मेडिकलच्या चौथ्या वर्षांत मी विशी ओलांडली होती, तेव्हा प्रेमात पडणे स्वाभाविकच होते. एक मुलगी माझ्याकडे जरा जास्तच बघत असे, असे मला वाटायचे. पण तिचे हे बघणे कळण्यास मीही तिच्याकडे बघत असणार. प्रेमाचे असेच असते.
एकदा सहल निघाली तेथे मित्रांच्या नादाने निरा पिण्याच्या प्रयत्नात ताडी पोटात गेली आणि मी एकदमच धीट झालो. तेवढय़ात कसे कोणास ठाऊक, ही दिसली. मी म्हटले चल आपण समुद्रावर फिरायला जाऊ. काही आढेवेढे न घेता ही गुपचूप आली. समुद्र जवळ आला, खडक लागले ते मी उडय़ा मारून पार करू लागलो. तेव्हा ही मागेच राहिली आणि रागावून बघू लागली. तिला हात देऊन (तिने हात धरू दिला, म्हणून) मदत करण्याच्या नादात मीच धडपडलो आणि पडलो. मला खरचटले. रक्त येऊ लागले. तेव्हा ‘तरी मी तुला सांगत होते’ अशा नजरेने ती माझ्याकडे बघू लागली. मग तिने एक भन्नाट गोष्ट केली. माझे रक्त तिने हळूच कपाळाला लावले. मी एकदमच नव्‍‌र्हस झालो. मग ती म्हणते, ‘माझी शपथ घे की परत पिणार नाहीस’. मी पहिल्यांदा, प्यायलोच नाही अशी थाप मारली. ती म्हणाली, खोटे बोलू नकोस मी सकाळपासून तुझ्यावर नजर ठेवून आहे. तिला म्हटले, तुझी शपथ परत घेणार नाही.
यावर ती खूश झाली. माझ्या म्हणण्याचा संबंध ‘तुझी शपथ’ याच्याशी होता आणि पिण्याशी कमी असणार, हे तिच्या लक्षात आले नसावे. आम्ही परत चालू लागलो तेव्हा ती मला थांबवून म्हणते, माझ्याकडे बघ. नजरेला नजर भिडल्यावर ती म्हणाली, ‘तुला हे सगळे झेपणार आहे का? तू नाटकात काम केलेस, त्यात जे प्रेमाचे नाटक केलेस तसे हे नाही.’
काय उत्तर द्यावे समजेना. मी असले गहन विचार केलेच नव्हते. ही माझ्याएवढीच होती; पण मुली मुलांच्या वयाच्या असल्या तरी बऱ्यापैकी दूरदर्शी झालेल्या असतात. त्यातलाच हा प्रकार असावा.
मग ती वळली, चालू पडली आणि म्हणाली, ‘उद्या कॉलेजमध्ये भेटू’.
पुढे अनेक आठवडे ती माझ्याकडे बघत एक मंद स्मितहास्य करीत असे. ते सुप्रसिद्ध चित्र आहे ना, ‘मोनालिसा’चे.. तसेच हे गूढ हसणे होते, हे कितीतरी वर्षांनी लक्षात आले. त्यापुढे आम्हा दोघांतली भाषा शब्दांची नव्हती. त्यात आविर्भाव मात्र होते आणि एक गूढ स्मितही होते.

कुतूहल
कुळकथा दुय्यम तृणधान्यांची
ग्रामीण भागात नाचणी, वरी, कोद्रा, सावा आणि कोदी अशा शहरी लोकांना फारशा परिचित नसलेल्या तृणधान्यांचा वापर जेवणात होतो. नाचणीतील प्रथिनांमुळे तिचा उदोउदो सुरू झाला. मधुमेहावर उपाय म्हणून नाचणीने आपले लक्ष वेधून घेतले. पण इतर धान्ये कदान्य वा दुय्यम अन्न म्हणूनच वापरात आहेत. गरिबांना आपली भूक भागविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
नागली वा नाचणी (रागी) या धान्याचे मूळ सापडते आफ्रिकेतील युगांडा आणि इथियोपिया देशात. आजही युगांडा, झांबिया, मोझांबिकमध्ये ते महत्त्वाचे धान्य आहे. भारतात नाचणी सुमारे ३००० वर्षांपूर्वी आली. ख्रिस्त काळात ती युरोपात गेली. भारतात आणि आफ्रिकेत तिच्या अनेक जाती आढळतात. मूळ शास्त्रीय नाव ‘एल्युसीन कोराकाना’. उष्णकटिबंधीय नाचणी बहुवर्षयिु कणसांच्या पिकाच्या प्रकारात मोडते.
वरी (भगर) या अन्नधान्याचे शास्त्रीय नाव आहे ‘पॅनिकम मिलियासियम’. ते समशितोष्ण कटिबंधातील रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, अमेरिका, अर्जेटिना आणि ऑस्ट्रेलियात पिकते. भारतात मध्य प्रदेश आणि गुजरातेत पिकते. पूर्व आफ्रिका, चीन, मांचुरिया, कोरिया या भागात ते प्राचीन काळापासून वापरात आहे.
राळा (कांगणी) हे आफ्रिकेत हजारो वर्षांपासून वापरात असलेले धान्य अरबांनी भारतात आणले. मग ते आशिया व चीनमध्ये गेले. तांदूळ आणि मक्यापूर्वी हे महत्त्वाचे धान्य होते. मग त्याची पीछेहाट झाली. काहींच्या मते, चीन हे त्याचे मूळ स्थान होते. १८५० मध्ये अमेरिकेत त्याला महत्त्वाचे स्थान मिळाले. मात्र तिथे त्याचा वापर फक्त गुरांसाठी व पक्ष्यांसाठी होई. नंतर ते औषधी गुणधर्मामुळे जास्त वापरात आले. त्याचे शास्त्रीय नाव ‘सेटरिया इटालिका’.
