‘बोके, जरा इकडे कान कर, तुला काहीतरी सांगायचंय, थोडं सिरियस आहे, म्हणजे सिरियसली घेण्यासारखं आहे. ऐक.’ कुकूर बोकीच्या कानाला लागून म्हणाला. बोकीने ‘आय अ‍ॅम इन नो मूड टु लिसन’ असा लुक कुकूरला दिला. कुकूरनं दाद दिली नाही. तुला नाही वाटत अलीकडे हा जरा सिरियस झालाय. थोडा उदास असतो, स्वत:मध्ये मग्न राहतो. ‘सॅड’ आहे असं वाटतं.’ बोकीने खाडकन डोळे उघडून, कान ताठ करून माझ्याकडे पाहिलं. एरवी डोळ्याला डोळा न देणारी बोकी टक लावून माझ्याकडे पाहू लागली. दुपारच्या वेळी उष्ण हवा आली की डुलकी लागते. कुकूरच्या हुंकरानं मी जागा होऊन कुकूर नि बोकीच्या गप्पा ऐकत होतो.
बोकी कुकूरकडे बघून म्हणाली, ‘वाटतोय गं बाई, जरा नव्‍‌र्हस. बघ कसा स्वस्थ बसलाय नेहमी, वाचत असतो नाही तर लिहीत असतो.’ दोघांनी मग माझ्या डोळ्याला डोळा दिला.
‘एकटं वाटतंय गं त्याला. त्याला ना एकटेपणा नाही आवडत. आपण असताना त्याला का एकटं वाटावं? कुकूरनं बोकीला विचारलं. कुकूर, तुला ना डोकं कमीच आहे. यू ऑल्वेज थिंक फ्रॉम युअर हार्ट. अरे, आपण सगळे एकटे असतो. एकटे राहात नसलो तरी एकटेच जगतो. मोस्ट ऑफ द टाइम्स, आपण कामात असल्यानं. आपला एकटेपणा आपल्याला जाणवत नाही की त्रास देत नाही. एखाद्या कारणानं एकटेपणा जाणवला की आपण एकाकी होतो. वर्षभर मित्राबरोबर सदैव बडबडत असायचा, आता ती थांबणार म्हणून तो जरा गप्प गप्प असेल. कळलं ना? बोकी म्हणाली.
ती डोकॅलिटी मला नाही कळत. वाँट टु बी विथ हिम.. तू पण जरा बोल ना त्याच्याशी. वी आर हिज खरेखुरे मित्र. कुकूर माझ्या पायाला चिकटून म्हणाला. बोकीनं जांभई दिली, हातपाय लांब करून टुणदिशी उडी मारून मांडीवर आली. ‘बघ, तू नुसतं प्रेमानं जवळ बसतोस. मला त्याच्या डोक्यातले विचार कळतात. बोकी कुकूरला म्हणाली. कुकूरकडे त्यावर उत्तर नव्हतं.’
थोडय़ा वेळानं बोकी म्हणाली, यू नो, कुकूर, संवेदनशील असणाऱ्या माणसांना सर्वात आधी स्वत:ला मॅनेज करावं लागतं. ते जमतंय त्याला. बट् देअर आर सच मोमेंट्स्.. ‘तू आणखी काहीतरी सुचव ना त्याला!’ कुकूर म्हणाला. बोकीनं कान हलवून नाही म्हटलं. कुकूरसारखं काही काम करीत राहिलं, स्वत:ला बिझी ठेवलं तर एकटेपणा सुसह्य होतो, हे खरंय पण, एव्हरी वन मस्ट लर्न टु लीव्ह अलोन! मी शिकलीय बाई एकटं एकटं जगायला. माझ्या मांडीवरून उतरून बोकी म्हणाली, ‘कुकूर जगण्यातली गंमत अनुभवायची असेल तर बुद्धी आणि मन यांचा समतोल राखायला शिकावं लागतं. माणसं स्वत:ची प्रौढी मिरवतात, नाहीतर स्वत:ची अवस्था दयेस पात्र आहे अशा भ्रमात राहातात. आत्मप्रौढी किंवा आत्मकरुणा दोन्ही वाईट. आत्मभान हवं. जगण्याचा आनंद हवा. बेधुंदी नको, तर्कनिष्ठ हवी, पण तर्कटीपणा नको.. कुकूरला झोप लागत्येय असं वाटल्यानं, बोकीनं त्याला जागं केलं. चल आपल्या घरी जाऊ.. दोघं माझ्याकडे पाहून हसले आणि माझ्या मनात गायब झाले.. आता कुकूर, बोकी (तिची छकुली, बकुली आणि शकुली)  हे सगळे माझ्या मनात सुखाने नांदताहेत!
