26 March 2017

News Flash

मातीची सुपीकता

शेतजमिनीची सुपीकता मातीतल्या खनिज द्रव्यांवर अवलंबून असते. शेतात मातीचा एक मीटर जाडीचा थर असेल

[email protected] | Updated: January 3, 2013 4:09 AM

शेतजमिनीची सुपीकता मातीतल्या खनिज द्रव्यांवर अवलंबून असते. शेतात मातीचा एक मीटर जाडीचा थर असेल तर त्यातील खनिजे वापरून आपण सुमारे २५,००० वष्रे शेती करू शकतो, पण ही खनिजे पाण्यात फारच कमी प्रमाणात विरघळत असल्याने ती मुळांवाटे शोषून घेणे हे कार्य वनस्पतींना फार अवघड जाते, म्हणून पाण्यात लीलया विरघळतील अशा स्वरूपाची रासायनिक खते पिकांना देण्याची शिफारस कृषितज्ज्ञ करतात. मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या जेवढी अधिक, तेवढी त्या मातीची सुपीकता अधिक असते. याचे पाठय़पुस्तकांमध्ये दिलेले स्पष्टीकरण असे आहे की मातीतले सूक्ष्मजंतू सेंद्रिय पदार्थाचे, म्हणजे पाने, मृत प्राणी, प्राण्यांची विष्ठा इ. पदार्थाचे विघटन करून त्यांच्यात समाविष्ट असणारे खनिज घटक वनस्पतींना उपलब्ध करून देतात. या पद्धतीने सेंद्रिय शेती करावयाची असेल तर एक हेक्टर शेतीत सुमारे १० हेक्टर क्षेत्रातला त्याज्य शेतमाल खताच्या रूपाने वापरावा लागेल. प्रयोगांती हे सिद्ध झाले आहे की आपण जमिनीत केवळ शुद्ध साखर घातली, तरी जमिनीची सुपीकता वाढते, कारण साखरेचा अन्न म्हणून वापर करून जमिनीतले सूक्ष्मजंतू आपली वाढ करून घेतात. जी खनिजे वनस्पतींना आवश्यक असतात तीच सूक्ष्मजंतूंनाही लागतात, आणि जरी ती कमी विद्राव्यतेमुळे वनस्पतींना उपलब्ध होऊ शकत नसली तरी सूक्ष्मजंतू ती मातीतून आपल्या पेशिकांमध्ये सहज शोषून घेऊ शकतात. सूक्ष्म जंतू स्वत:चे सेंद्रिय अन्न स्वत: तयार करू शकत नाहीत, त्यामुळे जमिनीत घातलेले सेंद्रिय पदार्थ खाऊन संपले की त्यांची उपासमार होऊन ते मरतात आणि त्यांनी शोषून घेतलेली खनिजे वनस्पतींना उपलब्ध होतात. म्हणून आपल्या शेतात साखर, स्टार्च, सेल्युलोज, प्रथिने यांसारखे पदार्थ प्रतिहेक्टर केवळ २५ किलोग्रॅम इतक्या कमी प्रमाणात घालून मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढविल्यास आपण जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. शेतीच्या या पद्धतीमुळे आपल्या मातीतली खनिजे हळूहळू संपून जातील अशी भीती काही जण व्यक्त करतात, पण असे काही होत नाही, कारण भूगर्भातील खडकांपासून सतत नवी माती निर्माण होतच असते.
लेखक (गाव)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई२२  [email protected]

