पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. त्या वेळी त्यांनी ‘ए सिंथेसिस ऑफ फ्लेवर एट रूम टेम्परेचरा’ हा शोधनिबंध ‘करंट सायन्स’ या मासिकात प्रसिद्ध केला. त्याच वेळी याच विषयावरचा शोधनिबंध बेकर नावाच्या संशोधकाने ‘जर्नल ऑफ केमिकल सोसायटी’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केला. त्यामुळे हे संशोधन ‘बेकर-वेन्कटरामन ट्रान्सफम्रेशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही प्रक्रिया वापरून आजही रसायनशास्त्रज्ञ ‘फ्लेवोंस’ तयार करतात.
 वेंकटरामन यांच्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे त्यांना १९३४ साली मुंबई विद्यापीठाने इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये प्रपाठक (रीडर) म्हणून बोलावले. त्या वेळी या संस्थेचे संचालक डॉ. आर. बी. फोस्टर होते. ते १९३८ साली निवृत्त झाल्यावर वेंकटरामन पुढील १९ वष्रे या संस्थेचे संचालक होते. त्यांच्या कारकिर्दीत ही संस्था चांगलीच भरभराटीला आली.
या कारकिर्दीत वेंकटरामन यांनी ‘फ्लेवोनाइड’ जातीच्या रंगांवर संशोधन तर केलेच, पण त्याचबरोबर त्याची संरचना, ते वापरण्याच्या पद्धती इत्यादी वस्त्रोद्योगांना लागणाऱ्या विविध प्रक्रियांवरही त्यांनी संशोधन केले. त्यांची आठवण म्हणून मुंबईला ‘इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज लिमिटेड’ या संस्थेची स्थापना झाली. त्यांचे ‘केमिस्ट्री ऑफ सिंथेटिक डाय एंड एनेलिटिकल केमिस्ट्री ऑफ सिंथेटिक डाय’ हे आठ भागांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या विषयातील सल्लामसलतीसाठी त्यांना देश-परदेशातून निमंत्रणे येत. १९५७ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. तेथून ते १९६६ साली निवृत्त झाले. त्यांच्यामुळे पुण्याच्या या संस्थेत नामवंत रसायनशास्त्रज्ञ जमा झाले. त्यांनी पीएचडीच्या ८५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे २५० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
अ. पां. देशपांडे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई ss  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – दे ऑल्सो सव्‍‌र्ह..
मी तगरीचं फूल बोलत्येय.. ओळखलंस ना मला? रोज तुझ्या बगिच्यात येतोस आणि आणि गुलाबाच्या ताटव्यापाशी थांबतोस. तिथल्या कळ्या-फुलांकडे विलक्षण कौतुकानं पाहतोस नि मोबाइलवर गुलाबाच्या फुलाचा फोटो काढून तिथल्या तिथे तुझ्या फेसबुक आणि व्हॉॅट्सअ‍ॅपवर अपलोड करून जगभर पाठवतोस, तेव्हा मी तिथेच फुललेली असते. हो, बगिच्याच्या कोपऱ्यात उभी असते मी.
माझ्याकडे तू पाहत नाहीस, कौतुकानं थबकून माझा धवल रंग डोळ्यांत साठवीत नाहीस. फोटोही काढत नाहीस याबद्दल माझं खरंच काही म्हणणं नाही. मी गुलाबाच्या फुलांचा नि ताटव्याचा संदर्भ याच्यासाठी दिला की, माझं तुझ्या बागेतलं नेमके लोकेशन कुठे आहे, हे तुझ्या लक्षात यावं इतकंच.
मी इथेच असते, जवळजवळ बारा महिने फुलते. वसंतात इतकी की माझी काळसर हिरवी पानं झाकोळून जातात.
माझ्यापलीकडे माझी थोरली बहीण उभी आहे, तिचं नाव डबल तगर. टपोरा शुभ्र रंग. दाट पाकळ्या आणि केंद्रभागी किंचित पिवळसर पराग. ती खूप डौलदार दिसते. पांढऱ्या गेंद फुलासारखी. तिचं फुलणं थोडं सीझनल असतं. म्हणजे ती पावसाळ्यात भरभरून फुलते. तिच्या रूपात रुबाबदारपणा आहे.
माझ्या आसपास आणखी काही झुडुपं आहेत. सदाफुलीला ओळखतच असशील. मस्त नाव मिळालंय तिला. तीही छानदार फुलते. तिचा जांभळा रंग तेजस्वी दिसतो. आणखी काय सांगू? माझे हार बनवतात नि ते भरगच्चही दिसतात. जास्वंदीचा कळा मध्यभागी घातला की तो पुष्पहार देखणा दिसतो. देवळात जाताना मिळणाऱ्या फुलांच्या पुडीतही मी असते.
