इ.स.१११५पर्यंत टस्कनी ऊर्फ तोस्काना या इटलीच्या प्रांतातील राज्यकत्रे माग्रेव्ह या घराण्याच्या सत्तेखाली फ्लोरेन्स अंतर्भूत होते. १११५ साली माग्रेव्ह राणी मटिल्डाचा मृत्यू झाल्यावर फ्लोरेन्सच्या जनतेने माग्रेव्ह हुकूमत झुगारून देऊन तेथे प्रजासत्ताक राज्यव्यवस्था सुरू केली. हे प्रजासत्ताक पुढे ४१७ वष्रे म्हणजे इ.स.१५३२ पर्यंत टिकले. या प्रजासत्ताकात फ्लोरेन्सची जनता दर दोन वर्षांसाठी एका प्रमुख प्रशासकाची (गोनाफॅलोनियेरे) निवड करी. हा प्रशासक मग जनतेतून शंभर लोकांची निवड करून त्यांची एक प्रशासकीय समिती (सिग्नोरिया) स्थापन करीत असे. प्रजासत्ताकाचा प्रशासक हा प्रत्यक्षात नामधारी राजाच असे. प्रजासत्ताकाच्या चार शतकात अनेकदा कटकारस्थाने, बंड, अशांतता यांना हे प्रशासक तोंड देत राहिले. इ.स. १४३४ मध्ये कोसिमो दे मेदिची याने प्रजासत्ताकाच्या समितीवर नियंत्रण मिळविले. कोसिमो मेदिचीचे फ्लोरेन्स प्रजासत्ताकावर १४९४ सालापर्यंत नियंत्रण राहिले. पुढे मेदिची घराण्याचा जियोव्हानी दे मेदिची याने १५१२मध्ये पुन्हा प्रशासकीय समितीवर ताबा मिळवला. जियोव्हिनी मेदिची हाच पुढे पोप लिओ दहावा म्हणून प्रसिद्ध झाला. १५२७ साली लीग ऑफ कोन्याकच्या युद्धामुळे मेदिची घराण्याची सत्ता परत एकदा त्यांच्या हातून गेली. पण पुढे नंतर फ्लोरेन्स शहराला वेढा घालून १५३१मध्ये या घराण्याने गेलेली सत्ता परत मिळवली. अलेसँड्रो दे मेदिची फ्लोरेन्स प्रजासत्ताक प्रमुख झाला त्या वेळी त्याचा चुलता पोप क्लेमंट सातवा याने अलेसॅण्ड्रोला फ्लोरेन्सचे राजेपद (डय़ूक) देऊन १५३३ साली फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक मोडीत काढले. फ्लोरेन्सची जनता पोपच्या या निर्णयामुळे संतप्त होऊन यादवी माजली. पण मेदिची यांनी थोडय़ाच दिवसात यादवी काबूत आणली. १५६९ साली पोपने मेदिची घराण्याला वंशपरंपरागत राजेपद बहाल करून त्याच्या पुढच्या वारसांना टस्कनी परगाण्याचे राजेपद (ग्रॅण्ड डय़ूक ऑफ टस्कनी) दिले. मेदिची घराण्याचे टस्कनी आणि फ्लोरेन्सचे राजेपद इ.स. १७३७पर्यंत टिकले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

केळ

केळे हे बेरी प्रकारातले फळ आहे. टोमॅटो, पेरू या बेरी जातीतल्या फळांपेक्षा केळी वैशिष्टय़पूर्ण फुलोऱ्यातून तयार होतात. ज्याला आपण केळफूल म्हणतो ते म्हणजे अनेक फुलांभोवती आवरण असलेला फुलोरा. फुलोऱ्याचा मोठा दांडा भूमिगत खोडातून बाहेर येतो. त्यावर ठरावीक अंतरावर पेर असतात. प्रत्येक पेरावर गोलाकार पद्धतीने लांबट आकाराची खूप फुले येतात. प्रत्येक पेरावरची सर्व फुले काळपट तांबूस किंवा तांब्याच्या रंगाची चिवट आणि चिकट आवरणाने झाकलेली असतात. दोन पेरातलं अंतर खूप कमी असल्याने ही आवरणे एकमेकांवर येऊन झाकली जाऊन पाणबुडीच्या आकाराचा फुलोरा तयार होतो. हेच ते केळफूल. त्याचं वजन वाढतं आणि दांडोऱ्यावरच उलट होऊन लोंबतं. प्रत्येक पेरावर एकावर एक अशा दोन रांगेत फुले येतात. पहिली येणारी सर्व फुले मादी फुले असतात. परागीभवन न होता यातील परागकोश फुगतात आणि त्यांची केळी तयार होतात. त्यामुळे एका पेरावर केळ्याचे दोन घड तयार दिसतात. केळ्याच्या दुसऱ्या टोकावर फुलाचा वळलेला भाग दिसतो. दांडोऱ्याच्या अगदी टोकाला हळूहळू नर व वांझ फुलं येतात. त्याच्या वरच्या भागात मादी फुलं येतच राहतात. नर फुलातले परागकण फारसे सक्षम नसतात, त्यामुळे परागीभवन सहसा होत नाही. आणि झालेच तर सूक्ष्म बिया तयार होतात. त्यामुळे केळे उभे कापले तर मध्यभागात काळ्या बिया दिसतात. मादी फुलांना जेव्हा दुसऱ्यांदा बहर येतो तेव्हा टोकाकडे नर फुले येतात. मादी फुलांचे फळात रूपांतर होताना  नर फूल गळून पडतात. फुलांच्या पाकळ्या आणि त्यावरची रंगीत आवरणे वाळतात, कुरकुरीत होतात. ज्या केळफुलांची भाजी करतात तो फुलोऱ्याचा शेवटचा भाग असतो. त्यात फक्त नर फुले आणि वांझ फुले असतात. या फुलांत चिकट द्राव असतो. त्यात फेनॉलिक व अ‍ॅरोमिक अ‍ॅमिनो ही संयुगे असतात. हवेशी संपर्क आला की ते काळे पडतात. भाजीची केळी ही ‘प्लॅन्टेन’ प्रकाराची केळ्याची जात आहे. या केळ्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. आपण नेहमी जी केळी खातो ती बसराई, रोबेस्टा ग्रँड या प्रकारातली आहेत.

डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org