जे देखे रवी.. : ३. रस्त्यावरच्या गप्पा
संध्याकाळी निदान एक तास तरी  मी फिरायला जातो. मला कोठेही फिरता येते. मला असे वाटते की, जर पदपथावर माणसे असतील तर त्यांना चुकवण्यासाठी जे नागमोडी चालावे लागते त्यामुळे अंतर वाढते. मी चपळ होतो आणि जास्त व्यायाम होतो. फिरताना जुनी ओळखीची माणसे भेटतात. त्यांच्याबरोबरच्या संवादाचा एक नमुना सांगतो. तो म्हणतो, ‘आज संध्याकाळी फिरायला? काय प्रॅक्टिस बंद केली की काय?’ मी म्हणतो ‘नाही. हल्ली सकाळी प्रॅक्टिस करतो.’ तो म्हणतो, ‘अजून पेशंट बघता,’ हा प्रश्न मोठा खोल आहे. पेशंट बघता का, या प्रश्नात निदान ऑपरेशन करायचे थांबवले की नाही असा सूर असतो. मी म्हणतो, ‘काहीही फरक नाही. मागच्या पानावरून पुढे चालू आहे.’ यामुळे त्याचे समाधान होत नाही तेव्हा तो म्हणतो, ‘बाकी सगळे ठीक?’ मी उत्तर देतो, ‘ठीकठाक’. तो म्हणतो तब्येत कशी आहे? मग मी त्याला थोडा दिलासा देतो आणि म्हणतो, ‘मला डायबेटिस झाला आहे.  इन्शुलीनचे इंजेक्शन घ्यावे लागते.’ या उत्तरामुळे त्याचे समाधान होते. मग तो विचारतो हल्ली काय लिहिता आहात. तेव्हा मी ‘जुजबी थोडेफार’ असे उत्तर देतो. तेव्हा तो विचारतो, तुमची पूर्वीची पुस्तके खपली का हो? तेव्हा मी त्याला धक्का देतो आणि अनेक आवृत्त्या निघाल्याचे वर्तमान सांगतो तेव्हा तो दिशा बदलतो आणि म्हणतो, ‘मराठी पुस्तकाचा मोबदला देतात का हो?’ तेव्हा मी फारसा नाही असे सांगितल्यावर तो थोडा कृतार्थ झाल्याचा भास होतो. म्हणतो, ‘अहो, हल्ली सगळी पुस्तके संगणकावर वाचता येतात. तेव्हा तुम्ही संगणकावर लिहून ‘सायबर स्पेस’मध्ये प्रवेश करा, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने लोकप्रिय व्हाल.’ हा ज्ञानी सल्ला ऐकल्यावर मी त्याला अशाच तऱ्हेचे प्लास्टिक सर्जरीवरचे पुस्तक वेबसाइटच्या आधारे लिहीत आहे असे सांगतो. तेव्हा तो म्हणतो, ‘तुमच्या वेळचे जुने ज्ञान आता कालबाह्य झाले असणार, मग तुम्ही लिहिता कसे?’ तेव्हा अनुभव आणि नवी गोळा केलेली माहिती याच्या आधारे लिहितो, फार गंमत येते असे मी उत्तर देतो, तेव्हा तो माणूस एकदमच पवित्रा बदलतो आणि म्हणतो ‘पुस्तक छापणार की नाही?’ मी म्हणतो, शेकडो रंगीत चित्रे आहेत, असले पुस्तक छापणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. ‘तेव्हा तो सूचना करतो’ ‘एवढी प्रॅक्टिस तर करता? कशाला हात आखडता? समाजाच्या दृष्टीने हे तुमचे कर्तव्यच आहे.’ मी म्हणतो तेही खरेच. घरी आल्यावर मी तो संवाद शब्दश: सांगतो तेव्हा आमची ही म्हणते, ‘उद्धटासी वागावे उद्धट खडुसासी भेटला खडूस’ मी मनात म्हणतो ‘जयजय रघुवीर समर्थ.’
रविन मायदेव थत्ते  [email protected]

