पं. कुमार गंधर्वाच्या दैवी आवाजातले भावपूर्ण शब्द. खरंच आपल्या भेटी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तींशी वेगवेगळ्या माध्यमांतून घडून येतात. योग्य व्यक्तींशी, योग्य समयी व योग्य स्थानी गाठ पडणे हेच तसं बघायला गेले तर खरंच भाग्योदयकारकच नाही का!
सर्वच क्षेत्रांत स्वत:च्या विश्वातल्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तींशी ओळखी होण्याच्या संधी येतात. अशा संधीचं सोनं करण्याच्या शक्यताही असतात. मात्र हे सर्व आपल्या स्वभावावर बरंचसं अवलंबून असतं, असं म्हटल्यास वावगे होणार नाही. आपला ‘विन विन’ सिद्धांतावरचा विश्वास, समाजात मिळून मिसळून वागण्याची क्षमता इत्यादींवर हे बरंचसं अवलंबून असतं. मार्केटिंग करणाऱ्यांना अशा ओळखी करण्याची, वाढवण्याची खूप आवश्यकता असते. कापड तसेच तयार कपडे यांची रिटेल विक्री करणाऱ्यांची अशी क्षमता आपल्या नजरेत लगेच भरते. तो विक्रेता बोलता बोलता आपला विश्वास संपादन करून टाकतो. रिटेल मार्केटिंगसारखंच संस्थात्मक, औद्योगिक मार्केटिंग इत्यादी मार्केटिंगचे विविध विभाग आहेत. वेगवेगळ्या आस्थापनांच्या गरजा जाणून घेऊन त्यांची पूर्तता करणे यात मोडतं. या सर्वाचं मार्केटिंग मग ते वस्त्राच्या रूपात असो अथवा रेडीमेड स्वरूपात असो, बी टू बी स्वरूपात मोडतं. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी म्हणजेच त्यात कार्यरत व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक होतं. अर्थात मार्केटिंग कधी नव्हतं एवढं आव्हानात्मक होतंय हे सत्य स्वीकारायला हवं.
निश्चित उत्पादन व विपणन धोरण आखून त्याची अंमलबजावणी करणे व जोडीला क्षमता, कमकुवतपणा, धोका आणि संधी यांचे विश्लेषण नव्या आव्हानांना सामोरे जाताना सर्वत्र अगदी सातत्याने करावे लागणार. संपूर्ण आस्थापनात समन्वय व सुसूत्रता राखणे गरजेचे असते. याबरोबरच सर्वच स्तरांत ‘नीरक्षीरविवेक’ (पानी का पानी. दूध का दूध करण्याचा गुण) खूप आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठतेची जोपासना करत, पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये व्यावसायिकता रुजवत, प्रगतिशील मानसिकता घडवण्यावर लक्ष द्यावे लागेल. या संकल्पांची परिणती ग्राहकांची मनपसंत ब्रँड म्हणून नावारूपाला येणार हे नि:संशय. मग ही ग्राहक देवता उपभोक्त्यांच्या रूपात असो अथवा बी टू बी मार्केटिंगमधील ग्राहकरूपात असो.. साकारणारे परिचय स्मरण करून देतील या अविस्मरणीय गीतातील पंक्तींचा. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.. भेटीत तुष्टता मोठी..
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – चिक्का देवराजाची कारकीर्द
म्हैसूर राज्यकर्त्यांपकी चिक्का देवराजा वोडीयार याच्या कारकीर्दीत राज्याची भरभराट झाली. या कर्तबगार राजाची कारकीर्द इ.स. १६७३ ते १७०४ अशी झाली. चिक्का देवराजाने प्रशासकीय व्यवस्थेसाठी आपल्या राज्याचे १८ विभाग (चावडी) केले. राज्याचा विस्तार त्याने बंगळुरूपर्यंत वाढविला. त्याने ठिकठिकाणाहून बारा हजार कुशल विणकर बंगलोरमध्ये आणून वसवून वस्त्रोद्योगाला उत्तेजन दिले, बंगलोर-म्हैसूर येथे कापड उद्योगासाठी मोठी बाजारपेठ निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या काळात १६७७ साली व नंतर मराठय़ांनी सन १६८२ मध्ये म्हैसूरवर स्वाऱ्या केल्या. चिक्का देवराजाने त्या सर्वाना यशस्वी तोंड देऊन परतविल्या. औरंगजेबाच्या दरबारात त्याने म्हैसूरचे प्रतिनिधी मंडळ ठेवले होते. या प्रतिनिधी मंडळाद्वारे चिक्का देवराजाने मोगलांशी सलोख्याचे संबंध ठेवल्यामुळे म्हैसूर राज्य परकीय आक्रमणापासून भयमुक्त झाले होते. याने गादीवर आल्यावर प्रथम मडगिरी घेऊन तंजावरचा राजा व्यंकोजी भोसलेच्या प्रशासनाखाली येत असलेल्या प्रदेशाला आपली हद्द भिडवली. कारकीर्दीच्या पहिल्या दशकात त्याने शेतकऱ्यांवरचा कर दुप्पट करून सनिकांना करमाफी दिल्याने राज्यात अनेक दंगली आणि बंडं झाली. १६८७ मध्ये चिक्काने व्यंकोजी भोसलेच्या राज्यक्षेत्रात असलेले बंगळुरू तीन लक्ष रुपयांना विकत घेण्याचा करार केला. परंतु तेवढय़ात हा प्रदेश औरंगजेबाने घेतल्यामुळे चिक्काने ती किंमत औरंगजेबास देऊन बंगळुरू म्हैसूरमध्ये सामील केले. चिक्काने दिलेल्या उत्तम प्रशासनामुळे राज्यात संपन्नता येऊन सामान्य माणूस सुखी होता. चिक्का देवराजाला जनतेने ‘नवकोटनारायण’ अशी उपाधी देऊन गौरव केला होता. चिक्काने १७०१ साली आपली राजधानी म्हैसूरहून श्रीरंगपट्टणम येथे हलविली आणि तीन वर्षांनी १७०४ मध्ये या लोकप्रिय राजाचा मृत्यू झाला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com