डॉ. मास्रेलिन अल्मेडा यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी या ठिकाणी १८ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण ‘करसूलकर हायस्कूल सावंतवाडी’ येथे झाले. निसर्गरम्य वातावरणाचे सतत सान्निध्य असल्यामुळे त्यांना वनस्पती विषयाची गोडी निर्माण झाली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई येथे झाले. त्यांनी ‘टेरिडोफाइटिक प्लोरा ऑफ महाराष्ट्र’ या विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर काही र्वष ते सेंट झेविअर्स कॉलेजच्या ब्लटर हब्रेरियममध्ये काम करू लागले. याच ठिकाणी त्यांच्या पुढील मोठय़ा कार्याचा पाया भक्कम झाला. त्यानंतर त्यांनी ‘सिबा रिसर्च सेंटर’मध्ये बॉटनिस्ट म्हणून काम केले.

त्यांच्या फ्लोरिस्टिक कामाची सुरुवात प्रो. पी. व्ही. बोले यांच्यासोबत ‘फ्लोरा ऑफ महाबळेश्वर’ या कामाने झाली सेंट झेविअर्समध्ये असताना त्यांना फादर सांतापाऊंसारख्या थोर व्यक्तीचे मार्गदर्शन व सान्निध्य लाभले. कोणत्याही कार्याला वाहून घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे फिल्ड बॉटनिस्ट आणि वनस्पतींची ओळख या क्षेत्रात मोठे नाव झाले.

‘फ्लोरा ऑफ महाराष्ट्र’ या त्यांच्या पुस्तकात  महाराष्ट्रातील सपुष्प वनस्पतींची यादी आणि त्यांचे वर्णन तीन खंडांत प्रकाशित झाले. या पुस्तकावर त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. पुढे त्यांच्या या पुस्तकाचे पुढील तीन खंड प्रसिद्ध झाले.

२००२ ते २००५ या काळात पार पडलेल्या हर्बल वर्ड या गोरेगाव येथील संस्थेने भरवलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे ते प्रमुख सल्लागार होते. त्यांनी वर्तमानपत्र आणि मासिकांसाठी लेख लिहिले.

ट्रीज ऑफ मुंबई ( २००८), एम. एम. आर. डी. साठी डिक्शनरी ऑफ जनेरिक नेम्स् ऑफ फ्लॉविरग प्लॅन्ट अ‍ॅड फर्नस ऑफ महाराष्ट्र (२००५), कोकणी नेम्स ऑफ प्लॅट्स, डिक्शनरी ऑफ स्पेसिफिक इपिथेल विथ देअर लोकल नेम्स अ‍ॅड संस्कृत नेम्स्, बायोडायव्हर्सटिी ऑफ जिजामाता उद्यान मुंबई, ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अ‍ॅड्व्हान्स प्लॅन्ट टेक्सॉनॉमी या विषयावर अनेक कार्यशाळा त्यांनी भरवल्या व त्यात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या फ्लोरा आणि जैवविविधता या विषयाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून रिपोर्ट तयार केले आहेत.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

 

जेरुसलेमचा तोंडवळा

ज्युडाईझम, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्माच्या लोकांनी जेरुसलेम शहर हे आपले पवित्र शहर आणि तीर्थस्थान मानले आहे. तीन धर्मानी आपले पवित्र स्थान मानलेले जेरुसलेम हे बहुधा जगातील एकटेच शहर असावे. त्यामुळे जेरुसलेमचा तोंडवळा एका धार्मिक तीर्थस्थानाचाच असून तिथे नेहमीच काहीतरी धार्मिक उत्सव चालू असतात. जेरुसलेमला ज्यूंच्या हिब्रू भाषेत ‘येरुशालाहिम’ म्हणजे शांतीची नगरी म्हणतात. त्याला ‘शालोम’ असेही म्हटले जाते. प्रत्येक ज्यू नेहमीच जेरुसलेमला शांती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. तीन धर्माच्या भाविकांच्या प्रार्थनांचे मंत्र जेरुसलेम शहर गेली अनेक शतके ऐकत आले आहे. दर शुक्रवारी हजारो मुसलमान इथे नमाज पढतात, दर शनिवारी ज्यू लोक देवाची स्तोत्रे म्हणतात. दर रविवारी ख्रिस्ती लोक शब्बाथ पाळून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करतात. येशू ख्रिस्ताला शुक्रवारी क्रॉसवर देहान्त शासन दिले गेले. अवजड लाकडी क्रॉस घेऊन येशू ज्या मार्गाने १४ ठिकाणी थांबत वधस्तंभाकडे गेला त्या मार्गाला व्हिया डेलोरोजा म्हणतात. या मार्गावरून दर शुक्रवारी ख्रिस्ती धर्मगुरू आणि धर्मोपदेशकांची मिरवणूक निघते. सुवर्णवर्खाने रंगवलेल्या भव्य गोल घुमटाची मशिद डोम ऑफ द रॉक आणि जवळच्या अल-अक्सा मशिदीचे मुस्लिमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोम ऑफ द रॉकच्या गाभाऱ्यात असलेला दोन अडीच फूट लांबीचा काळा खडक काबा या नावाने ओळखला जातो. या दगडावर एका बाजूला महंमद पगंबराच्या पावलांचे ठसे तर दुसऱ्या बाजूला जिब्राल या देवदूताच्या हाताचे ठसे उमटलेले दाखवितात. मुस्लिमांच्या श्रद्धेप्रमाणे महंमदाने या खडकावरून स्वर्गारोहण केले त्यावेळी देवदूताने हा खडक दाबून धरला! गाभाऱ्याच्या खाली असलेल्या गुहेत मृत व्यक्तींचे आत्मे, प्रार्थनेसाठी जमतात अशीही त्यांची श्रद्धा आहे! डोम ऑफ द रॉक हे प्रार्थनास्थळ नसून शेजारच्या अल-अक्सा मशिदीत नमाज पढला जातो. १९३८ साली इटालीचा फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनी याने पाठविलेल्या ‘कर्रारा’ या उच्च दर्जाच्या संगमरवराने अल-अक्साचा जीर्णोद्धार करण्यात आला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com