कुतूहल : सांगवडेवाडीची गटशेती    
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु असे अनेक अल्पभूधारक शेतकरी एकत्र आले तर गटशेतीतून ते आपल्या बऱ्याचशा अडचणींवर मात करू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडेवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या उदाहरणातून हे दाखवून दिले आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतातील कामे, वाहतूक, बाजारातील स्पर्धा, उत्पादनखर्च इत्यादी समस्या भेडसावतात. सांगवडेवाडीतील असे समस्याग्रस्त शेतकरी एकत्र आले. त्यांनी आपला गट बनवला. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला गटाची बठक घेण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. खते, किडी, बियाणे, पीकसंरक्षण इत्यादींबाबत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चच्रेद्वारे त्यांनी मार्ग काढले. नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन त्याची देवाणघेवाण केली. भविष्यातील कामांचे नियोजन केले.
शहराजवळ असल्याने आपल्या शेतातील भाजीपाला तिथे निश्चितपणे विकला जाईल, याची खात्री वाटल्यामुळे त्यांनी शेतात टोमॅटो, वांगी, काकडी अशा भाजीपाला पिकांची लागवड केली. गटाने एकत्र खरेदी केल्यामुळे रोपवाटिकेतून रोपे स्वस्तात मिळाली. कमी क्षेत्रावर पूर्वी न परवडणारी ठिबक सिंचन पद्धत गटशेतीत वापरणे सोयीचे ठरले. एकत्रितपणे खते खरेदी केल्यामुळे प्रत्येक पोत्यामागे ४० ते ५० रुपयांची बचत झाली. शिवाय ही खते बाजारात जाऊन आणण्याची गरज भासली नाही. बांधावरच ती उपलब्ध झाली. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत झाली. गटामुळे किडींपासून पिकांचे रक्षण करणाऱ्या सापळ्यांवर अनुदान मिळाले. त्यामुळे फवारणीचा खर्च कमी झाला. एकत्रित लागण, तोडणी, वाहतूक करता येऊ लागली. मजुरांची गरज कमी भासू लागली. एका एका शेतकऱ्याला लागणारा उत्पादनखर्च गटशेतीमुळे विभागला गेला व नफ्याचे प्रमाण वाढले. पिकवलेल्या भाजीपाल्याची ते जिल्ह्याच्या ठिकाणीच विक्री करू लागले. तोडणी केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी आता सर्वच शेतकऱ्यांना जावे लागत नाही. गटातील एक-दोन शेतकरी जातात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचा वेळ, खर्च, ऊर्जा यांतही बचत झाली.
कृषी विभागाच्या सहकार्याने गटाने फळे व भाज्या यांवर प्रक्रिया करण्याबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यामुळे पिकाला योग्य दर मिळाला नाही तर त्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे फायदा मिळवण्याची सोय उपलब्ध झाली.  
–  प्रतिनिधी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: तीन ऐतिहासिक कर्मे
विश्व निर्मिती हा आपला इतिहास आहे. जोपर्यंत आपण हे लक्षात घेत नाही की हे विश्व सहजपणे उद्भवून काळक्रमणा करत आहे तोपर्यंत विश्वातले यत्किंचितही आपण सहजपणाचा धडा कसा घेणार आहोत? सजीव सृष्टी तर अगदी हल्ली हल्लीची. किती शेफारलो आहोत आपण? मुळात सजीव सृष्टी बांडगुळासारखी आहे. विश्वातले चैतन्य शोषण करणारी त्यावर गुजराण करणारी आणि वापरलेले चैतन्य मलमूत्रामधून बाहेर टाकणारे आपण. या क्रियांमधून आपल्याला भान आले (Consciousness) किंवा जाण आली आणि आपण भानगडी सुरू केल्या. बांडगुळाला झाडाचा आधार लागतो हे कबूल, पण एखाद्या विषवेलीसारखे आपण त्या झाडालाच विळखून शोषून मारून टाकावे आणि आपल्याला जे थोडेसे आयुष्य मिळाले आहे ते स्वत: कुस्करून टाकावे हे काय शहाणपणाचे लक्षण आहे का? शहाणपणा ही गोष्ट आपल्यालाच मिळाली आहे अशा गर्वात असतो. आपण तेव्हा चातुर्य शहाणे झाले ही ओवी आठवावी. ही ओवी महाभारताला उद्देशून आहे पण ती पश्चात बुद्धीने असणार. कारण त्या काळचे चतूर लोक जर खरेच शहाणे असते तर युद्धच झाले नसते आणि आम्ही किती गविष्ठ आणि करंटे की महाभारतातले युद्ध आजवर जगात झालेले नाही अशी शेखी मिरवणारे. हल्लीच्या महायुद्धात वापरलेला दारूगोळा किंवा अग्नीबाण आम्ही कुरुक्षेत्रावर वापरले होते ही काय वल्गना करण्याजोगी गोष्ट आहे? हल्ली Tourism  चे खूळ निघाले आहे. इजिप्तमधली पिरामिड बघून थक्क व्हायला झाले असे म्हटले जाते आणि शेजारीपाजारीही मग इजिप्तला जायचे ठरवतात. परवडत नसले तरी जावे लागते याला शेजार अधर्म म्हणतात. पण ती