रमेश गणेश देशपांडे (१९३४-१९९४) यांनी पुणे विद्यापीठातून एमएस्सी केले. लगेच ते मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात (BARC) समस्थानिक (Isotope) विभागात रुजू झाले. बीएआरसी तेव्हा नुकतेच सुरू होत होते. आणि अशा प्रकारच्या प्रकल्पात कोणतीही परदेशी तांत्रिक मदत मिळत नसल्याने प्रत्येक शास्त्रज्ञाला अगदी मुलभूत काम करून उपकरणे बनवायला लागत व आपले नेहमीचेही काम करावे लागे. समस्थानिक विभागाचे प्रमुख म्हणून ते रुजू झाले, मग संचालक व शेवटी बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजीचे (ब्रिट) मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. १९५६ साली बीएआरसीमधील ‘अप्सरा’ ही पहिली अणुभट्टी सुरू झाली. त्याद्वारे किरणोत्सारी समस्थानिकांचे उत्पादन सुरू झाले. आता ब्रिटचा विस्तार भारतात अनेक ठिकाणी व परदेशातही झाला आहे, यामागे श्री. देशपांडे यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत.  किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैद्यक आणि कृषीशास्त्रात होतो. यासाठी प्रथम ‘अप्सरा’, मग ‘सायरस’ आणि ‘ध्रुव’ या अणुभट्टय़ांनी काम केले. अणुवीज केंद्रातही कोबाल्ट-६० आणि ट्रिशीयम ही उत्पादने करता येतात. वैद्यकीय साधने वेष्टणात बंद केल्यानंतर गॅमा किरणांद्वारे त्यांना र्निजतुक करण्यात येते. या तंत्रामुळे दुर्गम प्रदेशातील सनिकांसाठी वैद्यकीय साहित्य व उपकरणे पुरवणे शक्य झाले. प्लास्टिकचा वापर केलेली इंजेक्शन आणि  सििरजेससारखी उपकरणे वापरून फेकून देता येत असल्याने त्यांच्या अडचणीच्या ठिकाणी परत परत र्निजतुकीकरण करणे टाळता आले. या समस्थानिकांच्या उत्पादनामुळे बीएआरसीच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली. अमेरिकेत निर्यात होणारे हापूसचे आंबे जास्त काळ टिकावेत यासाठी ते नाशिकजवळच्या लासलगावला गॅमा किरणांच्या सहाय्याने र्निजतुक करण्यात येतात. याच पध्दतीने कांदे, बटाटे, कडधान्ये, डाळी यांचेही आयुष्य वाढवता आले. श्री. देशपांडे यांनी एशिया पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांच्या अणू प्रकल्पातील समस्थानिक आणि विकिरण विभागांना सल्ला आणि सहकार्य दिले आहे.
टीप : दिनांक ३ एप्रिल २०१४ या तारखेच्या ‘कुतूहल’ मध्ये जडपाण्याचा वापर चुकीचा दिला गेला आहे. जडपाण्याचा वापर मुख्यत्वेकरून अणुभट्टीत न्युट्रॉनची गती कमी करून अणुविखंडनक्रिया परिणामकारकपणे घडवून आणण्यासाठी होतो.
अ. पां. देशपांडे, (मुंबई) ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई ss  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – मन आंधळं असतं..
प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. प्रेम आंधळंच काय, बहिरं असतं आणि ‘आय लव यू’ हे तीन शब्द उच्चारण्याच्या वेळी तर मुकं होतं.
गंमत म्हणजे आपण प्रेम आंधळं असतं असं म्हणतो तेव्हा शत्रुत्व आंधळं असतं. बहिरं असतं याचा विसर पडतो. प्रेम आंधळं असतं. यामधून प्रेमात पडलेल्या व्यक्तीमधल्या तथाकथित उदात्त भावना जागृत झाल्या आहेत असं वाटत असतं तर शत्रुत्वाच्या भावनांनी ग्रासलेली व्यक्ती अहंकारी आहे, खुनशी आहे असं म्हणतो.
प्रत्यक्षात, ना प्रेम आंधळं असत ना शत्रुत्व! खरं पाहता, आपलं ‘मन’ आंधळं असतं. गंमत म्हणजे डोळे उघडे ठेवून बघितलेलं, तपासून पाहिलेलं सत्यही मन तयार होत नाही. पटत नसेल तर इथे दिलेलं चित्र पाहा.
त्या चित्रातली सर्वात उंच व्यक्ती कोणती दिसते? याचं उत्तर सगळ्यांचं एकच असेल, उजव्या बाजूची.