वॉर अँड पीस : अग्निमांद्य
‘आमचा मुलगा जेवत नाही’, ‘हिला भूक नाही’, ‘डॉक्टर, काहीतरी औषध द्या, ही जेवेल असे करा.’ अशा तक्रारी घेऊन लहान मुलांचे आईवडील नित्य येत असतात. तसेच ‘हा मुलगा कितीतरी खातो, पण अंगीच लागत नाही’, ‘गेली कित्येक वर्षे मुलीचे वजन काही वाढत नाही तसेच आहे.’ अशा तक्रारी घेऊन येणारे आईवडील रोज भेटतात. ‘रोग: सर्वेऽपि मंदेग्नौ।’
यातील पहिला तक्रारींचा प्रकार सुसाध्य, दुसरा मात्र कष्टसाध्य असतो. या प्रकारची लहान मुले, मुली वा मोठी माणसे पाहिली, समोर आली की चिकित्सक मनाला चालना मिळते. अशा शेकडो रुग्णांनी आम्हाला, विचाराला व कृतीला खाद्य पुरवून ऋणात ठेवले आहे.
अग्निमांद्य म्हणजे भूक नसणे हा सामान्य माणसाचा दृष्टिकोन झाला. तो ढोबळ विचार झाला. शरीराने घेतलेल्या आहाराचे, रस, रक्त, मांस इत्यादी धातूंमध्ये रूपांतर जेव्हा होत नाही, तेव्हा अग्निमांद्य विकार म्हणता येईल. जराशी भूक मंद झाली म्हणजे अग्निमांद्य म्हणू नये. अग्नी हा पित्त या व्यापक शक्तीचा एक भाग आहे. मूळ शक्ती पित्त. शरीरात असलेल्या त्याच्या स्थानामुळे जठराग्नी हा शब्द आलेला आहे. त्याचे मूळ काम पचन आहे. तो सतत जागता, पेटता संधुक्षित राहिला पाहिजे. ज्याप्रमाणे शेगडी पेटवायला पुरेसे इंधन, काडय़ापेटी व फुंकणी किंवा वारा घालण्याकरिता झडपणे लागते तसेच अग्निमांद्य विकाराचे आहे. अग्निमांद्य विकारात क्षुद्बोध याकरिता चिकित्सक व संबंधित रुग्ण या दोघांचेही लक्ष हवे. भुकेची जाणीव होणे, ही या विकारावर मात करण्याची पहिली पायरी आहे. अग्निमांद्य हा विकार अनेक वेळा स्वतंत्र रोग म्हणून त्याच्याकडे बघायला लागते. त्याचबरोबर आमांश, जंत, कृमी, अजीर्ण, अपचन या संबंधित व्याधींचा/ लक्षणांचा मागोवा घ्यावयास लागतो.  
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ३ जानेवारी
१८५३  कवी, चरित्रकार टीकाकार, भाषांतरकार आणि संपादक असा लौकिक मिळवणारे कृष्णाजी नारायण आठल्ये यांचा जन्म. कऱ्हाडजवळील टेंभू गावी जन्मलेले ‘कृ. ना.’ वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत घरातच शिकले, पण अल्पावधीत शाळांच्या परीक्षा देऊन, पुण्याच्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजात दाखल होण्याची पात्रता त्यांनी मिळवली. शिक्षकाची नोकरी सोडून ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकण्यासाठी गेले, कलेतील त्यांचे कौशल्य पाहून बडोदे संस्थानचे दिवाण टी. माधवराव यांनी त्यांना आपल्याकडे बाळगले, परंतु लवकरच कृ.ना. लिहू लागले.. विवेकानंदाच्या कर्मयोग, राजयोग आदी पुस्तकांचे भाषांतर, टिळक माहात्म्य व अन्य चरित्रे तसेच ‘गीतापद्य- मुक्ताहार’ हे आध्यात्मिक काव्य, अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
१९३१ आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासकार असा सार्थ नावलौकिक मिळवणारे विचारवंत डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’सह ३५ पुस्तके त्यांनी लिहिली.
संजय वझरेकर

First Published on January 3, 2013 4:09 am

Web Title: land quality