फळझाडांना सुरुवातीच्या काळात फारच कमी पाणी लागते. आंबा, काजू यांना तर प्रतिदिन एक लीटर पाणी पुरेसे होते.       
एक एकरात ८० फळझाडे लावतात असे समजल्यास, पावसाळा सोडून प्रतिदिन एक लीटर प्रमाणे ८० ७ १ ७ २४० = १९,२०० लीटर पाणी लागेल. ज्या झाडांना प्रतिदिन २ लीटर पाणी लागते, अशा झाडांना प्रती एकर अंदाजे ४०,००० लीटर पाणी लागेल. अशा प्रकारे एका एकरातील फळझाडांना किती पाण्याचा साठा लागतो, ते काढता येईल. झाडांना पाणी देण्यासाठी मातीचा डिफ्युजर, बांबूचा कळक, भोके असलेली प्लास्टिकची दोन लीटरची बाटली, जीवनवाहिनी इत्यादीचा वापर केल्यास पाणी कमी लागते. ५००मीमी सरासरी पाऊस ज्या ठिकाणी पडतो, त्या ठिकाणी प्रती एकर पाण्याची उपलब्धता ४००० ७ ०.५ = २००० घनमीटर म्हणजे सुमारे २० लाख लीटर एवढी आहे. तसेच ज्या ठिकाणी ४००० मीमी पाऊस पडतो, तिथे प्रती एकर पाण्याची उपलब्धता ४००० ७ ४ = १६,००० घनमीटर म्हणजे १६० लाख लीटर एवढी आहे. फळझाडांना लागणारे पाणी यापेक्षा बरेच कमी असल्याने ते साठवून ठेवणे शक्य आहे.
कोकण जलकुंड, बंकर कुंड, जीओमेंब्रेनचे तळे, नारळाचा काथ्या, केळीचे धागे, अंबाडीचे धागे, तागाचे धागे इत्यादी वापरून केलेले जलकुंड, फेरोसिमेंटची जमिनीखाली वा जमिनीवर बांधलेली टाकी, सांगाडा वापरून वा न वापरता बांधलेली १००० लीटर फेरोसिमेंटची टाकी यांमध्ये पाणी साठवता येते.
टाक्यांमधील पाणी बाष्पीभवनाने उडून जाऊ नये यासाठी बांबूची चौकट करून भाताचा पेंढा किंवा सुके गवत, कशेळी पसरून किंवा नारळाच्या झावळ्यांनी झाकण बनवावे. पाण्याने जलकुंड भरल्यावर उंडी तेल/नीम तेल टाकावे. त्याने बाष्पीभवन कमी होते व उग्र वासामुळे मोकाट जनावरे, उंदीर, िवचू, सरडा जलकुंडाजवळ जात नाहीत व जलकुंड सुरक्षित राहाते.              एक एकरावरील झाडांना लागणारे पाणी एके ठिकाणी न साठवता जर पाच किंवा सहा ठिकाणी साठवले तर प्रत्येक जलकुंड झाकून ठेवणे सोपे जाईल. अशा प्रकारे साठवलेले पाणी पुढील पावसापर्यंत वापरता येईल.  
– उल्हास परांजपे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस : गांधी उठणे : शीतपित्त
म्हटले तर हा विकार साधा व सोपा आहे. बऱ्याच वेळा सामान्य दिसणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने काटय़ाचा नायटा होतो तसे या विकारात घडते. रोगाचे मूळ लहान असते. सुरूवातीचे स्वरुप नगण्य असते. पण कारणाकडे लक्ष न देण्याची नेमकी चूक घडते व इतर उपचार केले जातात.
