मोठय़ा उद्योगांना आणखी वेगळ्या धोक्यांना सामोरे जावे लागणार. त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानीची व्याप्ती मोठी असणार, हे गृहीतच धरायला हवे. आपल्याकडे एक म्हण आहे. ‘जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती’. यामध्ये त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्टय़ांसह त्याच्या मर्यादा ध्यानात येतात. पण व्यक्तीनुरूप बदलत जाणाऱ्या या गुण-अवगुणांमुळे त्यांच्या अडचणींवर केले जाणारे उपायही बदलत असतात. हेच वाक्य ‘जितके वेगवेगळे उद्योग तितकी वेगवेगळी धोका व्यवस्थापन तंत्रे.’ मंडईत भाजी विकायला बसणाऱ्या विक्रेत्याचे धोके वेगळे तर नृत्य प्रशिक्षण संस्थेच्या संचालिकेचे प्रश्न वेगळे. तसेच तयार शर्ट शिवणाऱ्या कारखान्याचे धोके वेगळे तर कोळसा खाणींचे प्रश्न पूर्णत: वेगळे. एखादी मोठी सामाजिक संस्था चालवताना येणाऱ्या अडचणी वेगळ्या तर एखाद्या पापड तयार करणाऱ्या उद्योगासमोर असलेले धोके वेगळे. एनटीपीसीचे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र चालवण्याचे धोके वेगळे. यावरून धोका व्यवस्थापनातील वेगवेगळ्या तंत्रांची तुम्हाला थोडी तरी कल्पना आली असेल, असे वाटते. आपण कल्पना करू या की, ताज हॉटेल्सची आंतरराष्ट्रीय साखळी, एक हवाई कंपनी, टाटा स्टीलचा जमशेदपूरचा कारखाना, तेल आणि वायू महामंडळाचे खनिज तेल उत्पादन केंद्र, त्याच्या सर्वदूर पसरलेल्या तेलवाहिन्या इत्यादी मोठा व्याप असणाऱ्या उद्योगांच्या कामाची क्षेत्रे वेगळी, त्यांच्या गरजा आणि प्रश्न वेगळे. त्या-त्या गरजा भागवून धोका व्यवस्थापन तंत्रे आखावी व अमलात आणावी लागतात. ते गुंतागुंतीचे आहेच आणि किचकटही आहे. धोका व्यवस्थापनाच्या व्याप्तीचे स्वरूप समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे उदाहरण बघू या. या सगळ्या कामात किती प्रकारचे धोके दडलेले असतात, हे लक्षात येईल. समजा एक यंत्रसामग्री जर्मनीहून आयात करून पुण्याजवळच्या चाकणच्या कारखान्यात बसवायची आहे. त्या वेळी कारखाना ते हॅम्बर्ग बंदर ट्रकने, मग हॅम्बर्गहून मुंबईला बोटीने. यादरम्यान येणाऱ्या सुवेझ कालव्यात असणाऱ्या सोमालियन चाच्यांचा धोका, मुंबई बंदरात यंत्रसामग्री उतरवून पुन्हा ट्रकने चाकण येथे पाठवणे आणि तिथे कारखान्यात उतरवणे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धोके संभवतात.
अभय गुजर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. -काळा कुळकुळीत राजहंस..
‘राजहंस’ हा राजबिंडा पक्षी काळा कुळकुळीत असू शकतो? विचार केला आणि कल्पनाशक्ती लढविली तरी मनाच्या चक्षूसमोर काळा राजहंस साकारत नाही. ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ या गाण्यातही बदकाचे ते पिल्लू कुरूप नसून राजहंस निपजते.. उड जाएगा हंस अकेला या कबिरजींच्या पदामधला हंस शुभ्र पंखाचा रुबाबदार पक्षी असावा, असं वाटतं.. राजहंस निष्कलंक श्वेत पक्षी असतो, असं आपण  गृहित धरतो.
