कडू कारलं! तुपात तळलं काय किंवा साखरेत घोळलं काय, कडू ते कडूच! अशीच त्या बिचाऱ्या कारल्याची संभावना केली जाते. पण हे कितपत खरं आहे?

कारल्याची भाजी करणाऱ्या कोणत्याही गृहलक्ष्मीला विचारा. ती सांगेल की पांढऱ्या रंगाची कारली तितकी कडवट नसतात. पण गडद हिरव्या रंगाची, एकदम कडूजहर. परदेशात तर अजिबात कडवटपणा नसलेली कारलीही मिळतात. म्हणजे कटुतेच्या बाबतीतही असा वर्णविग्रह आहे तर! मग या कडवटपणाचं काही मोजमाप करता नाही का येणार, असा सवाल साहजिकच फडा काढून उभा राहतो.  अशी एक मोजपट्टी तयार केली गेली आहे. आयबीयू, इंटरनॅशनल बिटरनेस युनिट या नावानं ती ओळखली जाते. पण तिची निर्मिती कारलं किंवा मेथी यांसारख्या भाज्यांचा कडवटपणा मोजण्यासाठी नाही केलेली! तिची गरज भासली ती बीयर उत्पादकांना!

बीयर अनेकांना प्रिय असली तरी तिची चव कडवटपणाकडेच झुकणारी असते. अस्सल पिवय्यांच्या मते तर बीयर कडवट नसेल तर ती बीयरच नाही. ती पिणाऱ्याला हिणवत ते म्हणतील, हाय कंबख्त तूने पीही नही!  बीयरचा कडवटपणा हा त्यात असणाऱ्या ‘आयसोह्य़ुम्युलोन’ नावाच्या अल्फा आम्लांपासून आलेला असतो. ज्या हॉप्स नावाच्या तृणधान्यापासून बीयर बनवली जाते, त्यातच या आम्लांचा साठा असतो. कारल्याच्या रसात नुसताच कडवटपणा असतो. कारण त्यात फक्त या आम्लांचाच समावेश असतो. बीयरमध्ये तिला स्वाद, गंध बहाल करणारे इतर घटकही असतात. ते त्या बीयरचा जिभेला जाणवणारा कडवटपणा कमी-जास्त करतात. म्हणूनच कडवटपणाची खरीखुरी मात्रा मोजण्यासाठी जिभेला जाणवणाऱ्या कडवटपणाचा आधार घेतला जात नाही.

आयबीयूच्या मोजपट्टीवरील त्याच्या मापनासाठी त्या बीयरमध्ये किंवा कारलं, मेथी यांच्यामध्ये आयसोह्य़ुमुलोनचं प्रमाण किती आहे, याची मोजदाद केली जाते. स्पेक्ट्रोफोटोमीटर या उपकरणाच्या मदतीनं हे मोजमाप होतं. दहा लाख रेणूंमध्ये या आम्लाच्या रेणूंचं प्रमाण किती आहे यावरून त्याचं मोजमाप होतं.

अर्थात त्यासाठी प्रथम त्या पदार्थातली ही आम्लं वेगळी केली जातात. सहसा ज्या रसायनात ती विरघळतात, त्याचा वापर केला जातो. आणि त्या विरघळलेल्या आम्लांचा वेध घेणारं स्पेक्ट्रोफोटोमीटरचं उपकरण कामाला लावलं जातं.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

विश्वंभरा’ : आजचे महाकाव्य

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘विश्वंभरा’ ही १९८० मध्ये प्रकाशित झालेली डॉ. सी. नारायण रेड्डी यांची सर्वाधिक महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे.

‘विश्वंभरा’चे इंग्रजी अनुवादक प्रख्यात कवी, समीक्षक डॉ. शिवकुमार म्हणतात, ‘ही रचना हे आजचे महाकाव्य आहे. ज्याची तुलना मिल्टनच्या ‘पॅरेडाईज लॉस्ट’ तसेच दाँतेच्या ‘ला डिवाइना कामेडिया’ यांच्याशी करायला हवी. कारण ही काव्यकृती स्वेच्छा, अशुभ आणि विमुक्तीसारख्या मूलभूत समस्यांशी संबंधित आहे.

‘विश्वंभरा’ या महाकाव्याच्या शीर्षकातच कवी सिनारे यांनी विश्व काव्याशयाची सूचना दिली आहे. ज्ञानदेवांच्या ‘आता विश्वात्मके देवे..’ या भूमिकेनुसार कवी ‘विश्वोराओ’शी संवाद साधतात. या काव्यास कवीने लिहिलेली प्रस्तावना मानवाच्या आदिम व आधुनिक रूपास स्पर्श करणारी आहे.

‘विश्वंभरा’ काव्याचा नायक आहे ‘माणूस’. विशाल विश्व हे त्यांचे बंदिस्त नाटय़गृह. अडथळ्यांची शर्यत कष्टाने पार करून यश प्राप्त करणाऱ्या माणसाची ही कथा आहे. ‘‘अलेक्झांडर, ख्रिस्त, अशोक, सॉक्रेटिस, बुद्ध, मार्क्‍स, लेनिन, गांधी यांच्याप्रमाणे माणसांची अनेक रूपे आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आत्मशोध, साधना या साऱ्या माणसाच्या प्रवृत्ती आहेत. आदिकाळापासून आजपर्यंत मानवयात्रेच्या माध्यमातून झालेली मानवाची प्रगती म्हणजे माझ्या या काव्यातील कथा आहे,’’ अशी भूमिका सिनारेंनी ‘विश्वंभरा’च्या प्रस्तावनेत मांडली आहे. जीवन आणि सृष्टीचा स्वभाव जाणून घेण्याच्या दिशेने मनुष्याचा शोध हा या प्रवासातील प्रमुख विशेष आहे. हा शोध मानवाकडून कलात्मक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक या तीन स्तरांवर सुरू असतो. हा शोध विभिन्न क्षेत्रांत आणि विभिन्न व्यक्तींच्या माध्यमातून केलेला असतो. त्यामुळे ऐतिहासिक नाव किंवा तारखा इ. गोष्टी इथे अप्रस्तुत, अप्रासंगिक आहेत. त्यामुळे कवीने त्यांचा उल्लेख केलेला नाही.

बालमनाला मोहविणारे हे विश्व कालांतराने कसे काळेकभिन्न वाटते. कालकूट विष होते. धर्मजातीचे कुंपण होते. येसूचा क्रूस होते. गांधींवर उगारलेली बंदूक होते- हे विदीर्ण चित्रण सिनारेंनी आपल्या ‘विश्वंभरा’ या महाव्यात केले आहे.  ही कलाकृती एक ‘गीता’ ठरते, ती आजच्या काळाचे विश्वरूपदर्शन घडविण्याची शक्ती सिनारेंनी दाखविल्यामुळे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com