पिरामिडे कोठल्यातरी क्रूर राजाचे थडगे आहे आणि ते बांधायला लाखो लागलेले वेठबिगार हालहाल होऊन मेले हा इतिहास आपण परत घेऊन येत नाही. Alexander  चे तेच. याचा गुरू अ‍ॅरिस्टॉटल तत्त्वज्ञानी. दुसऱ्याला कसे नमवायचे, लोकांना कसे देशोधडीला लावायचे, जो कधीही वापरता येणार नाही असा मुलूख पादाक्रांत करायचा, आपलीच संस्कृती अत्युत्तम असे म्हणत ती दुसऱ्यावर लादायची आणि मग कंटाळून आणि निराश होऊन मायदेशी परतायचे आणि झालेला शीण सहन न होऊन अकाली मरायचे हे Alexander  चे चरित्र. अ‍ॅरिस्टॉटला तत्त्वज्ञानी म्हणायचे की नतद्रष्ट? भारतातल्या ताजमहालचे तेच. अहो तुम्ही प्रेम केले कबूल. पण त्याची एवढी मोठी संगमरवरी जाहिरात? हे प्रेमाचे चिन्ह की तुमच्या सत्तेचा आणि आर्थिक सामर्थ्यांचा आविष्कार? आणि वर ज्या गवंडय़ांनी हे बांधले त्यांचे अंगठे कापून टाकायचे? प्रेमापोटी असुरक्षितता? हेही नवलच. पण हे नवल नव्हे याला म्हणतात गर्व. आणि तोही प्रेमाचा. हेही कर्मच.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट

वॉर अँड पीस     : मुखरोग: भाग-१
फार वर्षांपूर्वी माझा एक भाचा, आपल्या मुलीच्या घटसर्प विकाराकरिता; दोन दिवसांत तीन हजार रुपये कसे खर्च करावे लागले, त्याची व्यथा सांगत होता. ती आठवण आता पुन्हा नव्याने झाली. मुख सुंदर असते, तसेच त्याचे विकारही भीषण, जीवघेणे, तातडीने गंभीर स्वरूप धारण करणारे होऊ शकतात. थोडा आळस आपण दाखवला, तर रुग्णाचे अधिक नुकसान होऊ शकते; होते. हा अनुभव टॉन्सिल्स, तोंड येणे, मुख दरुगधी, मुखशोष, दाताचे विकार, पोटाचे विकार याबाबतीत येऊ शकेल. मुखपरीक्षण नीट केल्यास रोगांच्या पूर्वरूपात प्रथमावस्थेत; शमनउपचार करून रोग निर्माण होऊ न देण्याचे पुण्य वैद्य डॉक्टरांना मिळू शकते.
मुखदर्शन डॉक्टरने, वैद्याने नीट करावे.  सर्व विकारांचे दर्शन मुखापासून होते. कदाचित सर्व विकारांची सुरुवातही मुखापासून होत असेल. कारण प्राणवायू, पाणी, अन्न सर्वाचेच पहिले द्वार ‘मुख’. मुखापासून गुदापर्यंत महास्रोतस अन्न, वायू, पाण्याचे वहन करते. साहजिकच महास्रोतसाचा किंवा पोटाचा आरसा म्हणून मुख मानले जाते.
मुख हे खऱ्या अर्थाने पांचभौतिक आहे. दांत पृथ्वी तत्त्वाचे, आप किंवा जलतत्त्वाची जीभ, स्वच्छ पांढरे शुभ्र दातांचे तेजतत्त्वदर्शन, वायूमुळे वाणी व आकाशामुळे मुखाची पोकळी असे सर्वत्र पंचमहाभूतांचे कार्य दिसते. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे
‘‘औष्ठौच दन्तमूलानी, दंता जिव्हा च तालु च।
गलो गलादि सकलं सप्तागं मुखमुच्यते।।’’
अशा या मुखातील; अडखळत बोलणे, खवखव व गिळावयास त्रास, गालगुंड, घटसर्प, जिभेवरील किटण, पडजिभेचे विकार, पांढरे ठिपके व शोष पडणे या आठ लक्षणांचा विचार या लेखात आपण करीत आहोत. अ‍ॅलर्जी, आग होणे, कफविकार, कॅन्सर, खोकला, टॉन्सिल्स, तोंड येणे, दात, पित्तविकार, कृमी, जंत, सर्दी, गाल बसणे, अरुचि, शोष या रोग लक्षणांचा विचार स्वतंत्र लेखात केला जाईल.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १७ जून
१८९५>  बुद्धिप्रामाण्यवादी लेखक, सुधारकाग्रणी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचे वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी निधन. ‘केसरी’चे संपादक आणि ‘सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक  या भूमिकेतून आगरकरांनी ‘इष्ट असेल ते बोलणार’ अशा नेमस्त शब्दांत सत्ता वा समाजाची तमा न बाळगता लिहिण्याचा निर्धार केला. लोकमान्य टिळकांशी पुढे तीव्र मतभेद झाल्यावरही आगरकरांची मैत्री कायम होती. ‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस’ या छोटेखानी पुस्तकात टिळकांचा उल्लेख वारंवार आहे. ‘कवी, काव्य व काव्यरति’ तसेच ‘वाक्यमीमांसा अर्थात वाक्यांचे पृथक्करण’ असे लेखन त्यांना भाषा व साहित्याभ्यासात असलेल्या गतीची साक्ष देते. आगरकरांच्या निवडक निबंधांचे संपादित खंड उपलब्ध आहेत.
१९९१>  कवी, समीक्षक, भाषांतरकार प्रभाकर बळवंत माचवे यांचे निधन. मातृभाषा मराठी, पण हिंदीभाषक मुलखात वास्तव्यामुळे प्राय: हिंदीतूनच लिहिणारे माचवे हे मराठी-हिंदी साहित्यातील एक दुवा ठरले. हिंदी व मराठीतील निर्गुणी काव्याच्या अभ्यासावर पीएच.डी. मिळवणाऱ्या माचवे यांनी एकंदर ८० पुस्तके लिहिली वा संपादित केली.
– संजय वझरेकर