गांधी उठण्याच्या कामामध्ये कफ व पित्त, थंडी व उष्णता असे सरळ प्रकार करता येतात. त्यातील आग अगोदर का खाज अगोदर हे समजून न घेतल्यामुळे रोग्याचा व डॉक्टर वैद्यांचा गोंधळ होतो व त्याचा भोग रोग्यालाच भोगावा लागतो. नंतर याचे महत्त्व पटते. रोग्याला नेमके प्रश्न विचारणे, त्याचा इतिहास नेमका क्रमवार घेणे व नेमका उपचार करणे या गणिताचीच पाश्र्वभूमी उपयोगी पडते. दिवसेंदिवस शीतपित्त, खूप खाज, गांधी उठणे अशा रुग्णांची संख्या वाढती आहे. मुंबईत हे रुग्ण जास्त आढळतात. कारणे अनेक आहेत. मुंबईतील दमट हवा, नाईलाजाने हॉटेलमधील जेवण; आंबवलेले शिळे अन्न, मांसाहार, फ्रुटसॅलड, इडली, डोसा, लोणची, पापड, चहा, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंक यांचा सातत्याने वापर इ.कारणांनी शरीरातील उष्णता वाढली व त्याला बाहेरचा गारठा लागला की हा विकार हमखास होतो. भरीस भर म्हणून सतत वातानुकूलित किंवा पंख्याखाली काम करणे, झोपणे,  दारू, तंबाखूसारखी व्यसने; किडा, कोळी, विंचू अशांचे दंश, साबणाचा अतिरेकी वापर, स्टिरॉइडसारखी तीव्र औषधे अशा कारणांची भर पडली की रोग बळावतो, वाढतो. असे रुग्ण अंग खरा-खरा खाजवतात; खाजविल्यावर आणखी गांधी उठतात. तात्पुरते बरे वाटते. पुन्हा खाजवतात. हा रोग थंडीत, माणूस रिकामा असताना व सायंकाळी वाढतो. सर्वात सोपा उपाय मिरेपूड व तूप खाज सुटणाऱ्या भागाला घासून लावावे. अळणी जेवावे. शिळे अन्न, दही, लोणचे, पापड पूर्ण वज्र्य करावे. रात्रौ त्रिफळा चूर्ण घ्यावे. लघुमालिनीवसंत, लघुसूतशेखर, प्रवाळ, कामदुधा या गोळ्या दोन वेळा घ्याव्या. काळ्या मनुका खाव्या. ‘द्राक्षा फलोत्तमा’!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..कर्करोग आणि उत्क्रांती
खरे बघायला गेले तर ज्या दिवशी पहिला जीव जन्मला त्याच दिवशी कर्करोग किंवा Cancer  या जीवाला होऊ शकेल हेही ठरले. सूर्यापासून पृथ्वी निघाली तेव्हा ती केवळ भिरकावली गेलेली ज्वालाच जणू होती. मग ती स्वत:भोवती घोंगावू लागली तेव्हा गोल वलयासारखी भासली असणार. पुढे ती थंड होऊ लागली तशी लाल लाल गोळ्यासारखी होती. मग आणखी निवली. मग पाणी साठले आणि छोटे-मोठे समुद्र तयार झाले. उष्णता प्रचंड होती तेव्हा दिवसा हे समुद्र गरम होऊन उकळत असत, कारण सूर्याच्या ऊर्जेचा मारा सतत चालू असे. पुढे हा मारा चालूच राहिला; परंतु पाण्याची वाफ आणि इतर वायूंच्या आवरणाचे या पृथ्वीने पांघरूण घेतल्यासारखे झाले. समुद्र निवले आणि थोडी का होईना शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे सतत भरकटणाऱ्या अणू-रेणूंना एकत्र बसता येईल, असा जमाना आला. खोल पाण्यात कोठे तरी कपारीत अंधूक उजेडात या अणू-रेणूंचे थर किंवा पापुद्रे तयार झाले. हे बाहेर उष्ण असेल तर गरम होत, बाहेर थंड असले तर थंड होत. हेच त्यांचे वर्तन आणि परिवर्तन आणि एक दिवस काही तरी घडले ज्यामुळे यांच्यात बाहेरहून येणाऱ्या ऊर्जेच्या माऱ्यामुळे उत्परिवर्तन घडले. या उत्परिवर्तनात त्या रेणूंमध्ये एक विलक्षण फरक पडला. त्या त्यांच्या छोटय़ाशा घराच्या आसपास जे Sulphur  (गंधक) किंवा नायट्रोजन किंवा Carbon होते त्यांची संयुगे आत घेण्याची, त्यांचा वापर करण्याची प्रक्रिया घडली आणि या प्रक्रियेमुळे एकाच ठोक्यात ते स्वतंत्र झाले खरे; परंतु परतंत्रही झाले, कारण ते आपल्या आसमंतातल्या चैतन्यावर जगू लागले.