..थांब, तगरे, तू काय मला शाळकरी मुलगा समजलीस की काय? ‘तगरीच्या फुलाचे आत्मवृत्त’ या निबंधाच्या विषयात मांडावं तसं बोलत सुटलीस. ‘छे रे! माझ्यावर कोणी निबंधही लिहीत नाही. मी ही आहे अशी आहे. कशी आहे? ते सांगितलं. आणि असंच राहू दे मला! माझं स्थान कोपऱ्यातलं असलं तरी ते माझंय आणि असू दे तसंच. सगळेच गुलाब नसतात नि कमळही नसतात. म्हणून मी असूच नये का? दे ऑल्सो सव्‍‌र्ह हू स्टॅण्ड अ‍ॅण्ड वेट.. जॉन मिल्टनच्या सॉनेटमधल्या शेवटच्या ओळीचं तुझ्यासमोर उभं ठाकलेलं सत्य आहे.
आठवतंय ना, मिल्टन अंध झाल्यानंतर त्यानं हे सुनीत रचलं.
देवाच्या दरबारात असंख्य माणकं, हिरे आणि मोती. चमकदार आणि नेत्रदीपक. सारी दिमाखदार. त्याच दरबारात मीही उभाय. आहे अंध, नेत्रहीन आणि काळोखात बुडालेला. एकटा, एके ठिकाणी, निश्चल. पण माझंही स्थान आहे, मीही त्याच विश्वचैतन्याचं रूप आहे. माझं सारं सर्वस्व ही तुझीच भेट आहे. असेन मी दुर्लक्षित, नसेल मला मानपानाचं आसन. नुसताच उभा असेन, पण या जगात माझाही सहभाग आहे, माझाही श्वास मोलाचा आहे, माझंही अस्तित्व अर्थपूर्ण आहे. आय ऑल्सो सव्‍‌र्ह..
तगरीचं फुल खुदकन हसलं. त्या सूर्यप्रकाशात त्याचा तेजस्वी शुभ्र रंग सूर्याइतका प्रकाशमान वाटला.
आता थबकून उभा राहतो मी तगरीच्या झुडुपापाशी आणि म्हणतो, तुझ्या नि माझ्यात एकच तत्त्व आहे.
डॉ.राजेंद्र बर्वे –  drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – नवरे, देव आणि ऋषी..सगळे सारखेच
‘‘अगदी शास्त्राप्रमाणे कोण वागते व वागवूनही कोण घेतो? जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील त्याजवर देवाप्रमाणेच ममता करून त्यांचे सुखदु:ख जाणावे की नाही? जसे देव भक्ती पाहून सदा प्रसन्न राहतात. भक्ताचे गुणदोष आढळले तर ते कसे तेव्हाच खरे खरे कारण सांगून त्यांचा अपराध त्यांचे पदरात घालून ममतेने शासन करतात. तसे यांनी करू नये, तर नवरा कसाही दुर्गणी असला तरी त्याला देवाप्रमाणेच मानून कोण वागेल बरे?’’
ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्रीपुरुषतुलना’ या निबंधात, वरील वाक्ये आहेतच, पण ‘‘याच्यापेक्षा कडक जर दुसरे शब्द अगर भाषा असती तर तीदेखील मी वाकडी तिकडी करून लिहिलीच असती’’ असे प्रस्तावनेतच सांगून, भाषेवरआक्षेप घेऊन मूळ विषय कुणी डावलू नये असे त्या सुचवितात. स्त्रियांना समानेतेने वागवले नाही तर जशास तशा वागतील हे सांगताना देव-ऋषी यांच्यावरही सडकून टीका करतात-
‘‘आता यात थोडीशी आपल्या देवाची निंदा करू नये ती करणे भाग आले. कारण खऱ्याला काय? ते कसेही असो. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की, लढाई करते वेळेस बाप, भाऊ जर समरांगणात समोर आपल्याशी लढू लागले तर बेलाशक मारावे, मागे पुढे पाहून नये. लक्ष्मणांनी इंद्रजित मारला तेव्हाच श्रीरामचंद्रजीने सांगितले की, बाबा लक्ष्मणा, काय करतोस; क्षत्रिय धर्म मोठा कठीण आहे. जावाई असो, का पोटचा मुलगा असो; कोणाची भीड धरणे नाही. ते वेळेस सुलोचनेचे खरे पातिव्रत्य पाहून इंद्रजिताला उठविणे हे रामाचे स्वाधीन होते. पण मारुतिबोवाचे व बिभीषण घरभेदी याचे एकून सुलोचनेसारखे दुर्मिळ रत्न विस्तवात घालून जाळून टाकले.. तेव्हाचे ऋषि तरी काय? कोणी हरणीचे पोटी झाले ते कोण शंृगऋषि, कोणी पाखराचे पोटी झाले; ते भारद्वाज, कोणी गाढविचे पोटी झाले; ते गर्धभऋषि, गायीचे पोटी झाले ते वृषभऋषि. तेव्हा त्यांनी आपले पशूप्रमाणे लिहून ठेवले. झाले ते गेले करून, पण निस्तरणे आले स्त्रियांचे कपाळी.’’