सतराव्या शतकाच्या अखेरीस तुर्की (ऑटोमन) फौजेचा व्हिएन्नावरील हल्ला यशस्वीपणे परतवल्यावर आटोमन सुलतान परत व्हिएन्नाच्या वाटेला गेले नाहीत. या काळात १६७९ आणि १७१३ साली प्लेगच्या साथींनी मोठा कहर केला. ही वष्रे वगळता हॅब्सबर्ग सत्ताकाळात व्हिएन्ना शहराचा चांगला विकास झाला. भव्य इमारत प्रकल्प, रस्ते, चौक उभे राहिले. फिशर इरलॅक, लुकास इत्यादी स्थापत्य विशारदांनी हे प्रासाद बांधून शहर सुशोभित करण्यात मोठा सहयोग दिला. पुढच्या काळात दक्षिण इटलीतूनही अनेक लोकांनी व्हिएन्नात स्थलांतर केल्यामुळे १७९० साली येथील लोकसंख्या दोन लाखांवर पोहोचली. याच सुमारास तिकडे फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय होऊन तो प्रबळ झाला होता. १८०५ आणि १८०९ अशा दोन वर्षी नेपोलियनने व्हिएन्नावर आक्रमण केले. पहिल्या युद्धात नेपोलियन पराभूत झाला; परंतु दुसऱ्यात त्याने व्हिएन्नावर काही प्रमाणात विजय मिळवला. लिपझिग येथे झालेल्या तिसऱ्या लढाईत मात्र नेपोलियन पूर्ण पराभूत झाला. १८१४ साली व्हिएन्ना शिखर परिषदेने युरोपातील राजकीय परिस्थिती जैसे थे केली. फ्रान्समध्ये फेब्रुवारी १८४८मध्ये झालेल्या दुसऱ्या राज्यक्रांतीचे पडसाद साऱ्या युरोपभर उमटले. ऑस्ट्रियाच्या नागरिकांनीही मार्चमध्ये व्हिएन्नात आंदोलने, मोच्रे काढून ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्यातील राजसत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला. सम्राटाने मात्र ही होऊ घातलेली राज्यक्रांती चिरडून टाकण्यात यश मिळविले. पुढच्या अर्धशतकात व्हिएन्नाची औद्योगिक वाढ होऊन ते मोठय़ा जागतिक शहरांपकी एक बनले. १९१४ साली घडलेल्या एका घटनेने साऱ्या युरोपातले राजकारण हलवून सोडले. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा वारस युवराज फ्रान्झ याचा खून २८ जून १९१४ रोजी युगोस्लाव्ह क्रांतिकारी गारव्हिलो प्रिन्सिपने केला. या घटनेत पहिल्या विश्वयुद्धाची ठिणगी पडून ऑस्ट्रिया, जर्मनी, तुर्की आटोमान सत्ता एका बाजूला, तर फ्रान्स, इंग्लंड, रशिया या राष्ट्रांची युती दुसऱ्या बाजूला असा संघर्ष होऊन जुल १९१४ ते नोव्हेंबर १९१८ असे महायुद्ध होऊन त्यात ऑस्ट्रिया-जर्मनी युतीचा पूर्ण धुव्वा उडाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती

उत्तराखंड राज्यातील जिम कॉब्रेट राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ ५२१ चौ.कि.मी. असून नसíगक सौंदर्याने नटलेले आहे. एकूण ६०० जातींच्या लहान-मोठय़ा वनस्पती इथे आहेत. या राष्ट्रीय उद्यानात साल, खैर आणि शिसम हे वृक्ष नजरेत भरतात. चिरपाइन ही कोनिफर जातीची उंच पर्वतरांगामधील अपुष्प वनस्पती या राष्ट्रीय उद्यानात आहे.  त्याचप्रमाणे बांस किंवा वंश असे म्हणवल्या जाणाऱ्या भरीव बांबूवनाने कॉब्रेट उद्यान भरून गेले आहे. साल वृक्षांनी ७५ टक्के राष्ट्रीय उद्यानाचा भूभाग व्यापला आहे. सेमल किंवा शाल्मलीची गर्द-लाल फुले, कांचनची गुलाबी फुले, पळसाच्या चीर-पाइन जातीतील ढाकची शेंदरी-लाल फुले, रुई किंवा मदारची लालसर जांभळी फुले आणि अमलतासची पिवळी फुले पाहून आपले डोळे सुखावतात. या सर्व वनस्पती नसíगकरीत्या तिथे उगवतात, परंतु काही वनस्पती त्यांच्या सौंदर्य, उदीम-वाणिज्य कारणास्तव लावलेल्या आहेत त्यात साग, निलगिरी, सिल्वरओक, जाकरांडा आणि क्यालेस्टेमोन किंवा बॉटलब्रश यांचा समावेश होतो. या वनस्पती फॉरेस्ट रेस्ट हाऊसच्या अवतीभवती सौंदर्यासाठी आणि आकर्षणासाठी मानवाने लावलेल्या आहेत. जाकरंडाची फुले निळी असतात, असा वृक्ष केरळमधील मुन्नारच्या वनात लावलेला आहे. क्यालेस्टेमोनची फुले लाल भडक असून बाटली धुण्याच्या ब्रशसारखी दिसतात परंतु अतिशय आकर्षक असतात.

अपुष्प वनस्पतीतील एक सदस्य चीर-पाइन मूळची हिमालयातील आहे. ५०० ते २००० मी. उंचीच्या क्षेत्रात वाढणारा हा वृक्ष निळा पाइन म्हणूनही ओळखला जातो. ३०-५० मी.उंच वाढणाऱ्या वृक्षाच्या खोडाचा घेर सुमारे ३ मीटर असतो. खोडाचा रंग गडद तपकिरी असतो आणि खोडावरील साल तुकडय़ा-तुकडय़ाने गळून पडते. पाने सुईसारखी अणकुचीदार असून तीनच्या गुच्छय़ात/ झुबक्यात येतात. म्हणून या वनस्पतींना सूचिपर्णी वृक्ष म्हणतात. पानांचा रंग फिकट हिरवा किंवा पोपटी असतो. अपुष्प वनस्पती असल्याकारणाने फुले नसतात. सुईसारख्या पानांचा सडा पडल्यामुळे जमिनीवर चटई पसरल्यासारखे दिसते. यामुळे इतर छोटय़ा वनस्पती या वृक्षाखाली वाढत नाहीत. अशा ठिकाणी फक्त रोडोडेण्ड्रोन आणि देवदारसारखे वृक्ष येतात.

किशोर कुलकर्णी (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org