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : प्राण्यांची सुरक्षितता
प्राणी संग्रहालयात मोठय़ा वयाच्या लोकांपासून लहान मुलांपर्यंतची सगळी माणसे येत असतात. इतरत्रपणे प्राणी संग्रहालयातही येणाऱ्या लोकांचे उद्देश वेगवेगळे असतात. काही लोक प्राणी पाहून करमणूक करून घेण्यासाठी येतात. काही लोक प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी येतात. काही लोक वेळ घालवण्यासाठी येतात. मुंबईच्या जिजामाता ऊर्फ राणीच्या बागेत मात्र खूप झाडे असल्याने काही लोक ही झाडे पाहण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी येतात, तर काही लोक तेथे सावली आहे म्हणून पिकनिकसाठी किंवा झोप काढण्यासाठीही येतात. उद्देश कोणाचा काहीही असो, पण जोवर तो प्राणी, झाडे किंवा उद्यानाला उपद्रवकारक नसेल तर भले ते तेथे येऊन झोपेनात का?
प्राणी पाहणाऱ्यातील काही लोक, विशेषत: मुले हातात छोटे, मोठे दगड घेऊन ते िपजऱ्यातील प्राण्यांना मारण्यात मश्गूल होतात व त्यामुळे त्या प्राण्याला होणाऱ्या वेदना पाहून स्वत:ची करमणूक करून घेतात. ही करमणूक फार हीन दर्जाची आहे. यात त्या प्राण्यांना जखमा होत असतात, कारण तो दगड किती लहान किंवा किती मोठा असेल त्यावर, तो किती सपाट आहे किंवा अणकुचीदार असेल त्यावर आणि तो किती वेगाने येऊन प्राण्यांवर बसेल त्यावर होणाऱ्या जखमेचे स्वरूप अवलंबून असते. या प्रत्येक वेळी तेथे प्राणी संग्रहालयाचा माणूस त्या प्राण्यांना होणाऱ्या जखमांवर औषधपाणी करायला हजर नसल्याने त्या जखमा तशाच अंगावर बाळगण्यावाचून त्या प्राण्यांना इलाज नसतो. जर तो प्राणी तरुण असेल तर त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि मग अशा जखमा आपोआप बऱ्या होतात, पण जर तो प्राणी म्हातारा असेल किंवा रोगी असेल तर त्याच्या जखमा चिघळून त्या प्राण्याचे बरे-वाईट होऊ शकते. यासाठी त्या मुलांबरोबर असणाऱ्या मोठय़ा लोकांचे अथवा इतर लोकांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी अशा मुलांना असे चुकीचे वर्तन करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. प्राण्यांना काडीने डिवचणे किंवा काठीने ढोसणे हेही करू नये.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची : पारशांचे उगमस्थान
आपण ?! पूर्वीच्या पर्शिया म्हणजेच हल्लीच्या इराण या देशातील मूळ रहिवासी इंडो युरोपिअन या आर्याच्या शाखेचे होते. संस्कृतमध्ये आर्य यान म्हणजे आर्याचा मार्ग यावरून पुढे इर्र आन व त्यावरून इराण असे त्या देशाचे नाव झाले. त्या प्रदेशातल्या लोकांचा धर्म झोरास्ट्रियन हा जगातील पुरातन धर्मापैकी एक. इ.