वराहपालन खुले, अर्ध बंदिस्त आणि बंदिस्त अशा तीन पद्धतीने करतात.
खुल्या पद्धतीत वराहांच्या निवाऱ्याची सोय नसते. त्यांना मोकळे सोडतात. ते मिळेल ते अन्न खातात. खाद्य, निवारा आदी खर्च नसल्याने ही वराहपालनाची स्वस्त पद्धत आहे. भारतात देशी वराह या पद्धतीने पाळतात. खुल्या पद्धतीने विदेशी व संकरित वराह पाळता येत नाहीत.
अर्ध बंदिस्त पद्धतीत कुंपणामध्ये वराहांसाठी शेडची व घराची सोय असते. वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळी कुंपणे किंवा वेगळ्या खोल्या बांधून प्रत्येक खोलीसाठी वेगळे कुंपण करतात. मुबलक जमीन व मजुरांची कमतरता असलेल्या प्रगत राष्ट्रांत ही पद्धत वापरतात. यामध्ये मका, सोयाबीन किंवा इतर पिके असलेल्या शेतावर वराहांची गुजराण होते. पाण्याची सोय कुंपणाच्या आतच असते. नर, मादी, पिल्ले यांच्यासाठी शेतातच निवाऱ्याची सोय असते. वराह शेतातच विष्ठा टाकत असल्यामुळे जमिनीचा कस वाढतो. या पद्धतीत मजुरांची गरज भासत नाही. शरीर घासण्याच्या वराहांच्या सवयीमुळे शेड व कुंपणाची हानी होते. एकत्र ठेवल्यामुळे वराहांमध्ये मारामाऱ्या होतात. रोगराईचा फैलाव लवकर होतो. या पद्धतीत मृत्युदर जास्त आढळतो.
बंदिस्त पद्धतीत शेतावर अनेक पक्की घरे बांधून वराहांना कमीत कमी जागेत ठेवतात. घरांमध्ये शुद्ध हवा व पुरेसा प्रकाश येईल याची काळजी घेतात. नर, माद्या, गर्भार माद्या, पिल्ले यांच्यासाठी स्वतंत्र घरे असतात.
या पद्धतीत खाद्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागते. खाद्यामध्ये एखादा घटक कमी-जास्त झाल्यास संपूर्ण समूहावर त्याचा परिणाम होतो. पिल्ले, नर, माद्या, गर्भार माद्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संतुलित खाद्याची सोय करतात.
बंदिस्त पद्धतीत वराहांना मातीतून लोह न मिळाल्याने त्यांच्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. खाद्यातून लोहाचे प्रमाण वाढवल्याने व नवजात पिल्लांना लोहाचे इंजेक्शन दिल्याने अ‍ॅनिमिया टाळता येतो.
बंदिस्त पद्धतीत वराहांना कोंडून ठेवल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. वराह आजारांना बळी पडतात. वराहांचे लसीकरण, औषधोपचार यांवर अधिक खर्च होतो.
– डॉ. शरद आव्हाड (अहमदनगर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – कायदा/स्मृती
कालच्या लेखातल्या चार्वाकनेही कायद्याचे महत्त्व सांगताना मनुस्मृतीवर हल्ला चढविला होता. याचे कारण त्या स्मृती किंवा ते कायदे खोटय़ा तत्त्वज्ञानावर आधारित होते, असे त्याने सांगितले. तत्त्वज्ञान म्हणजे श्रुती त्यात विश्व कसे झाले वगैरे याचा ऊहापोह असतो. विश्व झाल्यावर त्यात व्यवहार कसा असावा, याबद्दल स्मृती लिहिल्या जातात. गीता ही स्मृती कारण त्यात वैदिक तत्त्वज्ञान किंवा श्रुती याच्या आधारे अर्जुनाला समज देण्यात आली.
