हातमाग, यंत्रमाग आणि स्वयंचलित यंत्रमागामध्ये बाण्याचे सूत विणण्यासाठी कांडी आणि ती बसवण्यासाठी धोटा वापरला जातो. वापरलेल्या मागाप्रमाणे धोटय़ाचा वेग असतो. हा धोटा आरपार जाण्यासाठी ताण्याचे धागे योग्य तऱ्हेने उघडणे आवश्यक असते. त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे धोटय़ाच्या आकाराला व त्याबरोबर त्यातील कांडीला आकाराच्या मर्यादा येतात. अर्थात त्यामुळे कांडीवर गुंडाळले जाणारे सूतपण ठरावीक मर्यादेत ठेवावे लागते. धोटा फेकायला लागणारी ऊर्जा आणि थोडय़ाच अंतरावर जाऊन म्हणजे मागाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे तो थांबवावा लागतो. त्या वेळी येणाऱ्या अडचणी, मागावर असलेला धोटय़ाचा प्रचंड वेग, त्यामुळे येणारी अपघाताची शक्यता आणि शेवटचे पण महत्त्वाचे या सर्व खटाटोपांत होणारे ध्वनिप्रदूषण या सर्व मागांच्या समस्या आहेत.
यापकी काही समस्यांवर मात करणारे यंत्र म्हणजे धोटाविरहित विणकाम यंत्र तयार झाले. यामुळे एका यंत्रामागे, तसेच एका कामगारामागे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. या यंत्रात इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि छोटे प्रक्रियक वापरल्याने, उच्च दर्जा आणि जास्त कापडनिर्मिती शक्य झाली आहे. ही यंत्रे प्रगत मानली जात असली तरी या यंत्रावरदेखील कापड बनविण्यासाठी ताण्याचे विभाजन करणे (दम उघडणे), बाण्याचा धागा टाकणे आणि मग तो घट्ट बसवणे (बाणा ठोकणे) हय़ा तीन क्रिया घडतातच. फक्त धोटा फेकण्याच्या यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. इतर दोन्ही यंत्रणांमध्ये तांत्रिकरीत्या तेच काम केले जाते. फक्त नवीन धोटाफेक यंत्रणेनुरूप थोडासाच बदल केलेला आहे. स्वयंचलित यंत्रमागामध्ये ज्या यांत्रिक सोयी आहेत, त्या या यंत्रातही केलेल्या आहेत. पण त्याची परिणामकारकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सुधारणा केल्या आहेत. याशिवाय संगणकीकरणाची दिलेली जोड खूप उपयुक्त ठरली आहे.
बाण्याचे सूत धोटय़ाऐवजी मोठय़ा कोन किंवा चीजद्वारे थेट ताण्याच्या मध्ये टाकले जाते. त्याकरिता प्रक्षेपकाची किंवा पात्याची किंवा वायुझोताची किंवा जलझोताची सोय केलेली असते. या मूलभूत फरकामुळे पारंपरिक मागातील अवजड भागांची गरज पडत नाही. तसेच धोटय़ापासून होणाऱ्या सर्व अडचणींवर मात करता आली आहे. ध्वनिप्रदूषणाचा, आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. या यंत्राची भांडवली किंमत खूपच जास्त असल्यामुळे आपल्याकडे ही यंत्रे मर्यादित प्रमाणात आहेत.
महेश रोकडे (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
– office@mavipamumbai.org

 

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
What is millet milk
मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे

संस्थानांची बखर -संस्थान मोरवी
गुजरातच्या राजकोटपासून ६० कि.मी.वर असलेले मोरवी शहर हे ब्रिटिशराजमधील एक संस्थान होते. कच्छच्या जडेजा राजघराण्यातील कान्होजी याच्या वडिलांचा खून झाल्यावर त्याने भूज येथून पळून जाऊन १६९८ साली मोरवी येथे आपले छोटेखानी राज्य स्थापन केले. कान्होजीचा पुढील वंशज रावळजी याने मोरवीला तटबंदी घालून रस्ते बांधले. रावळजीच्या मृत्यूनंतर पुढील शासकांची ४० वर्षांची कारकीर्द कच्छ आणि इतर शेजारी राज्यांशी लढण्यातच गेली. ब्रिटिशांनी नेहमीप्रमाणे कूटनीती वापरून १८०७ साली मोरवीचा तत्कालीन शासक ठाकूर जयाजी वाघजी याच्याबरोबर संरक्षण करार केल्यावर राज्यात शांतता प्रस्थापित झाली. मोरवीच्या इतिहासात राज्यकर्त्यांच्या पाच पिढय़ानंतर प्रथमच १८४६ साली गादीवर आलेल्या ठाकूर रावजी द्वितीय याने राज्याच्या उत्कर्षांसाठी प्रयत्न केले. ठाकूर रावजी आणि पुढचे शासक वाघजी द्वितीय आणि लखधीरजी यांनी राज्यात नवलाखा हे नवे औद्योगिक बंदर बांधून वावनिया हे बंद असलेले जुने बंदर दुरुस्त केले, राज्यात टेलिफोनसेवा, ट्रमसेवा, शाळा सुरू केल्या. या शासकांनी चालना दिलेल्या कापड गिरण्या, मीठ उत्पादन उद्योग, खाद्यतेल उद्योग, साखर कारखाने, फरशी निर्मिती अशा विविध उद्योगांमुळे मोरवी हे एक संपन्न संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. २२०० चौ.कि.मी. राज्य प्रदेश असलेल्या मोरवी संस्थानाचा काही भाग कच्छच्या रणात अंतर्भूत होता. चोख प्रशासन आणि राज्याच्या औद्योगिक उन्नतीमुळे ब्रिटिश सरकारने राज्याला अकरा तोफसलामींचा मान दिला. १५ फेब्रुवारी १९४८ रोजी मोरवी संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
सुनीत पोतनीस