मुंबईतील आणखी एक वनस्पती उद्यान म्हणजे कुलाबा येथील नेव्ही नगर येथे समुद्रालगत असलेले सागर उपवन किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट उद्यान. १९९५ मध्ये जागतिक वन्यजीव निधी या स्वयंसेवी संस्थेने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आíथक मदतीच्या साहाय्याने (२.५ कोटी रुपये) ५ हेक्टर एवढय़ा विस्तीर्ण भूखंडावर पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचे एका सुंदर वनस्पती उद्यानात परिवर्तन केले. १९९३ मध्ये जागतिक वन्यजीव निधीचे माजी संचालक डॉ. पुनेथा यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू झालेले उद्यान उभारणीचे काम पूर्ण होऊन १९९५ मध्ये उद्यान लोकांसाठी खुले झाले. आता जरी उद्यानाचे प्रवेश शुल्क दोन रुपये असले तरी सुरुवातीला मात्र उद्यान सर्वासाठी नि:शुल्क होते. उद्यानात १५० प्रजातींच्या वनस्पती आहेत. या वनस्पतींना लागणारे पाणी महानगरपालिका पुरवत नाही तर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून येते.

उद्यानात मूळचे आफ्रिकेतील आफ्रिकन मिल्क बुश नावाचे नवलाईचे विषारी झुडूप आहे. ज्याच्या हिरवट छोटय़ा फुलापेक्षा त्याच्या भोवतालचा किरमिजी रंगाचा पुष्पछद (ब्रॅक्ट) जास्त आकर्षक असतो. याची फांदी तोडल्यानंतर जो चिकट द्रव बाहेर पडतो तो जर डोळ्यांत गेला तर डोळे चुरचुरतात व त्याचा स्पर्श जरी झाला तरी त्वचेवर फोड येतात.

फायकस किंवा अंजिराच्या प्रजातीतील नाताल फिग नावाचा एक छोटेखानी वृक्ष बागेत आहे. त्याची पाने त्रिकोणी असतात व गंमत म्हणजे पानाची मुख्य शीर पानाच्या टोकापर्यंत पोचण्याआधीच दुभंगते. हा वृक्ष दक्षिण आफ्रिकेतील नाताल या प्रांतामधील म्हणून याचे नाव ‘नाताल फिग’.

रातराणीचा मोठा भाऊ म्हणता येईल असं ‘दिनका राजा’ या नावाचे एक झुडूप या उद्यानात आहे. याच्या लांबुडक्या नळीसारख्या पांढऱ्या फुलांच्या गुच्छाला मंद सुगंध असतो.

याशिवाय उद्यानात बांबू, पाम, फायकस, फुलझाडे यांसाठी वेगवेगळे विभाग आहेत. व निवडुंगाच्या विविध जाती काचघरात ठेवलेल्या आहेत. वनस्पतींच्या विविधतेमुळे उद्यानात घुबड, बुलबुल, सूर्यपक्षी, जलपक्षी तसेच वटवाघळे दृष्टीस पडतात. तसेच येथील ‘रॉक गार्डन’मधील  कॅक्टस आणि युफॉरबीएअसी कुळातील अनेक शोभिवंत वनस्पती आपण या उद्यानात बघू शकतो.

 

डॉ. शुभदा निखाग्रे (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

 

इस्तंबूलचे.. तरुण तुर्क’!

एखाद्या राजकीय पक्षात किंवा संघटनेतील काही बंडखोर सदस्यांच्या गटाला पक्षाच्या किंवा संघटनेच्या ध्येय-धोरणांमध्ये काही बदल हवा असतो किंवा संघटनेत सत्ता हवी असते आणि ते त्यासाठी बंडखोरी करून उठतात, अशा सदस्यांच्या गटाला ‘तरुण तुर्क’ या नावाने संबोधले जाते. ‘यंग टर्क्‍स’ हा शब्द अशा गटांसाठी आताशा जगभरात प्रचलित झाला आहे. या ‘यंग टर्क्‍स’ शब्दप्रयोगाचा उगम झाला तो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इस्तंबूलमध्ये. १८८९ साली इस्तंबूल येथील इम्पीरियल मेडिकल अ‍ॅकॅडमीमधील काही विद्यार्थ्यांच्या गटाने तत्कालीन ओटोमान सुलतान अब्दुल हमीद द्वितीय याची सत्ता उलथवण्यासाठी कारस्थान रचले. अल्पकाळातच इस्तंबूल परिसरातील इतर महाविद्यालयांमधील विद्यार्थीही या कारस्थानात सामील झाले. त्यापैकी काही विद्यार्थ्यांमुळे हा कट उघडकीस येऊन सुलतानाने त्यांची धरपकड सुरू केली. या धरपकडीतून या कटाचे म्होरके आणि इतर विद्यार्थी निसटून पॅरिस येथे पळून गेले व तिथे त्यांनी आपली विद्रोही संघटना तयार केली. या गुप्त संघटनेचे नाव होते ‘कमिटी ऑफ युनियन अँड प्रोग्रेस (सीयूपी). या गटाचा म्होरक्या होता अहमद रिझा. १९०६ साली ‘ओटोमन लिबर्टी सोसायटी’ हा तयार झालेला दुसरा विद्रोही गट पुढे ‘सीयूपी’मध्ये विलीन झाला.

सन १९१३ पासून सीयूपी या गटात तलत पाशा, जमाल पाशा, अन्वर पाशा यांचे वर्चस्व निर्माण होऊन या गटाला ‘यंग ओटोमन्स’ असे नाव पडले. पुढे त्याचे ‘यंग टर्क्‍स’ झाले. त्यांच्या मागणीप्रमाणे सुलतान अब्दुल हमीदने जुल १९१३ मध्ये मर्यादित अधिकार देऊन सांविधानिक सरकार आणले. या सरकारात सीयूपी गटाचे वर्चस्व होते. या सरकारने अनेक प्रशासकीय सुधारणा करून न्याय व्यवस्था, स्त्री शिक्षण यात सुधारणा केल्या. परंतु पहिल्या महायुद्धात यंग टर्क्‍सला जर्मनी-ऑस्ट्रिया युतीत सामील होऊन मोठा पराभव पत्करावा लागला. पराभवाची जबाबदारी स्वीकारून यंग टर्क्‍सनी राजीनामा दिला. ते सरकारातून बाहेर पडले. या तीन पाशांपकी तलत पाशा आणि अहमद जमाल पाशा यांचा खून झाला. पुढे तुर्कस्तानमध्ये तुर्की प्रजासत्ताक राज्य आले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com