आपण कापडाचे ब्लीचिंग कसे करतात ते समजून घेतले आहेच. ब्लीचिंगमुळे कपडा पांढराशुभ्र होतो आणि त्याकरिता आता प्रामुख्याने हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर होत आहे. तयार कपडे काही महिने वापरून झाल्यावर त्याचे ब्लीचिंग करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. अशा वेळी तो तयार कपडा एक तर पांढऱ्या रंगाचा असावा किंवा व्हॅट रंगाने रंगवलेला असावा. व्हॅट रंग वापरून गडद हिरवा, गडद जांभळा, गडद निळा इत्यादी रंगांचे कपडे मिळतात. इतर प्रकारचे म्हणजे अगदी आधुनिक रिअ‍ॅक्टिव्ह रंग किंवा अन्य रंग वापरून रंगवलेले कपडे असतील तर ते ब्लीचिंगमध्ये टिकत नाहीत, रंग निघून जातात. त्यामुळे रंगीत कपडे ब्लीचिंग करावयाचे असल्यास ते कोणत्या प्रकारच्या रंगाने रंगवले आहेत, याची निश्चित माहिती मिळवणे गरजेचे असते. फक्त व्हॅट रंग वापरून रंगवलेले कपडे आपण ब्लीच करू शकतो.

पांढऱ्या कपडय़ाचे ब्लीचिंग करताना ब्राइटिनग एजंटचा वापर केला जातो. त्यामुळे कपडय़ाची शुभ्रता आणि चमक दोन्ही वाढायला मदत होते. तयार कपडय़ाचे ब्लीचिंग हे धुलाईच्या यंत्रात करतात. कापड ब्लीचिंग करताना जेवढी शक्तिशाली प्रक्रिया केली जाते तेवढी प्रक्रिया तयार कपडय़ासाठी करावी लागत नाही. तयार कपडय़ाची ब्लीचिंग प्रक्रिया सौम्य प्रकारची असते. म्हणजेच द्रावणाची तीव्रता कमी; द्रावणाचे तापमान कापडाच्या प्रक्रियेपेक्षा कमी ठेवतात. पांढऱ्या कपडय़ाबरोबर रंगीत कपडा एकत्र ब्लीचिंग करू नये, नाही तर रंगीत कपडय़ाचे डाग पांढऱ्या कपडय़ावर पडण्याची शक्यता असते.
ब्लीचिंगनंतर धुलाईची प्रक्रिया करतात. त्या वेळी ती धुलाईपेक्षा कापडाला मृदू बनवण्याची प्रक्रिया ठरते. मृदुकारक घटक घालून त्याच धुलाईयंत्रात ही प्रक्रिया केली जाते. साबण आणि जलशोषक घटक घालून धुलाईयंत्रात एकामागोमाग प्रक्रिया होतात. त्यामध्ये प्रथम धुलाई होऊन मग दोन/तीन वेळा पाण्यात कपडे खळबळले जातात, जेणेकरून कपडय़ातील साबणाचा पूर्ण अंश निघून जावा. धुलाईची प्रक्रिया किती वेळ करावी आणि किती जोमाने करावी हे धुतल्या जाणाऱ्या कपडय़ानुसार ठरते. पातळ आणि नाजूक कपडय़ांकरिता अर्थातच वेळ आणि तापमान कमी ठेवावे लागते तर पँटसारख्या जाडय़ा कपडय़ासाठी वेळ आणि तापमान वाढवायला लागेल. एकूण काय धुण्याचे कपडे किती वजनाचे आहेत त्यानुसार हा निर्णय घ्यावा लागेल.

सतीश दिंडे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

 

संस्थानांची बखर

भोर संस्थान स्थापना

पुण्याहून ५१ कि.मी. वर असलेले सध्याच्या पुणे जिल्ह्याातील भोर हे तालुक्याचे ठिकाण ब्रिटिश राजवटीत एक संस्थान होते. प्रथम भोर हे औंध, फलटण, जत, अक्कलकोट यांच्याप्रमाणेच साताऱ्याच्या छत्रपतींच्या जहागिरीचा भाग होता.
शंकराजी नारायण देशपांडे ऊर्फ गांडेकर हे पठणजवळ राहणारा कर्तृत्ववान गृहस्थ संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सचिवपदी नियुक्त झाले. पेशवे मोरोपंतांनी त्याला स्वतसाठी सहायक म्हणून घेतले. शंकराजी नारायण आणि रामचंद्रपंत ही संभाजी महाराजांच्या पसंतीची खास माणसे. संभाजीराजे पकडले जाण्यापूर्वी १६८९ च्या फेब्रुवारीत स्वत राजांनी रायगडावरून शंकराजीला राजगड घेण्यासाठी पाठविले होते. राजाराम महाराज जिंजीस गेले असताना त्यांनी आपल्या पश्चात सर्व कारभार शंकराजीकडे सोपविला होता.
शंकराजी यांना डोंगरातल्या चोरवाटा माहिती होत्या आणि ते मावळ्यांमध्ये मिसळत असत. या गुणांचा उपयोग करून घेण्यासाठी रामचंद्रपंत अमात्यांनी शंकराजी यांना फौजेची सूत्रे दिली. मोगलांनी घेतलेले महत्त्वाचे किल्ले- तोरणा, प्रतापगड, राजगड हे शंकराजी देशपांडे यांनी परत मराठय़ांना मिळवून दिले. शंकराजी हे अत्यंत चतुर, मुत्सद्दी राजकारणी, धाडसी, राजकीय उलाढालींत निष्णात होते. त्यांच्या या गुणांनी प्रभावित होऊन राजाराम महाराजांनी १६९७ साली त्याला भोर आणि आसपासची जहागीर देऊन त्याला मराठय़ांच्या राज्याचे पंतसचिव म्हणून नियुक्त केले. शंकराजीने आपल्या कर्तृत्वाने आणखी वतने मिळवून आपल्या भोरच्या जहागिरीला राज्याचे स्वरूप आणले. पुढे १८४८ साली ईस्ट इंडिया कंपनी सरकारने साताऱ्याच्या छत्रपतींचे राज्य खालसा करून साताऱ्याच्या औंध, भोर, फलटण आणि जत या चार जहागीर राज्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणले.
पुढे १७०७ साली छत्रपती शाहूने ताराबाई यांचा पराभव करून सर्व सरदारांना आपल्या भेटीस बोलाविले असता, शंकराजी यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com