हे गृहीतक मोडून पडायला आज तीन चार शतकं उलटली, तरी त्या संकेतात्मक प्रतिकाचा, मेटॅफरचा मनावरचा पगडा उतरलेला नाही. १६९७ साली कोण्या एका विलेम ब्लामिंग  या  डच निसर्ग निरीक्षकाला पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये काळा राजहंस ‘ब्लॅक स्वान’ दिसला. त्या पक्ष्याचं ते रूप पाहून सारं जग चक्रावून गेलं. राजहंस या पक्ष्याची प्रचलित व्याख्याच मुळी ‘शुभ्ररंगाचा पक्षी’ अशी होती. पक्षी आहे तर राजहंस मग काळा कसा काय? या प्रत्यक्षावर कोणाचा विश्वास असेना. या वस्तुस्थितीला नाकारायचं तरी कसं? ११ सप्टेंबर २००१ साली अतिरेक्यांनी दोन प्रवासी विमानं हायजॅक करून हल्ला चढवून न्यूयॉर्कमधले वर्ल्ड सेंटरचे अनेकमजली टॉवर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून टाकले. त्याचवेळी अमेरिकेच्या ‘पेंटॅगॉन’ या पंचकोनी इमारतीवर हल्ला केला. असं घडू शकतं, यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. डोळ्यासमोर या इमारती कोसळताना पाहून भल्या भल्या राजकारण निरीक्षकांची हबेलंडी उडाली.
मित्रा, सकाळी सकाळी असल्या हायफंडा गोष्टी सांगून संभ्रमित करत नाहीये. तर विज्ञान, तर्कशास्त्र, संख्याशास्त्र या महान विद्याशाखांची कधी कधी कशी दमछाक होते, याविषयी अवगत करतोय. विज्ञानासमोर निसर्ग आणि माणूस कशी आवाहनं उभी करतो, याविषयी बोलताय.
 इथे मांडलेल्या घटनांना परस्पर जोडणाऱ्या विचार प्रक्रियेला ‘ब्लॅकस्थान थिअरी’ अथवा ‘ब्लॅक स्वान फिनोमिनान’ म्हणतात.
काही अतक्र्य घटना प्रत्यक्षात घडतात, त्या घडण्याची शक्यता संख्याशास्त्रानुसार शून्य टक्के असते. पांढऱ्या रंगाचा अमूक पक्षी म्हणजे ‘स्वान’ अशी व्याख्या असेल तर राजहंस काळ्या रंगाचा असण्याची शक्यता शून्य टक्के असते! संख्याशास्त्राच्या आधारे वैज्ञानिक प्रयोगातील किंवा निसर्गातील घटनांचा अभ्यास करून सत्याचा अन्वयार्थ लावणं हे काम विज्ञान करीत असते. निसर्गातील घटकांचा परस्पर संबंधाविषयी तर्कशास्त्र आणि संख्याशास्त्राचा वापर करून निसर्ग नियम प्रस्थापित करता येतात. त्यांचे सिद्धान्त मांडता येतात. ‘ब्लॅक स्वान’ थिअरीमध्ये मात्र एखाद्या चमत्कारप्रमाणे अतक्र्य गोष्टी प्रत्यक्षात का घडल्या याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न असतो. गंमत म्हणजे, ब्लॅकस्वानसारख्या घटना अपवादात्मक मानून आपण प्रस्थापित केलेले नियम अबाधित आहेत, असा दावा वैज्ञानिक करतात. परंतु ते चूक आहे. इथे अपवादाने नियम सिद्ध होत नाही तर ज्या वस्तुस्थितीचं निरीक्षण आणि परीक्षण करून नियम बांधले, त्या वस्तुस्थितीचं संपूर्ण नि सकल आकलन झालेलं नाही, असच ब्लॅक स्वानवरून सिद्ध होतं. आजकाल ‘देवकणा’वर चर्चा होतेय, ती घटनाही ब्लॅकस्वान आहे. अमेरिकेतली सुरक्षा व्यवस्था अभेद्य आहे, या नियमाला मोडून ९/११ चा घातपाती हल्ला झाला आणि आपली सुरक्षा व्यवस्था अमेरिकेला पुन्हा तपासावी लागली.
 मित्रा, विज्ञानाचा अभ्यास करणं ही रंजक आणि गमतीदार गोष्ट असते, ती अशी. मेंदूला झिणझिण्या आणणारी पुस्तकं वाचली की पिसारा फुलतो.