कोद्रा हे भरड धान्य ‘वार्नयार्ड मिलेट’ नावाने परिचित आहे. भारतात काही प्रदेशातच ते वापरतात.
सावा हे भारतातील प्राचीन काळातील तृणधान्य. रुद्रसंहितेत संपत्तीच्या परिगणनेत त्याचा समावेश आहे. कालिदासाच्या शाकुंतलात त्याचा उल्लेख शामकथा असा केला गेला आहे. ते हरिणाचे खाद्य आहे. त्याचे शास्त्रीय नाव ‘पॅनिकम मिलिअर’. हे पीक कोकणात वरकड जमिनीत घेतात.
कोदी भारतात ३००० वर्षांपासून वापरले जाते. मूळ पश्चिम आफ्रिकेतून १९३१ साली ते ऑस्ट्रेलियात गेले.
डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस 
छातीत दुखणे : भाग – १
छातीत दुखणे ही लक्षणे चार प्रकारच्या रोगात असू शकतात.
१) हृदयाचे जागीच किंवा त्याच्या जवळपास दुखणे, हा हृद्रोग होय. २) छातीमध्ये कुठेही, पण ठराविक जागी दुखणे हा स्नायू किंवा श्रमश्वासाचा विकार झाला. ३) खोकला, सर्दी, पडसे व त्याची परिणती क्षय विकारात होते. या विकारांत चमका हे पूर्वरुप असते. ४) छातीत केव्हाही कुठेही वेगवेगळ्या प्रकारे संचारी दु:ख असते. छातीत दुखावयास लागले की लगेच धावपळ, ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टरी तपासण्या, क्ष किरण, हृदयाचा आलेख तपासण्या सुरू होतात. वरील प्रकारे त्या दुखण्याची जागा, कारण, वेळ यांचा विचार करावा. थोडी विश्रांती घेऊन बघावी. कदाचित बरेच पैसे, धास्ती व धावपळ वाचेल.
काही वर्षांपूर्वी संध्याकाळीचमी तातडीच्या कामासाठी कारखान्यातून बाहेर पडत होतो.  जिन्याने खाली आलो तो एकदम छातीत कळ आली. असं वाटलं की आता पुढे पाऊल पडणे अशक्य.जाणे तर महत्त्वाचे. थोडा विचार केला. कारखान्यातील कोणाला तरी वरून अर्जुनारिष्टची बाटली आणावयास सांगितली. बाटली उघडली. काही विचार न करता अर्धी बाटली अंदाजे शंभर मि.लि. औषध प्यायलो. आश्चर्य म्हणजे दोन पाच मिनिटांत कळ थांबली, सायकलवर टांग टाकून मी बाहेरही गेलो. दुखणे केव्हाच विसरलो. हा अनुभव नंतर आमचे बंधू डॉक्टर रघुनाथ यशवंत वैद्य यांना एक दिवस सांगितला. मी यापूर्वी हे सांगितले नाही व कोणतीच डॉक्टरी तपासणी करून घेतली नाही; म्हणून त्यांना फार राग आला. असो. उठसूठ तपासणीपेक्षा रुग्णाला स्वत:चे नेमके ज्ञान व त्यावेळेस हजरजबाबी उपचार हवा. मी तपासणीत अडकलो असतो तर आजपर्यंत डॉक्टरांची औषधे घेत राहिलो असतो.
मधुमेह, स्थौल्य, हृद्रोग असा रोगांचा इतिहास असणाऱ्यांनी छातीत दुखणे लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. संचारी वेदना; कफ, सर्दी यांचा इतिहास व विश्रांतीने बरे वाटते का, हे अभ्यासून उपचार ठरविता येतात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
     
आजचे महाराष्ट्रसारस्वत
२० फेब्रुवारी
१९७४ > मराठीत नाटय़प्रशिक्षणाची शास्त्रशुद्ध मुहूर्तमेढ रोवणारे केशव नारायण काळे ऊर्फ ‘के नारायण काळे’ यांचे निधन. स्तानिस्लावस्कीच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्टर प्रिपेअर्स’ वर आधारित ‘अभिनयसाधना’ हे पुस्तक काळे यांनी लिहिले. खेरीज ‘भूमिकाशिल्प’, ‘कौटिल्य, मराठी नाटक व मराठी रंगभूमी’, ‘मराठी रंगभूमी : प्रतिभा, रूप आणि रंग’, आदि पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. ते अभिनेते, पटकथाकार व ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’सह काही नियतकालिकांचे संपादकही होते.
१९९४ > राज्यघटनेचे जाणकार, भारताच्या राजकीय जडणघडणीचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू त्र्यं. कृ. (त्र्यंबक कृष्णाजी) टोपे यांचे निधन. गोपाळ कृष्ण गोखले आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनकार्याबद्दल चिकित्सक पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील सामाजिक व शैक्षणिक समस्या’ हा ग्रंथ व अनेक शैक्षणिक पुस्तकांचे लेखन केले.
१९९७ > ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक, तरुण लेखकांची फळी उभी करणारे प्रकाशक व ‘श्रीग्रामायन’, ‘निर्माणपर्व’, ‘बलसागर’ अशा पुस्तकांचे लेखक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.
– संजय वझरेकर