत असल्याची चिन्हे पाहून या धूर्त वकिलाने ‘रझाकार’ आणि ‘इत्तेहादुल मुस्लीम’ या संघटनांमार्फत हैदराबादेत एक वादळ उठविले. १९४६ ते १९४८ या तीन वर्षांत त्याने संपूर्ण संस्थान हलवून सोडले. विलक्षण प्रभावी वक्तृत्व असलेला कासीम आपल्या कमावलेल्या उर्दू भाषेत बोलू लागला की श्रोते भारावून जात, त्याचे शब्द हिंदूंवर सतत आग पाखडीत असत. त्याच्या बेताल भाषणांमधून त्याच्या रझाकार अनुयायांची संख्या वाढत जाऊन दोन लाखांहून अधिक झाली. या सशस्त्र रझाकारांसाठी सिडने कॉटन नावाचा एक आंतरराष्ट्रीय गुंड रझवीला शस्त्रास्त्रे पुरवीत असे. क्रूर आणि भयावह अशा त्या हत्यारबंद मुलकी सन्याकडून हिंदू प्रजेवर रझवीच्या आदेशाने जुलूम सुरू झाला आणि या अत्याचारांना निजाम आणि त्याचे पोलीस यांचा आशीर्वाद होता. अखेरीस हैदराबादच्या हिंदू प्रजेची या हालअपेष्टांमधून सुटका केली वल्लभभाई पटेलांनी सप्टेंबर १९४८ मध्ये भारतीय फौज हैदराबादेत घुसवून! १७ सप्टेंबर १९४८ रोजी कासीम रझवीला अटक करून सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा भोगल्यावर तो पाकिस्तानात गेला. १० जानेवारी १९७० रोजी नराधम कासीम रझवीचा पाकिस्तानात मृत्यू झाला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com