डॉ. राजेंद्र बर्वे  –  drrajendrabarve@gmail.com
संदर्भ :  ‘द ब्लॅकस्वान’ , लेखक : नसीम तालेब

इतिहासात आज दिनांक.. -१७ डिसेंबर
१७४० – मराठेशाहीतील एक पराक्रमी सरदार, वसईची मोहीम यशस्वी करणारे सेनानी चिमाजीअप्पा यांचे पुणे मुक्कामी निधन. रियासतकार चिमाजी अप्पांच्या संदर्भात लिहितात – ‘योग्यतेच्या मानाने पाहिले तर चिमाजी बाजीरावाहून कमी नव्हता. उलट, काही बाबतीत तो बाजीरावाहून जास्त होता असेच वाटते.  कित्येकदा बाजीरावाशी सरदारांचे खटके उडत; त्यांची समजूत चिमाजी करी. बाजीराव बाहेर स्वारीत व राजकारणात निमग्न असल्यामुळे तळावरचे बैठे व्यवहार चिमाजीला पहावे लागत. त्याच्या शौर्याची कसोटी वसईच्या युद्धात लागलीच आहे. हबशावरील मोहीम बाजीरावाने अर्धवट टाकली ती चिमाजीने सिदी सातास ठार मारून यशस्वी केली. गिरीधर बहादूर व दयाबहादूर यांस चीत करून माळवा प्रांत काबीज करण्याचे श्रेय चिमाजीस आहे. गुजरातचे व्यवहार तर बहुतेक त्यानेच उलगडले. १७३७ मधील फिरंग्यांची मोहीम अपूर्ण राहिली होती ती चिमाजीने १७३९ मध्ये पूर्ण केली. दोघेही अल्पायुषी वारले. बाजीराव – चिमाजीसारखे पुरुष अल्पायुषी व्हावेत हे मराठेशाहीचे मोठे दुर्दैव होय.’
१७७८  ख्यातनाम ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म.
१९८७  भोपाळ वायू दुर्घटनाग्रस्तांना ३५० कोटी रुपयांची हंगामी मदत द्यावी, असा भोपाळच्या जिल्हा न्यायाधीशांचा आदेश.
प्रा. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची -हर्षवर्धनचा उदय
इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या मध्यावर मगधचे साम्राज्य लय पावले होते. उत्तर हिंदुस्थानात हूण लोकांनी मोठा धुमाकूळ घातला होता. अशा वेळी प्रभाकर वर्धन या पराक्रमी योद्ध्याने हुणांना पिटाळून त्यांचे पारिपत्य केले. सध्याच्या हरियाणातील कुरुक्षेत्रापासून जवळच असलेल्या स्थानेश्वर येथे इसवी सन ५८३ मध्ये स्वत:चे राज्य त्याने स्थापन केले आणि पुढे गांधार व सिंध प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडले. प्रभाकर वर्धनाला राज्यवर्धन आणि हर्षवर्धन ही दोन मुले व राजश्री ही कन्या. तिचे लग्न मौखारी राजा ग्रहवर्मनशी झाले होते. माळव्याचा राजा देवगुप्तने लढाईत ग्रहवर्मनचा पराभव करून त्याला मारले व राजश्रीला कैद करून नेले. तेव्हा प्रभाकर वर्धनाचा मृत्यू होऊन त्याचा मोठा मुलगा राज्यवर्धन गादीवर आला होता. बहिणीची सुटका करण्यासाठी माळव्यावर चढाई करून त्याने देवगुप्तचा पराभव केला. पण त्याचवेळी शसांक हा गौड (पूर्व बंगाल) येथील राजा राज्यवर्धनचा मित्र पण आतून देवगुप्तला सामील झालेला होता. त्याने कपटाने राज्यवर्धनाचा खून केला आणि राजश्रीला कैदेत ठेवले. राज्यवर्धनाच्या मृत्यूनंतर हर्षवर्धन इ. स. ६०६ या वर्षी- म्हणजे त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी- स्थानेश्वरचा राजा बनला.
गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर मगध राज्याची लहान लहान शकले झाली होती. हर्षवर्धनाने गादीवर आल्यानंतर प्रथम या सर्व लहान राज्यांचे एकीकरण केले. या सर्व राजांनी हर्षवर्धनाला आपला सम्राट मानून ते हर्षवर्धनाचे मांडलिक राजे झाले. शसांकाचे पूर्व बंगालचे राज्यही मिळवल्यामुळे हर्षवर्धनाच्या राज्याची हद्द पश्चिमेकडल्या गांधारपासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचली. देवगुप्तचा पराभव करून हर्षांने राजश्रीला त्याच्या कैदेतून सोडवून आणले. तिला परत आणून कनोज येथे ठेवले. पुढे हर्षवर्धनाच्या साम्राज्याची कनोज हीच राजधानी झाली.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com