 बाहेरची ऊर्जा घेण्याचे तंत्र त्या अणू-रेणूंच्या एका पुंजक्याने शक्य केले. ‘मूर्ती लहान कीर्ती महान’ या म्हणीचे हे उत्तम उदाहरण होते. समजा हे अणू-रेणू २४ होते. मग ते बरोबर अर्धे दुभंगले तर दोन तसेच जीव निर्माण होतात. काळ गेला. बाहेरच्या ऊर्जेचा मारा अजून तसाच होता त्यामुळे या जीव साकार करणाऱ्या अणू-रेणूंत अनेक फरक पडत गेले आणि निरनिराळे जीव जन्मले. जे धडधाकट होते त्यांनी तग धरला, जे नव्हते त्यांची निसर्गाने कदर केली नाही. निसर्गात जन्मलेल्यांना दया-माया असते. निसर्गाला नसते. या अणू-रेणूंच्या पुंजक्याला आपण जनुके म्हणतो, कारण ती जन्मदाती असतात. या जनुकांमधले ऊर्जेच्या माऱ्यामुळे होणारे काही बदल दहशतवादी, बंडखोर, स्वार्थी, सत्तालोलुप, हावरट पेशी निर्माण करतात. त्याला कॅन्सर म्हणतात. ही आपलीच वाह्यात भावंडे असतात. माझा एक मित्र आहे. तो म्हणतो, त्याला जर कॅन्सर झाला तर तो त्याच्या या वाह्यात भावंडांकडे बघेल आणि म्हणेल, आता तुझे राज्य सुरू झाले आहे. तू चालव. मी माझे आटोपते घेतो.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत :९ फेब्रुवारी
१८७४> ‘सुंदर मी होणार, हो! मरणाने जगणार’ किंवा ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ अशा अजरामर कविता रचणारे ‘स्वातंत्र्यशाहीर’ कवी गोविंद (गोविंद त्र्यंबक दरेकर) यांचा जन्म. ‘टिळकांची भूपाळी’, ‘स्वातंत्र्यलक्ष्मी स्तवन’ आदी कविताही त्यांनी लिहिल्या.
१९३३ > ‘श्यामची आई’ चे लेखन साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात सुरू केले.
१९४४ > ‘भावप्रकाश’ हा संस्कृत ग्रंथ मराठीत आणणारे आयुर्वेदाचार्यपुरुषोत्तम गणेश नानल यांचे निधन.  
    १० फेब्रुवारी
१९१०> संशोधक वृत्तीच्या निर्भीड लेखिका दुर्गा भागवत यांचा जन्म. ‘पैस’, ‘ऋ तुचक्र’, ‘व्यासपर्व’ अशी ललित पुस्तके लिहिणाऱ्या दुर्गाबाईंनी ‘लोकसाहित्याची रूपरेखा’, ‘धर्म आणि लोकसाहित्य’ असे ग्रंथही लिहिले. साहित्य संमेलनांत राजकारण्यांचा हस्तक्षेप नको, या विचाराचा वारसा त्यांनी दिला आहे.  
१९८२> प्रज्ञावंत लेखक, विचारवंत नरहर अंबादास कुरुंदकर यांचे निधन.  ‘जागर’, ‘शिवरात्र’, ‘धार आणि काठ’ आदी त्यांची पुस्तके वाचनीय आहेत.
– संजय वझरेकर