एकेका तपाची वाट पाहून मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला दिसतो. असा उशीर का होतो, याविषयी मराठी भाषिकांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं अनेकांनी नमूद केलं आहे.

पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, दुर्गा भागवत इ. नावे. त्यांची पुस्तके ज्ञानपीठ पुरस्काराच्या जवळ पोहोचली होती, पण त्यांना मिळाले नाहीत. ज्ञानपीठ उच्च समितीचे सदस्य प्रा. डॉ. सिसिरकुमार दास यांनी एकदा चर्चेच्या ओघात सांगितले, ‘पु. ल. देशपांडे मोठे आहेत. मराठी माणसाच्या मनातील त्यांच्यावरचे प्रेम, भक्ती, वेड मला माहीत आहे. पण तुमचे पु. ल. अथवा जी. ए. तुम्ही अजून इतर भाषकांपर्यंत पोहोचवलेलेच नाहीत. आपल्या भाषेतील आवडलेले, दर्जेदार साहित्य, इतर भाषिकांपर्यंत एक सांस्कृतिक जबाबदारी म्हणून पोहोचवले गेले पाहिजे.’

अपवाद फक्त वि. स. खांडेकरांचा. गोपाळराव विद्वांसांनी संपूर्ण खांडेकर शैलीदार गुजरातीत गुजराती वाचकांना परिचित करून दिले. तसेच खांडेकरांच्या पुस्तकांचे तामिळ अनुवाद का? श्री. श्रीनिवासाचार्य यांनी केले. ते इतके लोकप्रिय झाले की खांडेकर हे महाराष्ट्रात स्थायिक झालेले तामिळ गृहस्थ आहेत, असा समज झाला होता. खांडेकरांच्या ‘क्रौंचवध’च्या पाच-सहा आवृत्त्या आणि ‘जळालेला मोहोर’च्या चार आवृत्त्या गुजराती भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. याव्यतिरिक्त कानडी, हिंदी, इंग्रजीतही अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

साहित्य अकादमीच्या हिंदी पत्रिकेचे प्रमुख संपादक, जी. ए. शानी म्हणाले, ‘‘मराठीला ज्ञानपीठ मिळत नाही, कारण तुमचे लेखक चांगले असूनही तुम्ही इतरांपर्यंत पोहोचत नाही. जबाबदारी तुमची आहे. इतरांच्या नावे का ओरडता?’’

यासाठी आपण काय करू शकतो? साहित्य संस्कृती मंडळाने दर वर्षी मराठीतील दहा निवडक पुस्तके निवडून त्यांची दर्जेदार हिंदी, इंग्रजी भाषांतरे करायला हरकत नाही.

साहित्य संमेलनात होणारा अनाठायी खर्च कमी करून जमेल तेवढा निधी आपण हिंदी, इंग्रजी अनुवाद कार्यासाठी खर्च करायला काहीच हरकत नसावी.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

बोटांवरची गणती

तंत्रज्ञानाची प्रगती झाली नव्हती, त्या पाषाणयुगात आणि कृषिसंस्कृतीच्या सुरुवातीच्या काळातही मानवाला पशुधनाची वा इतर वस्तूंची गणती करण्यासाठी अंतर मोजण्याची आणि कालमापनाची गरज पडत होती. या मोजमापनासाठी त्यांनी शोधलेल्या युक्त्या मानवाच्या बुद्धिसामर्थ्यांची साक्ष देतात.

मोजमापनाचे आद्य साधन म्हणून मानवाने आपल्या शरीराचा आणि अवयवांचा वापर करून घेतला. गणनेसाठी बोटांचा वापर करण्यातूनच दशमान पद्धतीचा विकास झाला. ० ते ९ या अंकांना इंग्रजीमध्ये डिजिट म्हटले जाते. डिजिट या शब्दाचा मूळ अर्थ बोटे असाच आहे.

दहाहून अधिक वस्तूंची गणती करायची झाल्यास बोटांच्या पेरांचा उपयोग करण्यात येई. अंगठय़ाचे टोक इतर चार बोटांच्या पेरांवर अनुक्रमे टेकवून मोजणी केल्यास १२ अंक मोजता येतात. एकदा १२ मोजून झाले की दुसरे बोट मुडपायचे, अशा प्रकारे पाचही बोटे मुडपली जातील तेव्हा ६०ची गणती पूर्ण होईल. या प्रकारे ६० वस्तूंची गणती करण्याच्या पद्धतीतून ६०चा पाया असणारी अंकपद्धत सुमेरियन संस्कृतीने विकसित केली. याच पद्धतीचा बॅबिलॉनिअन संस्कृतीनेही स्वीकार केला. आता जरी ही पद्धत वापरात नसली तरी कालमापनात (मिनिटे-सेकंद) आणि कोनमापकात आपण अजूनही ६०च्या पटीचा वापर करतो.

एक-दोन-तीन हे अंक खुणेने दर्शवण्यासाठी बोटांचा वापर केला जाई. या खुणांच्या भाषेतूनच रोमन आकडय़ांची चिन्हे जन्माला आली. रोमन भाषेतला पाच हा आकडा पाच बोटे उलगडून पाच अंक दर्शवण्याची खूण करताना अंगठा आणि अंगठय़ाजवळचे बोट यांच्यामध्ये होणाऱ्या कोनाचा निर्देशक आहे.

बोटांवर वस्तूची गणती करताना आपण एका वस्तूसाठी एक बोट ही गणितातली ‘एकास एक संबंध’ ही संकल्पना वापरत असतो. यातूनच एकमान पद्धत आणि प्रत्येक अंकासाठी एक उभी रेघ काढायची पद्धत निर्माण झाली. अशा उभ्या रेषा कोरलेली हजारो वर्षांपूर्वीची हाडे आणि दगड आजही उत्खननात सापडतात. याच पद्धतीत थोडी सुधारणा करून पुढे सांख्यिकीमधली ‘टॅली मार्क’ची पद्धत विकसित झाली. मोजण्याच्या गरजेतून अंकशास्त्राचा जन्म आणि विकास झाला. आपली बोटे ही जगातली सर्वात पहिली गणकयंत्रे होती. मोजण्याच्या पद्धती आणि साधने आपल्या बोटांनीच प्रथम पुरवली.

प्रा. माणिक टेंबे

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

चूकभूल : आरंभ मोजमापनाचा’ ( जाने.) हे टिपण डॉ. विजय पाटकर यांचे नसून, लेखकाचे नाव डॉ. विजय पाटकरअसे वाचावे.