पाश्चिमात्य जगातील ख्रिश्चन राजसत्तांचे प्रतीक बनलेला लोम्बार्डीचा लोहमुकुट एक पवित्र धार्मिक अवशेष मानला जातो. येशू ख्रिस्ताला जेरुसलेममध्ये क्रुसावर चढवून त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी खिळे ठोकले गेले. त्यापकी काही खिळ्यांचे रूपांतर लोहाराकडून लोखंडी पत्र्यात करून घेतले गेले. या पत्र्याच्या गोल टोपीवर सोने-चांदी यांच्या पत्र्याने मढवून त्यावर हिरे, माणके बसविली आहेत. गेली अनेक शतके हा मुकुट मिलानच्या मोन्झा चर्चमध्ये सुरक्षितपणे ठेवलेला आहे. रोमनसम्राट कॉन्स्टन्टाइन प्रथम हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला पहिला सम्राट. येशू ख्रिस्ताला ज्या क्रुसावर बळी दिले गेले. त्याचे अवशेषसम्राटाची आई हेलेना हिने मोठय़ा प्रयत्नपूर्वक शोधून काढले. त्यातील काही खिळे तिने कॉन्सन्टाइन प्रथमला दिले. समुद्री वादळ शांत व्हावे म्हणून एक खिळा तिने सागराला अर्पण केला. कॉन्स्टन्टाइनने त्यातील काही खिळे लोम्बार्ड राज्याची राणी थिओडेिलडाला भेट दिले. वर म्हटल्याप्रमाणे या राणीने खिळ्यांमधून एक सेंटिमीटर रुंदीची मोठी िरग घडवून घेतली. या लोखंडी पत्र्यावर सोन्या-चांदीचे पत्रे आणि हिरे, माणक्यांची सजावट करून ते आपल्या मुकुटात बसविले. हा लोहमुकुट पुढे लोम्बार्डच्या मोन्झा चर्चमध्ये ६२८ साली ठेवण्यात आला. तेव्हापासून तो मोन्झात कडक सुरक्षेत आहे. दहाव्या शतकापासून रोमन आणि जर्मन राजे राज्यारोहणासाठी रोमला जात. जाताना वाटेत मिलानमध्ये थांबून हा लोहमुकुट डोक्यावर थोडा वेळ ठेवण्याची प्रथा होती. ही प्रथा प्रथम कोनराड द्वितीय याने १०२६ साली स्वत: तो मुकुट डोक्यावर ठेवून सुरू केली. १८३८ साली ऑस्ट्रियनसम्राट फडिनांड प्रथमने हा मुकुट डोक्यावर ठेवून राज्यारोहण केले ते शेवटचे. ऑस्ट्रिया आणि इटलीत झालेल्या युद्धानंतर १८५९ साली हा लोहमुकुट मिलानमधून व्हिएन्नात नेला गेला. पुढे १८६६ साली हा मुकुट परत मिलानच्या मोन्झा कॅथ्रेडलमध्ये आणण्यात आला. सध्या तो मिलानमध्येच आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

चहा

जवळपास सगळ्यांच्याच घरात सकाळची सुरुवात होते ती चहाच्या सुगंधाने. तरतरी आणणारे पेय म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले पेय म्हणजे चहा. चहाच्या पानांपासून हे उत्तेजक पेय तयार केले जाते. ‘कॅमेलिया सायनेन्सिस’ हे चहाचे शास्त्रीय नाव. ही वनस्पती झुडूप या वर्गात मोडते. चहाचा मूळ उगम हा चीनमधला आणि भारतातल्या आसाममधला. भारतात दक्षिण आणि उत्तर भारतात, डोंगराळ प्रदेशात चहाची लागवड केली जाते. दरवर्षी छाटणी करून चहाचे झाड जास्त उंच वाढू देत नाहीत, अन्यथा चहाचे झाड १० ते १७ मीटर उंच वाढते. झुडपाला पुष्कळ फांद्या असतात. पाने साधी, एकाआड एक असतात.  कोवळी पाने लवदार असतात तर पक्वपाने जाड, चकचकीत असतात. फुले पांढरी व सुवासिक असतात. नवीन पालवी जोमाने फुटावी म्हणून चहाच्या झुडपांची वेळोवेळी छाटणी करतात. चहाची झुडपे सुमारे तीन वर्षांची झाल्यावर पाने खुडायला सुरुवात होते. झुडपाची सगळी पाने एकाच वेळी न खुडता टप्प्याटप्प्याने खुडणी केल्याने झाडाचा जोम कायम राहतो. चहाची झाडे सावलीत चांगल्या प्रकारे वाढतात. सावलीसाठी शिरीष, बाभूळ, पांगारा अशी झाडे साधारणपणे ६ ते १५ मीटर अंतरावर लावली जातात. पाण्याचा निचरा चांगला होत असलेल्या आम्लधर्मी (सामू साधारण ५.५) जमिनीत चहाची लागवड चांगली होते. चहाच्या पानांमध्ये टॅनिन हे रसायन असते. पानांतील टॅनिनच्या प्रमाणावर चहाची प्रत अवलंबून असते. बहुतेकदा दार्जििलगसारख्या उंचावर असणाऱ्या प्रदेशात चहाचे मळे आढळतात. फार उंचीवर वाढणाऱ्या चहाच्या झाडांचे उत्पन्न कमी असते, परंतु त्यापासून तयार होणारा चहा जास्त चांगल्या दर्जाचा असतो. भारतात आढळणाऱ्या चहाच्या चिनी व आसामी प्रकारात संकर घडून आल्यामुळे संकरित बिया उपलब्ध झाल्या. चहाच्या मळ्यातील झाडांची निरनिराळ्या गुणधर्मासाठी परीक्षा करून, चांगल्या प्रकारच्या बिया मिळवून त्यांची कलमे केली जातात. या कलमांपासून चांगल्या प्रतीचे बियाणे मिळवले जाते. भारतात चहाची लागवड ‘ईस्ट इंडिया कंपनीने’ सुरू केली. चहाचा उद्योग हा भारताला अधिक परकीय चलन मिळवून देणाऱ्या उद्योगांपकी एक उद्योग आहे.

अनघा वक्टे (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org