रोमन राज्यपद्धतीचा आदर्श पुढे ठेवून युरोपात अनेक ठिकाणी रोमन प्रशासन पद्धतीचा स्वीकार केला गेला. इ.स.पूर्व ५०९ ते २७ या काळात रोमन राज्यात प्रजासत्ताक सरकार होते. या प्रजासत्ताकाचा प्रमुख घटक ‘डेमोस’ म्हणजे प्रजा समजली जाई. लोकांनी निवडून दिलेल्या सिनेटर्सकडे राज्य प्रशासनावर देखरेख करण्याची जबाबदारी होती. सिनेटर्सनी नियुक्त केलेला ‘काउन्सल’ हा राज्याचा सर्वोच्च अधिकारी. सिनेटला आवश्यकता वाटली तर ते काउन्सलला डिक्टेटर नियुक्त करण्याचा सल्ला देत असत. रोमन प्रजासत्ताकाच्या पाचशे वर्षांच्या इतिहासावर सहा वेळा काउन्सलपदावर काम केलेल्या गायस ज्युलियस सिझरचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो. प्लॅमेन डायलीस (धर्मगुरू), पाँटीफेमस मॅक्झिमस (राज्याचा प्रमुख धर्माधिकारी), वकील, सेनाधिकारी, सेनापती, युद्धनीतीतज्ज्ञ, प्रोटेक्टर (न्यायाधीश), कोषाध्यक्ष, बांधकाममंत्री, सहा वेळा काउन्सल, दहा वेळा डिक्टेटर अशा विविध भूमिकांमध्ये जुलियस सिझरने रोमन प्रजासत्ताकाची प्रशासकीय व्यवस्था चोख ठेवली. जगातील नामवंत युद्धनीती तज्ज्ञांमध्ये जुलियस सिझरचा समावेश केला जातो. सिझरने आपल्या राजकीय विरोधकांना कठोरपणे देशोधडीला लावून परमुलुखांवर केलेली आक्रमणे आणि त्याच्या कामाचा प्रचंड झपाटा यामुळे त्याने रोमच्या सर्व सिनेटर्सवर जबरदस्त वचक बसवला. जुलियस स्वत:चे ३०० ग्लॅडिएटर्स बाळगून होता आणि शिवाय काउन्सल म्हणून सिनेटने त्याला बारा लिफ्टर्स म्हणजे शरीर संरक्षक दिलेले होते. तो कुठेही बाहेर जाताना त्याचे हे रक्षकांचे सन्य घेऊन जात असे! त्यामुळे सर्व सिनेटर्स, राजकीय विरोधकांवर सिझरने दहशत बसवली होती. यासर्व सिनेटर्सपेक्षा सिझर फारच वरच्या पातळीवर जाऊन हुकूमशहा बनू पहात होता. रोमन प्रजासत्ताकाच्या नाण्यांवर एका बाजूला रोमन देवता तर दुसऱ्या बाजूला सिझरचे चित्र छापले होते!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

गुल- ए -गुलजार- गुलमोहोर
भर उन्हाळ्यात लाल-शेंदरी फुलांनी पेटलेला गुलमोहोर उन्हाची काहिली विसरायला लावतो. मूळ मादागास्कर बेटावरचा, २०० वर्षांपूर्वी आपल्याकडे आलेला गुलमोहोर आपल्याकडचा नाही, हे आपल्याला पटतच नाही; इतकी त्याची मुळं आपल्या जीवनात, साहित्यात, चित्रकलाकृतींत खोलवर गेलेली आहेत. याचं मराठीत गुलमोहोर, इंग्रजीत फ्लम्बॉयंट, पिकॉक फ्लॉवर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुलमोहोराचं कूळ आहे, लेग्युमिनोसी-सिसालपिनोएडी, म्हणजे आपल्या कांचनगणातला. या राजेशाही वृक्षाचं शास्त्रीय नावही भारदस्त! ‘डिलॉनिक्स रेजिया’! ‘डिलॉनिक्स’ म्हणजे नख्या आणि ‘रेजिया’ म्हणजे राजेशाही.
गुळगुळीत हिरव्या-भुरकट खोडाचा, छत्राकार पसरलेल्या फांद्यांचा हा वृक्ष १८-२० मीटर उंच वाढतो. याची पोपटी-हिरवीगार संयुक्त पानं मोठी असतात. प्रत्येक पान २०-३० जोडपर्णिकांचं आणि प्रत्येक पर्णिकाच्या पुन्हा चाळीसेक लहान उपपर्णिका; यामुळे पान कलाकुसर केलेलं, पाखराच्या पिसासारखं दिसतं. थंडीत पानं गळून पडतात आणि वसंत ऋतूत कोवळी पालवी येते.
गुलमोहोराचं झाड पानं असतानाही विलोभनीय दिसतं आणि बहरात तर अधिक विलोभनीय दिसतं. एप्रिल-जूनमध्ये फुलांचा बहर येतो. फांद्यांवर गोबऱ्या कळ्या येतात नि मग तळहाताएवढी लाल-शेंदरी फुलं गुच्छाने उमलायला लागतात. सुवास नसलेल्या या फुलाची पाच निदलं बाहेरून हिरवी दिसली तरी आतल्या बाजूने लाल आणि नख्यांसारखी टोकदार, वळलेली दिसतात. यावरूनच त्याच्या शास्त्रीय नावात ‘डिलॉनिक्स’ आलंय. पाकळ्या मुक्त, उमललेल्या. आणि त्यातून एका स्त्रीकेसरासह दहा पुंकेसर बाहेर आलेले दिसतात. बोटभर लांबीच्या, लाल-शेंदरी रंगाच्या पाच पाकळ्यांतली एक पाकळी वेगळी, जाडसर, पांढऱ्या रंगावर िशतोडे असल्यासारखी असते. पहिल्या पावसात गुलमोहोराच्या झाडावर पेटत्या ज्वाला आणि झाडाखाली गळलेल्या पाकळ्यांचा गालीचा, असं मनोरम दृश्य दिसतं.
पावसाळ्यात झाडावर तलवारीसारख्या तीस ते बत्तीस सें.मी. लांब आणि सहा सें.मी. रुंदीच्या हिरव्या शेंगा लटकू लागतात. वाळल्यानंतर त्या काळ्या पडतात. शेंगेत १४-२० काळपट, चपटय़ा बिया असतात. शेंग हलवली की खुळखुळ वाजते. हातभर लांब लाकूड अतिशय मऊ असल्याने वापरत नाहीत. अतिशय जलद वाढणाऱ्या या झाडाचा उपयोग मुख्यत: शोभेसाठीच केला जातो.
चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org