प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही. याचाच फायदा घेऊन पॉलिथिलिनपासून बनवलेल्या डब्यात खाद्यपदार्थ आणि औषधे ठेवता येतात. पाणी पिण्यासाठी याच कारणाने प्लास्टिकचे भांडे वापरायला काही हरकत नाही. मात्र असे भांडे अथवा कोणताही डबा वारंवार साफ करून वापरला पाहिजे. पाण्यात प्लास्टिक विरघळेल अशी भीती बाळगायचे कारण नाही.
धातूच्या भांडय़ाप्रमाणे प्लास्टिकची भांडी स्वयंपाकासाठी गॅसवर ठेवता येतील का? असाही प्रश्न विचारला जातो. प्लास्टिक जास्त उष्णतेत टिकू शकत नसल्याने भांडे गॅसवर ठेवता येणार नाही. मात्र निल्रेपची भांडी स्वयंपाकासाठी गॅसवर वापरता येतात. या भांडय़ात धातूवर आतल्या बाजूला टेफ्लॉन ऊर्फ पॉलिटेट्रा फ्लुरो इथिलिन या प्लास्टिकचा थर दिला जातो. टेफ्लॉन उष्णताविरोधक असून त्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे भांडय़ात शिजवला जाणारा पदार्थ भांडय़ाला चिकटत नाही. तसे पाहिले तर सर्व प्लास्टिकच्या वस्तू चटकन जळतात असा लोकांचा समज आहे. पॉलिस्टायरीन किंवा सेल्युलोज नायट्रेट या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू चटकन जळतात. पूर्वी चित्रपटाची फिल्म सेल्युलोज नायट्रेटपासून बनवत. ती फिल्म चटकन पेट घेत असे. म्हणून नंतर सेल्युलोज अ‍ॅसिटेटपासून फिल्म बनवण्यात येऊ लागली. ही फिल्म सुरक्षित असून ती लवकर पेट घेत नाही. स्वयंपाकघरात वापरण्यासाठी हल्ली युरिया फॉर्मल्डिहाइड किंवा मेलॅमिन फॉर्मल्डिहाइडपासून बनवलेली भांडी मिळतात. ही भांडी चिनी मातीच्या भांडय़ासारखी दिसत असली तरी ती सहजी फुटत नाहीत किंवा पेट घेत नाहीत.
अ. पां. देशपांडे, (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – अंडी की खळगे?
चित्र छोटंसं आणि अगदीच क्षुल्लक वाटेल. इतरत्र दिसलं तर पुन्हा आपण पाहाणारही नाही. क्षणभर चित्राकडे नीट पाहा. इथे आपल्याला अनेक छोटी छोटी वर्तुळं दिसताहेत, अर्धचन्द्रकारासारखी. काहींचा छायांकित अर्धगोल वर, तर काहींचा खालच्या बाजूला. म्हणजे प्रकाशांकित अर्धा भाग वर किंवा खाली अशी रचना आहे.
वरचा अर्धगोल प्रकाशांकित असलेली वर्तुळं सफेद अंडय़ाच्या आकाराची कागदावरून पुढे आलेली आहेत असं वाटतं, तर ज्यांचा वरचा भाग काळा आहे ती वर्तुळं खोलगट (कॅव्हिटी) आहेत असं वाटतं.
थांब, त्यात काय विशेष? वाटलं तर वाटलं, असं म्हणून विषय झटकू नकोस.
कारण या छोटय़ाशा चित्रामधून मानवी मेंदूच्या प्रगतीचा, कार्यपद्धतीचा, लाखो वर्षांचा इतिहास प्रतीत होतो.
अंडं किंवा लहानसा खळगा या गोष्टी दिसणं, हा केवळ भास असतो. कागदावरून वर उठणारा अंडय़ांचा अर्धगोल किंवा खळगा हा फक्त भास असतो. प्रत्यक्षात हे चित्र द्विमितीमध्ये आहे. मग असा भास का व्हावा? आता हेच चित्र उलटं करून पाहिलंस तर खळग्याच्या जागी अंडी आणि अंडय़ाच्या जागी खळगे दिसतील असा दृष्टिभ्रम का व्हावा?
हर्मन हेमहिल्टझ् नावाच्या जर्मन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने मानवी मेंदूमध्ये दृश्य संवेदना कशा संरचित होतात, त्याचा शतकापूर्वी अभ्यास केला. आजही त्याचं नाव ‘ऑप्टिक्स’ शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानं मानवी मेंदूमध्ये दृश्य प्रतिमा साकार होता क्षणीच त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मानवी मेंदू करतो, असा सिद्धान्त मांडला. ही अर्थनिरूपणाची आणि निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया आपोआप अथवा नेणीव पातळीवर घडते. याला त्यानं ‘अनकॉन्शस इन्फरन्स’ असं नाव दिलं. याचा आपण अनेकदा अनुभव घेतो. उघडझाप करणाऱ्या दिव्यांच्या रांगांमधील प्रकाश पळत सुटल्याचा आभास होतो. मग हेल्महिल्टझ्च्या सिद्धान्तावरून माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट कशी उलगडते?
