मर्सरायझिंग करताना स्टेन्टरमध्ये पाण्याचे तापमान ८५ ते ९० अंश सेल्सिअस ठेवले जाते. कापडाची लांबी-रुंदी आकार स्थिर राहण्यासाठी स्टेन्टरमध्ये पाठवण्यापूर्वी कापड अगदी मोकळ्या ढिल्या अवस्थेत असायला नको. कारण त्यानंतर पुन्हा कापड आटण्याची शक्यता निर्माण होते. यामुळेच यंत्राची रचना अशी केलेली असते की कापड पुन्हा आटणार नाही. कापडावर सतत ताण दिलेला असतो. कधीही एकदम जास्त प्रमाणात कापड पुढे पाठवून हा ताण कमी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याचा परिणाम म्हणून मर्सरायिझगही योग्य तऱ्हेने होत नाही, असा अनुभव आहे.
स्थिरीकरणाच्या टप्प्यामधे कॉस्टिक सोडय़ाचे प्रमाण इतके कमी केले जाते की पुढील धुलाईच्या टप्प्यात कापड अजिबात आटू नये. द्रावणातील हे प्रमाण ६० ग्रॅम प्रतिलिटरपेक्षाही कमी ठेवले जाते. कॉस्टिक सोडय़ाचे प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर कापड पुन्हा आटते. स्थिरीकरणाच्या वेळी तापमान ९० ते ९५ अंश सेल्सिअस ठेवतात. पुढील धुण्याच्या प्रक्रियेत कॉस्टिक सोडय़ाचे प्रमाण आणखी कमी केले जाते. त्यासाठी त्यामध्ये साधे पाणी घालतात. साध्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवलेले असते. जेणेकरून द्रावणाची तीव्रता आवश्यक तेवढी झाल्यावर साध्या पाण्याचा पुरवठा बंद होतो. म्हणजेच पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
स्थिरीकरणाच्या द्रावणाची तीव्रता योग्य प्रमाणात झाल्यावर, कापडावर असलेला कॉस्टिक सोडय़ाचा अंश पूर्णपणे धुऊन काढला जातो. त्या वेळी पाण्याचे तापमान ९० ते ९५ अंश सेल्सिअस एवढे ठेवले जाते. तापमान जेवढे जास्त तेवढी धुलाईची प्रक्रिया परिणामकारक होते. त्यानंतर उदासिनीकरणाची क्रिया केली जाते. त्याकरिता अ‍ॅसिटिक आम्लाचा वापर करतात. द्रावणाच्या सामूपेक्षा (पी.एच.) कापडाचा सामू थोडा जास्त असतो. त्यामुळे यंत्र चालू करण्यापूर्वीच आम्लाची मात्रा ठरवून घेऊन त्यानुसारच अ‍ॅसिटिक आम्ल वापरले पाहिजे. जाड/ वजनदार कपडय़ाचे मर्सरायझिंग करताना सामू कमी ठेवून त्यानुसार आम्लाचे प्रमाण कमी करावे लागते. उदासिनीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी सामू ६.५ ते ७.५ इतका ठेवतात. त्यानंतर कापडाची पुन्हा धुलाई केली जाते. त्या वेळी वापरलेल्या आम्लाचा अंशही निघून जातो.
– सतीश दिंडे (इचलकरंजी) , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – धर्मसहिष्णु बाबासाहेब पंतसचिव
रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब पंतसचिव यांची भोर संस्थानाचे शासक म्हणून कारकीर्द इ.स. १९२२ ते १९४८ अशी झाली. कायदे शिक्षण पूर्ण केलेल्या बाबासाहेबांनी गादीवर येण्यापूर्वीच कारभाराचा अनुभव घेऊन आपले पुढील धोरण नक्की केले. १९२२ मध्ये राज्यारोहणाच्या काळात प्रजेत पसरलेला असंतोष नष्ट करण्याकरिता त्यांनी अनेक वस्तूंवरील कर माफ करून घरपट्टी, लग्नटक्का, म्हैसपट्टी, पाटदाम यामध्ये मोठी कपात केली. बाबासाहेबांनी प्रातिनिधिक तत्त्वावर राज्यकारभार करण्याचे धोरण जाहीर करून भोर शहरात म्युनिसिपालिटी स्थापन केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभाबंदीचा कायदा रद्द करून प्रजेला आपली गाऱ्हाणी सांगण्याचा मार्ग मोकळा केला. कर्मचाऱ्यांना पगारवाढ, पेन्शन, भत्ते याविषयी नियम पक्के केले.
बाबासाहेब वरून दिखाव्याकरिता ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ राहून स्वातंत्र्य चळवळीलाही गुप्तपणे हातभार लावीत होते. बाबासाहेबांनी सर्वधर्म सहिष्णुता दाखवून आपल्या प्रशासनात मुस्लीम समाजाला महत्त्वाची पदे देऊन मुस्लिमांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. शिवापुरास पीराच्या जत्रेस २७ बिघे जमीन तोडून दिली. भोर संस्थानात ख्रिश्चन आणि ज्यू धर्मीय लोकांची संख्या चार हजार होती. नसरापूर आणि खेड शिवापुरात चर्च होते. नाताळच्या दिवशी संस्थानात शासकीय सुट्टी होती आणि स्वत: बाबासाहेब नाताळच्या उत्सवात सामील होत!
भोरच्या पुरातन राममंदिरात चत्र शुद्ध अष्टमीस रामजन्मोत्सव साजरा होई. हा उत्सव म्हणजे भोर संस्थानाचे वैभव समजले जाई. या उत्सवात सरकारतर्फे बुंदीच्या लाडवांचे गावजेवण असे. या वेळी अधिक बुंदी लाडू खाण्याच्या स्पर्धा घेतल्या जात! त्याचप्रमाणे श्रीमंत पंत सचिवांच्या उपस्थितीत संक्रांतीचा सोहळा साजरा होई. ‘दरबारातील तिळगुळाची कचेरी’ असे त्याला नाव होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com