मनुस्मृतीवर प्रखर हल्ला चढविणारे आपल्या काळातले स्मृतिकार म्हणजे आंबेडकर. गांधींच्या समाज आणि राजकारणाबद्दल त्यांचे तीव्र आक्षेप होते; पण तरीही गांधींनी त्यांनाच घटनाकार केले. आपल्या नव्या स्मृतीत आंबेडकरच उपेक्षितांना न्याय देऊ शकतील, हे गांधींनी ओळखले होते. आंबेडकर हा माणूस भव्यदिव्यच. त्यांनी घटनेत उपेक्षितांना मर्यादित काळासाठी राजकीय आरक्षण द्यावे, अशी तरतूद केली. ती पहिल्यांदा घटनेतच राहिली. मग रुजू झाल्यावर अंमलबजावणीत रेंगाळली. ती अमलात येईपर्यंत वर्षे गेली म्हणून तो मर्यादित काळ वाढतच गेला. मग मागासवर्गीयांच्या व्याख्या बदलत गेल्या. त्याचा आवाका एवढा वाढला की, आरक्षण कोठले, बिनआरक्षित किती उरले, हे समजेना. आंबेडकरांना हे सगळे त्या काळात दिसले असणार म्हणून कालमर्यादा ठेवली होती. कोठलीही स्मृती शेवटी सत्तेची हस्तकच बनते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकानुनयातून झालेला हा विपर्यास. आता तर सत्ताधारी मराठा समाजाने आरक्षणाचा हट्ट धरला आहे. तेव्हा आरक्षण १०० टक्के होणार. अर्थात त्याला एकच एक अगदी सूक्ष्म कणभरच अपवाद आहे. कारण नियम सिद्ध व्हायला अपवाद लागतो. तो अपवाद म्हणजे ब्राह्मण मुलगा किंवा पुरुष. त्यांच्यातल्या मुलींना शिक्षणात सवलती आहेत, पण मुलांना नाहीत. पण मुलांसाठीही आता गाजर दाखविण्यात येत आहे. ते गाजर आहे गरिबीचे. महाराष्ट्रातले तरी निदान बहुतेक ब्राह्मण अमेरिकेला गेले असल्यामुळे जे उरले ते जर गरीब असतील तर त्या मुलग्यांचीही आता सोय झाली. जे उरतील ते ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतील. याचे कारण असे की, या भानगडीत भारतातील मूळ रहिवासी कोण, यावर आता जोरदार जुंपली आहे. याचा निर्णय झाल्यावर भारतात किती माणसे उरतील, कोण जाणे. ऋषीचे कूळ की मूळ शोधू नये, त्यातलाच हा प्रकार आहे. सवत्यासुभ्याची ही प्रक्रिया सगळ्याच देशांत सर्वत्र घडत आली आहे.
ज्ञानेश्वरीत तिसरीच ओवी स्मृतींवर आहे. त्यात ते स्मृतींना समाजाचे पीळदार अवयव म्हणतात आणि त्याच्या सौंदर्याचा अर्थ किंवा उद्देश बघा, एवढेच विधान करतात. अर्थाचा अनर्थ करायचा ठरल्यावर ज्ञानेश्वर आणि आंबेडकर तरी काय करणार?