माणूस नावाचा प्राणी दोन पायांवर उभा राहू लागल्यानंतर त्याच्या डोळ्यांच्या हालचाली इतर प्राण्यांपेक्षा मर्यादित झाल्या. मुख्यत: डोळे वर-खाली हलतात. त्यामुळे प्रकाश (सूर्यप्रकाश) कुठूनही येत असला तरी त्याची जाणीव ‘वरून येतोय’ अशी होते. प्रकाश वरून खाली येत असल्यानं वरचा भाग अधिक प्रकाशमान असतो अशी समजूत होते आणि हाच प्रकाश खळग्याच्या आतल्या बाजूस आहे असं वाटतं. वाटतं म्हणजे तसा निष्कर्ष आपण काढतो.
मेंदू, प्रकाशाची दिशा, पाहाणं आणि स्वत:ला सुरक्षित राखण्यावरून धडपडणं यातून हा दृष्टिभ्रम निर्माण झाला. याचा उपयोग पुढे छायाचित्रकार आणि चित्रकारांनी भरपूर केला. चित्रामधला उजळ भाग अधिक आश्वासक वाटतो, तो यासाठीच. कसा घडला ना माणूस!!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजाची नीतिमत्ता
‘‘आमच्या बुद्धिजीवि मध्यमवर्गीयांच्या संस्कृतीची स्थिति आज शीड नसलेल्या तारवाप्रमाणें झाली आहे. स्वार्थाच्या आणि अहंकाराच्या भोवऱ्यांत ती सांपडल्यानें बाहेर पडण्याचा मार्ग तिला आज दिसत नाही. पारतंत्र्य जाऊन स्वातंत्र्य आलें, द्विभाषिक जाऊन संयुक्त महाराष्ट्र आलें, बाहेरचें जग अशा तऱ्हेनें कितीतरी बदललें, तरी या बदलत्या जगाचे पावलावर पाऊल टाकून स्वत: बदलणें बुद्धीच्या घमेंडीमुळें या संस्कृतीला अपमानाचें वाटतें. मेथ्यु अनरेल्ड या आंग्ल टीकाकारानें अशा जातीच्या लोकांना ‘Philistines’ असें संबोधून खऱ्या सांस्कृतिक गुणांचा अभाव असलेल्या अशा लोकांमुळें समाजांत अराजक माजतें, असें म्हटलें आहे. अशा तऱ्हेचें अराजक सध्यां महाराष्ट्रांत माजलें आहे. कोणत्याच गोष्टींत कांहींहि चांगलें न पहातां इतरांच्या चांगल्या कार्यावर टीका करणें, हा प्रकार आपल्या समाजांत आज वाढत्या प्रमाणांत रूढ होत आहे. समाजावर अशी टीका करणारे हे लोक स्वत: मात्र ‘उपनगर संस्कृतीचे’ दासानुदास बनत आहेत. प्लॉट, बंगला, मोटार, रेडिओ, सोफासेट या गोष्टींमध्यें हा वर्ग वाढत्या प्रमाणांत दंग आहे. भोंवतालच्या जगांत आपल्याच लोकांचे खून पडले, जाळपोळ झाली, लूटमार फैलावली, तरीहि या वर्गाची मन:शांति ढळत नाहीं, सुखलोलुपपणा यत्किंचितहि कमी होत नाहीं. ’’ अशी महाराष्ट्रातील बुद्धिवादी,  सुशिक्षित समाजाची नीतिमत्ता झाडाझडती घेत त्र्यं. शं. शेजवलकर पुढे म्हणतात –  ‘‘महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेच्या अवनतीची समस्या व्यासपीठावरील उपदेशानें, अथवा व्याख्यानबाजीनें सुटूं शकेल असें मला प्रामाणिकपणें वाटत नाहीं. कायदे करून अथवा शाळाकॉलेजांतून बौद्धिकें घेऊनहि या प्रश्नाची सोडवणूक होण्यासारखी नाहीं. नीतिमत्ता हा विषय मूलत: परंपरा, आदर्श आणि अंत:प्रेरणा यांच्या कक्षेंत येणारा विषय आहे. हे आदर्श, परंपरा अथवा अंत:प्रेरणा समाजमनांत निर्माण व्हावयाच्या तर आमच्या बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजांत त्या प्रथम निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे या लोकांच्या उदाहरणावरून झिरपत झिरपत त्या समाजाच्या खालच्या थरांपर्यंत येऊं शकतील.’’