आंध्र प्रदेशातील ‘उप्पडा’ या पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातील गावात विणलेल्या साडय़ा ‘उप्पडा’ या नावाने परिचित आहेत. उप्पडा साडय़ा रेशमी असतात पण बऱ्याच वेळा सुती ताणा वापरूनही त्या विणल्या जातात. अतिशय तलम सुताचा, ताणा आणि बाणा दोन्हींकरिता वापर करून हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साडय़ा वैशिष्टय़पूर्ण कारागिरीची ओळख पटवून देतात. ही साडी विणताना विणकर मुबलक प्रमाणात जरीचा वापर करतात.
उप्पडा साडीचा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास, जामदनी पद्धत पूर्वापार वापरली जात होती. पण एकोणिसाव्या शतकातील यंत्रयुगाच्या उदयानंतर ती पद्धत काही प्रमाणात मागेच पडली. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुन्हा या पद्धतीचा वापर सुरू झाला. उप्पडा येथील विणकरांना ही पद्धत शिकवायला १९८८ साली सुरुवात झाली. आरंभीच्या काळात येथील विणकरांना हे काम करणे जड गेले, पण काही कालावधीतच त्यांनी ही पद्धत आत्मसात केली. इतकेच नव्हे तर आंध्र प्रदेशची ओळख देणारी डिझाइन विणण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा उप्पडा साडीला बाजारात आपले स्थान निर्माण करायला आणि लोकप्रियता मिळवायला सुमारे दहा वर्षांचा कालावधी गेला.
रेशमी उप्पडा साडय़ांचा ताणा आणि बाणा एकसारख्याच सुतांकाचा असतो. एका हातमागावर ही साडी विणताना दोन विणकर एका वेळी काम करतात. त्याचमुळे नाजूक आणि सुंदर नक्षीकाम असलेली साडी तयार होते. जरीचा वापर करून विणलेल्या साडीची निर्मिती फक्त हाती केली जाते. त्यामुळे एक साडी तयार व्हायला दोन-दोन महिनेसुद्धा लागतात. दिसायला मोहक, वजनाला हलकी पण किमतीला भारी असे उप्पडा साडय़ांचे थोडक्यात वर्णन करता येईल. या रेशमी साडीची किंमत रु. ५०००/- पासून ते रु. २०,०००/- पर्यंत असते.
उत्तर प्रदेशातील बनारसी साडीतील एक प्रकार जामदनी. त्या पद्धतीचे विणकाम आंध्र प्रदेशात येऊन रुजले, स्थिरावले आणि मान्यता पावले हे उप्पडा साडीचे वेगळेपण म्हणावे लागेल.

– दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

जामखंडी आणि तासगाव संस्थान

जामिखडी हे गाव कोल्हापूरपासून ११० कि.मी. अंतरावर तर तासगाव हे सध्या सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण सांगलीपासून २३ कि.मी. अंतरावर. रत्नागिरीजवळचे हरिभट यांच्या मुलांपकी ित्रबक, गोिवद आणि रामचंद्र यांनी मराठय़ांच्या सन्यात विशेष कामगिऱ्या बजावल्यामुळे पेशव्यांनी त्यांना कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांमधील प्रदेश जहागीर म्हणून इनामात दिला. हरिभट यांच्या नातवांपकी परशुराम भाऊ हे विशेष पराक्रमी निघाले. त्यांच्या जहागिरींपकी जामिखडी हा एक टापू होता. त्यांचे पुढचे वंशज गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांनी १८११ साली जामिखडीचे राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांच्याशी संरक्षण करार करून ३००० स्वारांची फौज तनात करावयास लावली. १३६० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या संस्थानाला ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
कोल्हापूरच्या पोलिटिकल एजंटाच्या देखरेखीखाली असलेल्या या संस्थानात जामिखडी, बिद्री आणि कुंदगोळ हे तालुके होते. मराठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत होते. शेतीच्या उत्कर्षांसाठी जामिखडीत जनावरांचे प्रदर्शन भरविले जाई. हातमागांचा संस्थानात प्रसार होऊन वस्त्रोद्योगाचा विस्तार झाला होता. जामिखडीच्या पटवर्धन राज्यकर्त्यांनी आपल्या प्रजेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी दरबार भरविण्याचा परिपाठ ठेवला होता. गोपाळ रामचंद्र यानंतर रामचंद्र गोपाळ, परशुराम रामचंद्र आणि शंकर परशुराम असे जामिखडी संस्थानचे पुढील राज्यकत्रे झाले. परशुराम रामचंद्र यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्कराचे मानद कॅप्टन म्हणून फ्रान्समध्ये महत्त्वाची कामगिरी बजाविली.
१८२० साली जामखंडी संस्थानातून तासगावचे संस्थान निराळे निघाले. गणपतराव पटवर्धन हे याचे पहिले राजे. १८४८ साली लॉर्ड डलहौसीच्या संस्थाने खालसा करण्याच्या मोहिमेत तासगाव संस्थान खालसा होऊन कंपनी सरकारच्या राज्यात सामील केले गेले.
जामिखडी संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com