१९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये अ‍ॅलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता. नंतर प्रा. नाटा या इटालियन शास्त्रज्ञाने हा साहाय्यक पदार्थ बदलून त्याऐवजी प्रोपिलीन वापरले. त्यामुळे पॉलिथिलीन अधिक मजबूत बनले. १९५६ मध्ये पॉलिअ‍ॅसिटलचा आणि १९५७ साली बहुगुणी पॉलिकाबरेनेटचा उदय झाला. १९६५ ते १९८५ या २० वर्षांत इंजिनीयिरग प्लास्टिकचा उदय झाला. यात पॉलिसल्फोनस, पॉलिमिथाइल पेंटिन, पॉलिथिलीन टेरेथेलेट, अ‍ॅरोमेटिक पॉलिएस्टर्स, पॉलिइथर, इथर किटोन्स, द्रव स्फटिकरूप पॉलिमर्स इत्यादींचा समावेश आहे.
प्लास्टिकमध्ये जसजशी सुधारणा होत गेली तसतशी त्यापासून वस्तू बनवणाऱ्या यंत्रातही बदल करावा लागला. सुरुवातीला बनवलेल्या साच्यामध्ये (एक्सटड्रर) बदल करावे लागले. पहिला साचा फक्त गुट्टापर्चा (गुट्टापर्चा-मलाया द्वीपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे रबर) रबरासाठी उपयोगी पडणारा होता. असेच बदल इंजेक्शन मोल्डिंग यंत्रातही होत गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्लोमोल्डिंग आणि व्हॅक्यूम फोìमगने वस्तू बनवायला सुरुवात झाली. ब्लोमोल्डिंग पद्धतीने पोकळ बाटल्या, डबे, पिंपे इत्यादी वस्तू बनू लागल्या. प्लास्टिक हे सेंद्रिय व संघटित पदार्थ आहेत. ते काही नैसर्गिक पदार्थापासून बनविले जातात किंवा संपूर्णपणे कृत्रिम पदार्थापासून बनवलेले असतात. काही प्लास्टिक्स रबरासारखी असतात. मात्र प्लास्टिकला पुरेशी ताकद असते. हाय डेन्सिटी पॉलिथिलीन हे लो डेन्सिटी पॉलिथिलीनपेक्षा गुणधर्मात सरस असते. ताण सामथ्र्य, दाब सामथ्र्य अधिकच्या तापमानाला टिकून राहण्याची क्षमता हे ते गुणधर्म होत. सोसायटींच्या गच्चीवर ज्या पाण्याच्या टाक्या असतात त्या हाय डेन्सिटी पॉलिथिलीनपासून बनवलेल्या असतात. या टाक्या खूप जाड असतात व त्या वर्षांनुवष्रे टिकतात. त्या सतत उन्हात असल्या तरी उन्हाने तडकत नाहीत. प्लास्टिक बनवण्यासाठी सेल्युलोज (कापूस व लाकडापासून), स्टार्च (शेती उत्पादनातून), झाईन (मक्यातील प्रोटीन), केसिन (गाईच्या दुधापासून), एरंडेल, तेल, लाख, रबर किंवा कधी कोळसाही वापरतात.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
झेपेल तेवढे स्वीकारावे, जमेल तेवढे नाकारावे!
