आपण संगणक वापरतो ते वेगवान आणि अचूक काम होण्यासाठी. पण संगणकाचं काम त्याच्या सॉफ्टवेअर आज्ञावलीवर चालतं, आणि ही आज्ञावली लिहिणारी माणसं कधीना कधी गफलती करू शकतात!

४ जून १९९६. युरोपियन स्पेस एजन्सीची एरियाना ५ रॉकेटवरून चार कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याची जय्यत तयारी होती. पण उड्डाणानंतर केवळ ३९ सेकंदांत सगळी यंत्रणा जळून खाक झाली! याचं कारण होतं आज्ञावलीत.

नियंत्रक व्यवस्थेकडे जाणाऱ्या वेगमापनाच्या संदेशांचं ६४ बीट्स वरून १६ बीट्समध्ये रूपांतर  करताना एका मर्यादेपलीकडचा वेग मोजमापात येतच नव्हता. आपण ७०+९०=१६० ही आकडेमोड करताना फक्त शेवटचे दोन अंक घेतले तर कसं होईल, तसं!  त्यामुळे वेग आहे त्यापेक्षा बराच कमी दिसत होता. याचा परिणाम म्हणजे पूर्ण नियंत्रक व्यवस्था गोंधळून गेली आणि सर्व घटकांना योग्य प्रकारे नियंत्रित करू शकली नाही!

आपल्यापकी काही जणांना 2ङ आठवत असेल. ३१ डिसेंबर १९९९च्या रात्री वर्ष सरून २००० होताना संगणकाच्या मोजमापनात गडबड होऊन तऱ्हेतऱ्हेच्या आपत्त्या कोसळतील अशी रास्त भीती होती त्या वेळी!  मात्र आधीच हा धोका ओळखून योग्य उपाययोजना केल्याने सुदैवाने काहीही हानी झाली नव्हती.

आंतरराष्ट्रीय तारीखरेषा ओलांडताना तारीख एकने मागे किंवा पुढे जाते. जीपीएस यंत्रणेत हा बदल नोंदलेला असतो, त्यामुळे जीपीएस वापरून आपली उपकरणं योग्य प्रकारे सेट करता येतात. पण ती तशी केली नाहीत तर मग भलताच गोंधळ उडू शकतो.

२००७ ची गोष्ट. अमेरिकन हवाई दलाची ६६ दशलक्ष डॉलर्स किमतीची बारा एफ-२२ रॅप्टर लढाऊ विमानं पहिल्यांदाच अमेरिकेहून ओकिनावा या जपानी बेटाच्या दिशेने चालली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय तारीखरेषा ओलांडली. मात्र तारीख बदलल्याने त्यांच्या नियंत्रक यंत्रणेला वेळेच्या मोजमापासाठी काही संदर्भ मिळेना आणि ती पूर्ण यंत्रणाच कोलमडून पडली!

शेवटी त्या तज्ज्ञ वैमानिकांनी अनुभवाचा वापर करून विमानं ओकिनावाला उतरवली. या वेळीही चूक होती ती यंत्रणेतल्या संगणक आज्ञावलीत!

अशी चूक ऐन युद्धाच्या वेळी झाली असती तर? एकविसाव्या शतकात अशा गफलती होणे म्हणजे आश्चर्यच म्हटलं पाहिजे.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. गोकाक- साहित्य

१९३४ मध्ये डॉ. गोकाक यांचा गेयरचना असलेला ‘कलोपासक’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि कन्नड काव्याच्या क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन झाले. त्यांच्या ‘नव्य कवितेगळु’ने  त्यांना नवकवितेचे जनक बनविले. त्यांच्या कवितेमुळे कन्नड साहित्यात नवकाव्याचा प्रवाह सुरू झाला, असे मानतात. मराठी कवितेला मर्ढेकरांनी नवे वळण दिले तसे कन्नड कवितेला गोकाक यांच्यामुळे नवे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे त्यांना कन्नड नवकाव्याचे जनक मानले जाते.

‘पयण’ (१९३७), ‘समुद्रगीतगळु’ (१९४०), ‘त्रिविक्रमर आकाशगंगे, नव्य कवितेगळु, इंदिल्लनोळ, द्यावा पृथिवी इ. त्यांचे महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह असून ‘द्यावा पृथिवी’ (१९५७) या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांची सवरेत्कृष्ट रचना आहे- ‘भारत सिंधु रश्मि’ (१९८२) हे महाकाव्य.

‘कलोपासक’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहात कन्नड कवितेच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी एक वेगळाच प्रयोग केला आहे. बोलीभाषेत काव्यमय कल्पना मांडण्याचा, विचार व भावना यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न यात त्यांनी केला आहे. कन्नड काव्यामध्ये विचारांचा जोरदार पाठपुरावा केला आहे. त्याला स्वच्छंद छंद असेही म्हणतात.

‘त्रिविक्रम आकाशगंगे’ (१९४५) हे त्यांचे एक प्रसिद्ध चंपूकाव्य आहे. गद्य आणि पद्यमिश्रित प्राचीन चंपूकाव्याचा आदर्श या बाबतीत कवीपुढे दिसतो. इंग्रजी आणि भारतीय स्वच्छंदतावाद तसेच आयरिश आणि इंग्रजी आधुनिकतावाद यामध्ये निष्णात असलेल्या गोकाक यांनी कन्नड कवितेला स्वतंत्रतेची नवी भेट दिली. ‘द्यावा पृथिवी’मध्ये त्यांनी इशुची पौराणिक कथेला-ग्रीक मिथकाला भारतीय रूप दिले आहे.

‘जननायक’ (१९३९) हे त्यांचे पहिले नाटय़लेखन, त्याशिवाय आणखी तीन नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘जननायक’चा सूत्रधार राष्ट्रवादी क्रांतिकारक आहे. जमीनदारांच्या अत्याचारांविरुद्ध संघर्ष करताना तो मारला जातो. ‘युगांतर’ हे प्रतीकात्मक नाटक आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीयांच्या मनातील, विचारधारांमधील संघर्षांचे चित्रण या नाटकात आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com