यंत्राच्या फिरणाऱ्या दोन भागात घर्षण होते आणि त्यांच्या गतीत अडथळा येतो. घासणाऱ्या पृष्ठभागावर ओरखडे पडतात आणि त्याची झीजही होते. हे टाळण्यासाठी त्या दोन भागांच्यामध्ये बुळबुळीत वंगणतेल वापरावे लागते. जितका वंगणाचा बुळबुळीतपणा जास्त, तितके वंगणतेल जास्त चांगले समजले जाते. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर, ज्या वंगणतेलाच्या घर्षणाचा सहगुणकजितका कमी तितके ते वंगणतेल जास्त कार्यक्षम होय.

अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिटय़ूट (ए.पी.आय.) ही संस्था विकसित देशातील आधुनिक गाडय़ांसाठी आवश्यक असणाऱ्या  वैशिष्टय़पूर्ण वंगणतेलांची वर्गवारी करत असते. त्यामुळे, दरवर्षी नवनवीन मोटरतेले बाजारात येत असतात. अर्थात, ती आपल्याकडे पोहचायला अर्धदशकापेक्षा जास्त काळ जातो, ती गोष्ट वेगळी !

कुठल्याही घनपदार्थाच्या स्थिर व चलत घर्षणाचा सहगुणक (coefficientoffriction) हा कमीत कमी ०.०३ मानला जात होता. १९६५ साली, न्यू जर्सीतील ‘जनरल मॅग्नाप्लेट’ या कंपनीने खास ‘नासा’साठी तयार केलेल्या ‘हायए-लुब-टी’  या वेगळ्या प्रकारच्या वंगणतेलात घर्षणाचा सहगुणकाचा हा निचांक आढळला होता. त्यानंतर ‘फ्लुरॉनिक्स’ या कंपनीने तयार केलेल्या ‘टफ ऑइल’ या सर्वोच्च बुळबुळीत वंगणतेलाची गिनीज बूकमध्ये नोंद झालेली होती, जगातला सर्वात निसरडा पदार्थ बनण्याचा मान त्याने मिळवला होता.

टेफ्लोन या बुळबुळीत पदार्थाचा घर्षण सहगुणक ०.०४ इतका आहे, तर टफ ऑइलचा सहगुणक ०.०२९ इतका कमी आहे. त्यावरून त्याच्या सरसतेची कल्पना यावी.  या वंगण पदार्थाचा शोध १९९० साली फ्रँक रिक या संशोधकाने लावला. ते नंतर फ्लुरॉनिक्स कंपनीचे अध्यक्ष बनले. यू जर्सी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून १९९० सालचा ‘श्रेष्ठ संशोधक’ हा बहुमान आणि आय.एन.सी. या उद्योजक  मासिकाचा त्यावर्षीचा  ‘श्रेष्ठ  उद्योजक’ हा सन्मानत्यांना मिळाला. या शोधामुळे फ्रँक रिक हे ‘इन्व्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’ या जगप्रसिध्द संशोधकांच्या पंक्तीत  जाऊन  बसले.

मोटर गाडय़ांसाठी वापरायच्या पेट्रोलियम किंवा सिन्थेटिक (कृत्रिम) वंगणतेलात टफ-ऑइल हे वंगणतेल मिसळून वापरता येते. अशा प्रकारच्या तेलामुळे कमी इंधन जळून गाडय़ांना जास्त मायलेज मिळू शकते.  इंजिनाच्या  डागडुजीचा खर्च कमी होतो, बॅटरीचे आयुष्य वाढते, इंजिन थंड राहते.या सर्वामुळे इंजिनाचे आयुर्मान वाढते.

जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत

निर्मल वर्मा यांचे कथासाहित्य

निर्मल वर्मा यांचा ‘परिन्दे’ हा पहिला कथासंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. या संग्रहातील ‘परिन्दे’ ही कथा हिल स्टेशनवरच्या बर्फाळ प्रदेशातील -एका शाळेतील वसतिगृहाच्या मेट्रन- शाळेतील शिक्षिका लतिका हिच्या मानसिक आंदोलनांची एक अलवार कथा आहे.

होस्टेलमधील विद्यार्थिनींवर लक्ष ठेवणं हे तिचं काम असतं. असंच एकदा लतिकाच्या लक्षात येतं की, ज्युली मधूनच शाळेतून गायब होते आणि एका मिलिटरी ऑफिसरला भेटायला जाते. त्याची पत्रंही तिला येतात. तिला जाब विचारायला लतिका मॅडम निघतात, पण त्यांच्या लक्षात येतं, की एकेकाळी आपणही इथे गिरीश नेगी या मिलिटरी ऑफिसरच्या प्रेमात होतो. तो आता नाही, पण नेगीची आठवण आपल्याला येते. ती विसरू पाहते तेव्हा एखादी वस्तू आपल्या हातून कोणी तरी हिसकावून घेतंय, ही भावना लतिका मॅडमला विव्हल करते. मग त्यांच्या मनात आलं, ‘अपना अभाव का बदला, क्या मैं दूसरों से ले रही हूँ?’ मग ज्युलीला जाब विचारण्याऐवजी ती तिच्या रूमवर जाते. ज्युली झोपलेली असते. तिच्याकडे एक क्षणभर बघते आणि तिच्या उशीजवळ तिचा निळा लिफाफा ठेवून मागे फिरते.

एकटेपणाची, एकाकीपणाची खंत व्यक्त करणारी स्वगत शैलीत लिहिलेली अशीच एक भिडणारी कथा आहे- ‘धूप का तुकडा.’ त्यातील हे काही अंश :

‘आता तुम्ही कसं या बागेतील याच बाकावर थोडं बाजूला सरकून मला बसायला जागा दिली, तसं आपल्या मनात थोडा वेळ दुसऱ्या कुणाला जागा देऊ शकलो तर! ..बागेत इतकी बाकडी आहेत, पण तरीही मी इथे बसू का? कारण रोज संध्याकाळपर्यंत मी इथेच बसते. इथे जवळ झाड नसल्याने  उन्हाची एक तिरीप, त्याची ऊब, अंगावर इथेच घेता येते.’

‘काय म्हणता? माझ्या मुलांसाठी मी बागेत येते? नाही. मला मुलं नाहीत. आठ वर्षांच्या माझ्या संसाराच्या आणि नंतर विभक्त होण्याच्या चर्चा नकोत. म्हणूनच मी गाव सोडून इथे अनोळखी शहरात आले.  माझी कोणी दखलही घेतली नाही. असं म्हणतात की, आपलं दु:ख इतरांना सांगितल्याने मन हलकं होतं, पण जी आपली व्यक्ती आपल्या प्रत्येक श्वासाला, सुख-दु:खाच्या क्षणांना जाणते, तीच आपल्यापासून दूर गेल्यावर, मनातील दु:ख इतरांना सांगून हलकं कसं होणार? आता संध्याकाळपर्यंत मी बागेतील याच बाकडय़ावर बसून राहते. काय म्हणता? या मोकळ्या बागेत इतका वेळ बसून थंडी वाजेल, सर्दी होईल. अहो, म्हणून तर मी याच तुम्ही बसलेल्या बाकडय़ावरच, उन्हाची तिरीप, धूप का तुकडा- ऊब अंगावर घेत रोज इथेच बसून राहते.’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com