‘‘मनुष्याने जन्मभर एकाच व्यक्तीला गुरू बनवावे अथवा एकाच ग्रंथाला प्रामाण्य मानून आपल्या उन्नतीचा मार्ग अनुसरावा अशी माझी प्रवृत्ती नाही. ज्या मोठय़ा मनुष्यापाशी जे चांगले दिसेल, त्यातील जेवढा भाग आपणास झेपेल तेवढा स्वीकारावा आणि त्याच्या योगाने आपल्या बुद्धीत जो प्रकाश पडेल त्याच्या सहाय्याने आपला मार्ग चालू लागावे अशी माझी वृत्ती आहे. वाटेने जात असता आपण जेथे अडतो तेथे कोणाचा तरी सल्ला आपण स्वीकारतो व तो योग्य आहे अशी आपल्या बुद्धीची खात्री झाली म्हणजे त्या दिशेने आपण जाऊ लागतो. पुन्हा आपणास त्याच्या पुढची वाट विचारण्याचा प्रसंग आला, तर तेथे भेटणारांना ती पुसावी व पटल्यास त्यांनी दाखविलेल्या दिशेने आणखी थोडे पुढे जावे अशी माझी विचारमार्गावरील यात्रा चालू आहे.’’ अशा प्रकारे आचार्य शं. द. जावडेकर आपल्या वैचारिक जडणघडणीचे स्वरूप सांगत आगरकर, टिळक, गांधी व मार्क्‍स या चार वाटाडय़ांचा उल्लेख करून पुढे लिहितात-‘‘ घरातून निघताना एकच वाटाडय़ा बरोबर घ्यावा आणि वाट शोधून काढण्याची सर्व जबाबदारी त्याच्या डोक्यावर लादून आपण त्याच्या पावलावर पाऊल टाकून सतत त्याचा पदर धरून जावे असा माझा आजपर्यंतचा प्रवास घडलेला नाही. हा माझा गुण म्हणून मी सांगत नाही. कारण त्या सर्वाच्या मागून जाऊन आपल्या जीवितवित्ताचा सर्वस्वी होम करण्याचे सामथ्र्यही माझ्या अंगी नसल्याने मला त्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वस्वी स्वीकार करता आला नाही, असेही या वृत्तीचे एक कारण असणे शक्य आहे. जीवनातील अंतिम सत्याच्या शोधासाठी आत्मसमर्पणपूर्वक प्रयोग करण्याचे धैर्य जितक्या प्रमाणात कमी तितक्या प्रमाणात विचारसंप्रदायावरील निष्ठाही कमी असणार व म्हणून एकाच विचारद्रष्टय़ाच्या मागून अखेपर्यंत न जाता दुसऱ्या सांप्रदायापासून काही विचार शिकावेत ही वृत्ती वाढणे शक्य आहे. ही कारणे कोणतीही असली तरी माझ्या धर्मविचारांच्या वाढीला कोणाही एकाच विभूतीचे साहाय्य झालेले नसून सुमारे चार विभूतींच्या विचारांपासून मला जीवननिष्ठेचे ज्ञान लाभलेले आहे ही गोष्ट खरी आहे.

मनमोराचा पिसारा
उन्हाळ्यातल्या हायकू..
हायकू म्हणजे फक्त १७ शब्दांची काव्यरचना नव्हे. हायकू म्हणजे जीवनातला संवेदनशीलतेनं अनुभवलेला समाधीक्षण. हायकू सुचते, त्यावेळी माणूस ‘झेन’ समाधिस्थ असतो, क्षणभर, निमिषापुरता. परंतु, त्या निसटत्या पळभरात समस्ततेची जाणीव होते, निसर्गभानातून स्वभान स्फुरतं.
‘हायकू’ रचणं हा ‘झेन’ बुद्धविचारांचं ‘कुशल’ कर्म आहे.
‘हायकू निसर्गातल्या निरीक्षणातून उद्भवलेल्या ऋतूचं चित्रण करते आणि थांबते, या काव्याचा अर्थ मूलत: गूढ.’
उन्हाळ्यातल्या काही हायकू. काही प्रसिद्घ हायकूंचा स्वैर (पण नियम पाळून) अनुवाद :
१. तळपत्या निरभ्र नभाखाली
दूरवर शिडाचं गलबत कापतंय
सपासप अस्तित्व लाटांचं
हृदयी माझ्या शीड फडफडतंय
स्तब्ध, नि:शब्द, कल्लोळ
२. जन्माचा क्षण, मृत्यूचं निमिष, अखंड वाहतात
कमळवेलीनं केव्हाच फुलवली आहेत
संथ जलात गूढ; सहस्त्र पद्मं
थरार लहरींचा
३. पहाटेच्या गारव्यातली शेकोटी, झुळूक
विझत्या निखाऱ्याचा तप्त नि:श्वास
अखेरचा
पर्वतावरून ओघळणाऱ्या निर्झरापाशी
गुडघे टेकून
मावळत्या चांदण्या पितो
४. कंदिलाचा प्रकाश घरातला विझतो लक्कन्
खिडकीतून चांदण्याचं शीतल तेज
नीरव शिरतं आत
गवाक्षाच्या वर्तुळाकार बहुरूपी महिरपीतून
उजाडलं
५. बहरलेल्या अमलताशाच्या सळसळत्या
नितळ सोनेरी पाकळी फुलाची
घरंगळते,
सुकलेल्या गवतावर फुलपाखराचा तुटका पंख एकटा
टिटवीची हाक दूरवर. (स्वरचित)
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com