म्हैसूर संस्थानात उद्योग व्यवसायाला चालना देऊन एक वैभवशाली संस्थान बनविण्यात चिक्का देवराजा या शासकानंतर टिपू सुलतानाचा मोठा हातभार लागला. इ.स. १७८२ ते १७९९ अशा आपल्या कारकीर्दीत टिपूने राज्यात विविध उत्पादनांच्या वेगवेगळ्या बाजारपेठा वसवून कराची, जेड्डा आणि मस्कत अशा दूरच्या राज्यांमध्येही आपल्या मालासाठी बाजारपेठा मिळवून दिल्या. त्याच्या काळात सुतारकाम, लोहारकामामध्ये फ्रेंच तंत्रज्ञान वापरून त्या व्यावसायिकांनी उत्कर्ष करून घेतला. ते फ्रेंच तंत्रज्ञान आणि साखर उत्पादनासाठी चिनी तंत्रज्ञान आणण्यास टिपूच कारणीभूत झाला. बंगालहून आणलेल्या तंत्रज्ञानामुळे रेशीम उद्योगाला चालना मिळाली. टिपूने फ्रेंच तंत्रज्ञान वापरून कनकपुरा येथे तोफा उत्पादन आणि तारामंडलपेठ येथे दारूगोळा बनविण्याचा कारखाना सुरू केला. साखर, मीठ, लोखंड, मसाले, तंबाखू या वस्तूंचा पुरवठा राज्यातील उत्पादक पूर्ण करीत आणि निर्यातही करीत. चंदनी लाकडापासून केलेल्या वस्तू आणि तेल याची तर म्हैसूर राज्याची मक्तेदारीच होती. चीन आणि इराणच्या आखाती देशांमध्ये म्हैसूरच्या चंदनाच्या वस्तूंची बाजारपेठ निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम टिपूनेच केले. म्हैसूर राज्यात सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या खाणींनीही अर्थव्यवस्था भक्कम करण्यास हातभार लावला. ‘म्हैसूर सिल्क’चा उद्योग टिपूच्या प्रेरणेने फोफावला. टिपूचे वडील हैदरअलींनी बांबूच्या नळकांडय़ापासून रॉकेट बनविले आणि युद्धांमध्ये त्याचा वापर केला. टिपूने या रॉकेटमध्ये अनेक सुधारणा केल्या. या रॉकेटला पुढे धारदार पाते लावले आणि बांबूच्या ऐवजी लोखंडी नळी वापरली. त्यामुळे ही रॉकेट्स दोन कि.मी.पर्यंतचा पल्ला गाठून शत्रूचा वेध घेत असत. या प्रकारच्या रॉकेटचा मारा करण्यासाठी टिपूने आपल्या पाच हजार सनिकांना शिक्षण दिले. पुढे या प्रकारच्या रॉकेटमध्ये सुधारणा करून ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांनी नेपोलियनविरुद्ध झालेल्या युद्धांमध्ये वापर केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – अजूनी यौवनात मी..
वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यक्तींशी बोलताना ‘टेक्स्टाइल क्षेत्रात पूर्वी असायचा तसा विशेष जोश आता राहिलेला नाही’ असे नकारात्मक अथवा ‘टेक्सटाइल क्षेत्राचे आस्तित्व निरंतर अबाधित राहणार, कारण वस्त्र प्रावरणे ही मानवाची मूलभूत गरज आहे’ असे त्यातल्या त्यात सकारात्मक विधान ऐकावयास मिळते. नकारात्मक विचार ऐकला की कविवर्य भा. रा. तांबे यांच्या रिकामे मधुघट या अद्वितीय रचनेतील ‘संध्याछाया भिवविती हृदया’ या ओळी आठवतात, तर जरा सकारात्मक विधान कानावर पडताच ‘वासांसि जीर्णानी..’सारखे गीतेतील श्लोक स्मरतात. ज्यात नव्या शरीरातले, रूपातले सर्जन विशद केले आहे. या दोन्ही विचारांत तशी तथ्यता आढळते. शिक्षणाचा वाढता प्रसार, समाजाच्या राहणीमानात सतत होत असलेले बदल, परदेशगमनात झालेली लक्षणीय वाढ, दृक्श्राव्य माध्यमांबरोबरच मोबाइल फोन्स, इंटरनेटचा वाढता प्रभाव इत्यादी कारणांमुळे उपभोक्त्यांच्या अभिरुचीत खूपच बदल झालेला दिसतो. यातच हातात खर्चाला उपलब्ध असलेल्या रकमेमध्ये झालेल्या वाढीचा या बदलात भरीव वाटा आहे. त्यामुळे वस्त्रनिर्मिती उद्योगास सातत्याने नवनवीन प्रकारांचा मिश्र उत्पादने देण्याचा विचार करावा लागणार. अर्थ व्यवस्थेत होत असलेल्या बदलांमुळे उत्पादन खर्च वाढतच जाणार आणि त्यामुळे मूल्यवíधत मिश्र उत्पादनाच्या संचाचा विचार करावा लागेल. त्यासाठी जरूर तसा आधुनिकीकरणाचा विचार सातत्याने करणे क्रमप्राप्त आहे .
मार्केटिंगसंबंधीदेखील पुनरावलोकन आवश्यक वाटते. आपल्या मिश्र उत्पादनांशी सुसंगत अशा विक्रीच्या मार्गाचा डोलारा उभा करावयास हवा. उपभोक्त्यांच्या जवळ नेणारे आणि आस्थापानास सोयीस्कर असे विक्रीचे मार्ग असावे. स्वत:चा बॅ्रण्ड उभा करण्याचा आणि ब्रॅण्ड प्रमोट करण्याचा विचार करावा लागेल. संपूर्ण आस्थापनांत सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती हव्यात, तसेच विक्री साखळी भागीदारदेखील सकारात्मक विचारसरणीने भारित हवेत. बाजाराचा सजगतेने कानोसा घेणे वाढवावे लागेल. जागतिक स्तरांवर उत्पादने तसेच विपणन यांच्यात होणाऱ्या बदलांचा मागोवा, आकलन आणि त्यानुसार जरूर ते परिवर्तन करावे लागणार. थोडक्यात नव्या युगाचं आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वानाच आपल्या मानसिकतेत आमूलाग्र बदल सातत्याने करणे जरूर वाटते आणि तेही अगदी ‘खऱ्या अर्थाने वैश्विक’ या व्याखेत मोडणाऱ्या! असे झालं की आपला वस्त्रोद्योग वय वष्रे कितीही झाली तरी सतत टवटवी टिकवत म्हणेल, ‘अजुनी यौवनात मी’ ‘अजुनी यौवनात मी’!!
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org