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – रसायन प्रयोग : भाग- २
ज्यांना आपल्याला कोणत्याच रोगाची बाधा होऊ नये, असे वाटते, त्यांनी विविध रोगांची कारणपरंपरा थोडक्यात समजून घ्यावी. मानवी शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे सात धातू मल, मूत्र, स्वेद असे तीन मळ यांची शरीराच्या विविध अवयवात स्रोतसे म्हणजे काम करण्याकरिता ठिकाणे आहेत. वात, पित्त, कफ या तीन प्रमुख दोषांचीही शरीरात ढोबळमानाने कंबर, पोट, फुफ्फुसात प्रमुख निवासस्थाने आहेत. कोणताही रोग होण्याकरिता या तेरा घटकांच्या प्रमुख ठिकाणांच्या शरीरामध्ये किंवा कार्यामध्ये वैगुण्य यावयाला लागते. त्यांना अनुक्रमे स्थानवैगुण्य व कार्यवैगुण्य म्हणतात. थानवैगुण्य बदलणे कुणाहाती फार नसते. शरीरातील काही अवयव दुरुस्त करता येतात. आधुनिक नवनवीन शोधांमुळे शरीरातील काही अवयव उदा. दात, डोळे, खांदा, खुबा बदलता येतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे लक्ष कार्यवैगुण्यावर केंद्रित करावयास हवे. यासाठी बलवर्धन बृंहण, ओजोवर्धक, व्याधिक्षमोत्पादक, ऊर्जस्कर, धातुवर्धन, चिकित्सा करावी लागते. रसादि धातूंचे मूळ स्वरूपात तयार होणे, टिकणे, पुष्टी होणे ही त्रिविध कामे रसायनचिकित्सेने होतात.
रसायनाने आयुष्य वाढते, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, आरोग्य, त्वचेवरील कांती, प्रसन्नता, शरीरवर्णाची तेजस्विता, स्वरांचे माधुर्य, शरीर व इंद्रिये यांचे बलवर्धन, प्रभावी वाणी, ओजस्विता, वृषता इत्यादी आरोग्यसंपन्नतेची लक्षणे प्राप्त होतात. रसायनोपचाराने तारुण्य दीर्घकाळ टिकते,  श्रमशक्ती, व्याधिप्रतिकारक्षमता यांचा लाभ होतो आणि वार्धक्य लवकर येत नाही. रसायनकार्य म्हणजे नुसते वजन वाढविणे नसून शरीरातील विविध धातूंचे, मलांचे सम्यग् पोषण होण्याकरिता, त्यांचे त्यांचे स्वतंत्र अग्निबल वाढवावे लागते. ही द्रव्ये केवळ मधुर, स्निग्ध, गुरू अशा गुणांची नसतात. याउलट ही द्रव्ये बव्हंशी कडू, तिखट रसात्मक, स्रोतोविशोधन व उष्ण वीर्याची असतात. त्यामुळे त्या त्या स्रोतसातील धात्वग्नि चांगले होऊन, निरोगी, निरामय, दीर्घकालीन आरोग्याचा लाभ होतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ११ ऑक्टोबर
१८८९ > बालगीते, शिशुकथा, रामायण-महाभारतातील गोष्टी आदींना सोप्या भाषेत पुस्तकरूप देणारे बालसाहित्यिक नारायण गंगाधर लिमये यांचा जन्म.
१९०७ > ‘वाईकर भटजी’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक, पत्रकार, कादंबरीकार रामचंद्र विनायक टिकेकर यांचे निधन. ‘पिराजी पाटील’ ही त्यांची कादंबरीही लोकप्रिय ठरली होती.
१९५७ > पेशाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेले कादंबरीकार अरुण गद्रे यांचा जन्म. वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे वास्तव मांडणारी ‘घातचक्र’, आदिमानवाच्या काळात घडणारी ‘एक होता फेंगाडय़ा’, दहशतवादी मानसिकतेचा वेध घेणारी ‘विषाणू’ या कादंबऱ्यांखेरीज, ग्रामीण वैद्यकसेवेच्या अनुभवावर आधारित  ‘किनवटचे दिवस’ आणि लैंगिक शिक्षणासंदर्भात ‘हितगुज तरुण-तरुणींशी’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
१९६८ > साधी राहणी, ध्येयनिर्धार आणि समाजप्रेम यांच्या शिकवणीचे काव्य रचणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ऊर्फ माणिक बंडोजी इंगळे यांचे निधन. संतकाव्यातील करुणेचा धागा जपणारी त्यांची कविता आधुनिक युगाला साजेशी ठरली.
– संजय वझरेकर