‘पेपर खूप कठीण होता.’ ‘काळ तर मोठा कठीण आला.’ ‘कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई?’ कठीण शब्दाचा वापर इथं मानसिक किंवा भावनिक अनुभूती व्यक्त करण्यासाठी केला गेलाय. त्यामुळे त्यांचं वस्तुनिष्ठ मोजमाप करणं अशक्य होऊन बसतं. पण कठीणपणा किंवा त्याच्याउलट असलेला मृदूपणा स्पर्शसंवेदनेशी निगडित आहेत. त्यांचं मोजमाप करण्यासाठी मोह्जचं कोष्टक वापरलं जातं. मोह्जचा इंग्रजी अवतार MOHS हा मेझरमेन्ट ऑफ हार्डनेस स्केल या संज्ञेतील शब्दांच्या आद्याक्षरावर बेतलेला आहे. असा अनेकांचा समज आहे. पण त्यात तथ्य नाही. या मोजपट्टीला हे नाव मिळण्याचं कारण तिचा निर्माता जर्मन वैज्ञानिक फ्रेडरिक मोह्ज. त्याला असं आढळलं की, हिरा हा नैसर्गिक खनिजांमधला सर्वात कठीण पदार्थ आहे. त्याच्यावर साधा ओरखडा काढायचा तरी दुसरा हिराच लागतो. म्हणून तर त्यानं खनिजांच्या काठिण्यपातळीसाठी (शब्द उच्चारतानाच कसा अर्थवाही वाटतो ना?) मोजपट्टी तयार करताना तिच्या एका खुंटाला हिरा बांधून टाकला. त्याला दहा हा क्रमांक दिला. बाकीचे सगळे त्याच्या खाली १ पर्यंत उतरत्या भाजणीत मोजले जातात. त्यातलं सर्वात कमी कठीण खनिज म्हणजे टाल्क, आपल्या ओळखीची पावडर. तिचा क्रमांक १ आहे; तर २ क्रमांकावर आहे जिप्सम. त्यानंतर मग चढत्या भाजणीत कॅल्साइट, फ्लोराइट करीत ७ क्रमांकावर क्वाट्र्झ, ८ वर टोपाझ आणि ९ वर कोरॅन्डम. या कोरॅन्डमचा वापर धातूला पॉलिश करण्यासाठी केला जातो. बाकी सारे पदार्थ कुठं तरी अधेमधे. उदाहरणार्थ, सोनं, चांदी, अ‍ॅल्युमिनियम, झिन्क वगरेंना २.५ ते ३ च्या दरम्यानचं स्थान मिळालं. लोखंडाला ४ तर पोलादाला त्याहून थोडासाच वरचा ४.५ पर्यंतचा पल्ला गाठता आला. त्या मानानं वाळूच्या कणांमध्ये असलेलं सिलिकॉन भलतंच कठीण निघालं. त्यानं चक्क ९ पर्यंतची मजल मारली.

तरीही ही मोजपट्टी पूर्णपणे वस्तुनिष्ठ म्हणता आली नसती. म्हणून मग तिला गुणांच्या शिडीत बसवण्यात आलं. त्यानुसार टाल्कला दिला गेला १ गुण, तर हिऱ्याला तब्बल १६००. पुढं व्हायकर्सनं एक मिलिमीटर वर्ग क्षेत्रफळ असलेल्या पदार्थाचं वजन किती असतं हे मोजून त्याच्या रूपात या मोजपट्टीची अधिक बंदिस्त बांधणी केली. पण मोह्ज स्केलचा मूळ ढाचा तसाच राहिला. त्याला अचूक आकडेवारीचं बळ मिळालं एवढंच.

डॉ. बाळ फोंडके

 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२  office@mavipamumbai.org

 

डॉ. इंदिरा गोस्वामी ( २०००)

सन २०००चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध, लोकप्रिय आसामी लेखिका डॉ. इंदिरा गोस्वामी यांना. भारतीय साहित्यातील १९८० ते १९९९ या कालावधीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. डॉ. इंदिरा गोस्वामी या आसाममधील दुसऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या. याआधी १९७९ मध्ये डॉ. बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आसामी साहित्यिक वर्तुळात त्या ‘मामोनी’ (आईचा दागिना) या खास नावाने ओळखल्या जातात.

१४ नोव्हेंबर १९४२ रोजी आसाममधील गुवाहाटी इथे जन्मलेल्या मामोनी यांनी टी. सी. गर्ल्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. आजोबांच्या इस्टेटीत-पलाशवाडी सप्ता या कामरूप जिल्हय़ातील धार्मिक जाणिवांचा पगडा असलेल्या प्रदेशात इंदिराजींचं बालपण गेलं. त्यांच्या जडणघडणीत गुवाहाटी आणि शिलाँग शहरांपेक्षा येथील वास्तव्याचा खूप प्रभाव आहे.  त्या काळाच्या आणि प्रदेशाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी पुढे ‘दँताल हातीर उँये खोवा हौदा’ ही कादंबरीही लिहिली. लहानपणी त्यांना खालच्या जातीच्या मुलांबरोबर खेळण्यास मनाई होती. नियम न पाळल्यास शुद्धी करण्यासाठी पाण्याच्या बादल्या अंगावर ओतल्या जात. पण इंदिराजींनी हा नियम कधीच पाळला नाही. त्यांचे वडील उमाकांत गोस्वामी अतिशय बुद्धिमान. शिक्षण क्षेत्रात मोठे अधिकारी होते. आई अंबिका या धार्मिक होत्या. एकदा एका ज्योतिषाने त्यांच्या आईला ‘ही मुलगी अपशकुनी आहे. तिचे दोन तुकडे करून तिला नदीत फेकून द्या’ असे सांगितले होते. नंतर तोच ज्योतिषी म्हणू लागला, ‘या मुलीनं ठरवलं तर ही पर्वतही ओलांडून जाऊ शकते..’ १९६२ मध्ये त्यांचे महविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. १९६५मध्ये त्या दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर दोन वर्षांतच १९६७ मध्ये त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आणि इंदिराजींच्या जीवनसंघर्षांला सुरुवात झाली.

१९६८ मध्ये त्या आसाममधील गोलपारा सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. पुढे एम.ए. झाल्या. १९७१ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठात ‘आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन’ या विभागात आसामी भाषेच्या प्राध्यापक आणि पुढे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. १९७३ मध्ये त्यांनी तुलसीदास रचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कांडली यांनी लिहिलेल्या रामायणाचा अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली. या दोन्ही रामायणांचा अभ्यास करून इंदिराजींनी ‘गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील रामायण’ हा ग्रंथ लिहिला.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com