स. पूर्व २६०० च्या आसपास याची स्थापना अझरबैजानमधील अरक येथे झरतृष्ट याने केली. गुहेमध्ये देवाशी प्रत्यक्ष झालेल्या संवादातून त्याने जो धर्मग्रंथ लिहिला त्याचे ऋग्वेदाशी विलक्षण साम्य असून, त्यात अग्नीला महत्त्व देण्यात आले आहे. आठव्या शतकाच्या अखेरीस पर्शियावर अरब मुस्लिमांनी आक्रमण केले. या आक्रमकांविरुद्ध इराणी झोरास्ट्रियन लोकांनी दोनशे वर्षे बंड करून लढत दिली, पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ गेल्यावर अरबांनी त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवले. एक म्हणजे अत्यंत बोजड होईल असा जिझिया कर देणे किंवा अरबांचा इस्लाम धर्म स्वीकारणे. बऱ्याच लोकांनी दुसरा पर्याय निवडून त्यांचा इस्लाम धर्म स्वीकारला. बाकीचे लोक मात्र दोन्ही पर्याय नाकारून अरबांच्या तावडीतून निसटून भारतातील सांजाने या जदीराणा या राजाच्या राज्यात आले. त्यांना तिथे स्थायिक होण्यासाठी राणाकडे त्यांनी परवानगी मागितली. राणाला त्यांना परवानगी देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने त्यांना निर्वासित म्हणून परवानगी नाकारून सोबत एका पात्रात दूध भरून पाठविले. पर्शियन लोकांच्या नेत्याने त्यावर प्रत्युत्तर म्हणून त्या दुधात साखर टाकली व ते ओसंडून बाहेर पडू न देता राणाला परत केले. या कृतीतून योग्य अर्थ घेऊन राणाने त्यांचे स्वागत करून त्यांना आपल्या प्रदेशात समाविष्ट करून घेतले. पर्शियन लोक स्थानिक लोकांमध्ये गोडीगुलाबीने राहून त्यांच्यातलेच एक झाले. तेव्हापासून त्यांना पारसी असे नाव पडले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. : २६ डिसेंबर
१८९३ चीनमधील नवलोकशाही कम्युनिस्ट क्रांतीचे प्रणेते माओ त्से-तुंग (झेडाँग) यांचा जन्म.
१९१४ समाजभूषण बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे) यांचा जन्म. हिंगणघाट (जि. वर्धा) येथील जमीनदार कुटुंबात जन्मलेले बाबा बालपणापासूनच निर्भीड व बंडखोर. मानवतावाद आणि सामाजिक कार्याची बीजे त्यांच्या बालपणातच रुजली. बी.ए., एल.एल.बी.चं शिक्षण झाल्यावर त्यांनी दुर्ग-मध्य प्रदेश येथे वकिली करण्यास सुरुवात केली. भारत छोडो आंदोलन काळात महात्मा गांधी व विनोबांचा प्रभाव आणि सहवास मिळाला. यातूनच त्यांनी देशासाठी तुरुंगवास भोगला. ब्रिटिश सैनिकाच्या तावडीतून एका महिलेचे संरक्षण केले म्हणून महात्मा गांधी यांनी त्यांचे वर्णन अभयसाधक असे केले. आमटे यांच्याबद्दल सुचित्रा घोगरे-काटकर लिहितात- ‘कुष्ठरोग्यांना त्यांच्या घरातूनही हाकलले जात होते, त्या वेळी बाबा आमटे नावाचा तरुण पुढे येतो आणि कुष्ठरोग्यांची सेवा-शूश्रुषा करू लागतो. त्यांची वसाहत उभी करतो आणि त्याला ‘आनंदवन’ बनवतो. हे सारेच विलक्षण होते. कुष्ठरोग्यांवर केवळ उपचार करून बाबा थांबले नाहीत तर त्यांना स्वावलंबी बनविण्याचे आणि कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्याचे कामही त्यांनी केले.  
१९१७  कवी, समीक्षक, भाषांतरकार प्रभाकर बळवंत माचवे यांचा जन्म. ‘हिंदी व मराठी के निर्गुण काव्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर त्यांना पीएच.डी. मिळाली होती.
डॉ. गणेश राऊत  –  ganeshraut@solaris.in