काही चलाख मित्रांनी हे चित्र किंवा अशा स्वरूपातल्या ऑप्टिकल इल्युजन आकृत्या पाहिल्या असतील तर तिन्ही व्यक्ती एकाच उंचीच्या आहेत असं ‘स्मार्ट’ उत्तरं देतीलही. त्यांच्या स्मार्टपणाला दाद देऊन पुढे जाऊ. कारण बऱ्याच जणांचं उत्तर इथे मांडलेलं आहे, यात शंका नाही. उजव्या बाजूची व्यक्ती उंच भासते, परंतु, तसं असलं तरी सगळ्या व्यक्ती सारख्याच उंचीच्या आहेत.
गंमत तर यापुढे आहे. ती अशी की हे कळून-सवरूनदेखील ती व्यक्ती इतरांपेक्षा उंचच वाटते.
चित्रकलेच्या प्राथमिक धडय़ांमध्ये कॅनवासवरील आकृत्यांना ‘पस्र्पेक्टिव्ह’ कसं द्यायचं यावर भाष्य आणि टिपा दिलेल्या असतात. या चित्रांमध्ये त्या थ्रीडी पस्र्पेक्टिव्हचा वापर केलाय म्हणून आपले डोळे फसतात. डोळ्यांना माहिती असूनही दिसत नाही.
डोळ्यांनी दाखविलेल्या या सत्यावर मन विश्वास ठेवत नाही. आणि मनानं सांगितलं तरी डोळे त्यावर विश्वास ठेवत नाहीत.
यालाच ‘माया’ असं म्हणतात. अध्यात्मामध्ये माया म्हणजे असत्य सत्यासारखं भासणं. दु:ख, आनंद अशा भावना अनित्य असतात. मनात उद्भवणाऱ्या कामना आणि वासना यांच्या प्रभावामुळे सत्याची जाणीव होत नाही आणि आपण त्या फसव्या जाळ्यात- मायाजालात अडकतो.
मायेचं हे रूप फसवं असूनही मोहित करतं, दिसत असूनही आपण आंधळ्यासारखं वागतो.
मनाची ही वृत्ती मानसशास्त्राच्या अशा प्रयोगातून स्पष्ट होते. आपल्या मनाच्या या उपजत प्रवृत्तींवर विजय मिळवता येत नाही. कोणालाच त्या नष्ट करता येत नाहीत. आपण अशा प्रवृत्तीचं भान ठेवू शकतो. अधिक डोळसपणे, सजगपणे जगाकडे पाहू शकतो.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – बहुजनहिताय, बहुजनसुखाय
‘‘हल्लीच्या स्थितीत आमचे ध्येय साध्य करण्यासाठी जे कर्तव्य आम्हास करावयाचे आहे ते म्हणजे आमचा समाज सुक्षिक्षित करणे व लोकांची मने तयार करणे हा होय. व त्यासाठी शिक्षण हा एकच मार्ग आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी झटणे अगत्याचे आहे. निरनिराळ्या समाजातील लोकांना शिक्षण देण्याची पद्धत मी काळजीपूर्वक अनुसरीत असतो. आणि माझ्या आयुष्याच्या पुढील काळात तीच पद्धत सुरू ठेवण्याची माझी इच्छा आहे.’’ राजर्षी शाहू महाराजांनी ‘मराठा, जैन, लिंगायत, अस्पृश्य, सारस्वत, दैवज्ञ, शिंपी, मुसलमान, वंजारी इत्यादी अठरापगड जातींतील विद्यार्थ्यांसाठी’ कोल्हापुरात वसतिगृहे सुरू केली. एवढेच नव्हे तर त्यातील ५० टक्के जागा राखीव ठेवल्या. त्यामुळे करवीर नगरी ‘विद्यार्थी वसतिगृहांची जननी’ झाली.  यामागचा हेतू सांगताना ते म्हणतात- ‘‘खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर जे जड जुलमी जू लादले गेले आहे ते झुगारून देण्याची शक्ती समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरूर आहे. त्याकरता सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून तो अंमलात आणण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या रयतेस असे शिक्षण देण्याची सुरवातही मी केली आहे. यापुढील पिढी तरी लिहिणारी वाचणारी होईल असी मला खात्री आहे.. प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे. तरी दुय्यम व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. माझे संस्थान सातारा व बेळगाव या जिल्ह्यांपेक्षाही लहान असताना आमच्याकडे सात हायस्कुले आहेत. दोन नवीन निघणार आहेत. शिवाय युनिव्हर्सिटीचे पूर्ण शिक्षण देणारे एक कॉलेजही आहे. माझ्या रयतेमध्ये प्राथमिक व उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याची माझी खटपट आहे.’’