व्हिएतनाममध्ये जपानी व फ्रेंच सरकारांची रस्सीखेच चालली असता हो चि मिन्ह यांनी  ‘व्हिएन-मिन्ह’ हा राजकीय पक्ष स्थापन केला. लाल ध्वजावरील सोनेरी तारा हे या पक्षाचे निशाण होते. ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून जपानचे दुसऱ्या महायुद्धातील आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे व्हिएतनाममधील राजकीय परिस्थिती अचानक बदलली. १६ ऑगस्ट १९४५ रोजी जपान्यांनी व्हिएतनामचा नामधारी राजा बाओ दाई याच्या हंगामी सरकारच्या हाती सर्व सूत्रे दिली. पण थोडय़ाच दिवसांत बाओ दाईने राजत्याग केला. व्हिएत-मिन्ह क्रांतिकारकांनी हनोई शहर ताब्यात घेतले. जुलै १९५४ मध्ये जीनिव्हा येथे फ्रान्स, ब्रिटन व संबंधित राष्ट्र प्रतिनिधींची बैठक होऊन व्हिएतनामची फाळणी झाली. हनोईचे हो चि मिन्ह यांचे क्रांतिकारी सरकार हे उत्तर व्हिएतनाम ठरले, तर दक्षिण व्हिएतनामच्या सायगाव या राजधानीत सम्राट बाओ दाईचे सरकार फ्रेंचांच्या आशीर्वादाने कारभार करू लागले. करारारात असेही ठरले होते की १९५६ मध्ये सार्वमत घेऊन दक्षिण व उत्तर व्हिएतनामचे एकीकरण करायचे की नाही, हे जनताच ठरवील. आता दक्षिणेतील फ्रेंच व अमेरिकेचे बाहुले सरकार काम करू लागले व त्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा दोन्ही राष्ट्रांकडून होऊ लागला. परंतु सम्राट बाओ दाईने त्याला या सरकारात मिळालेले पंतप्रधान पद सोडले व त्यानंतर फ्रान्स व अमेरिकेच्या पसंतीचा व्हिएतनामी कॅथलिक दिएम याला दक्षिण व्हिएतनामचा पंतप्रधान केले गेले. दिएम हा अमेरिकेच्या मर्जीतला असल्याने अमेरिका आता भरपूर पैसा व लष्करी साहित्य तिकडे पाठवून लागली. पण सैन्य मात्र फ्रेंच होते. फ्रेंचांनी मे १९५५ पासून आपले सैन्य काढून घेण्यास सुरुवात केली आणि कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामशी दक्षिण व्हिएतनाममार्फत युद्ध करण्याचा अमेरिकेचा मार्ग मोकळा झाला. १९५७ पर्यंत फ्रेंचांनी आपले सर्व सैन्य काढून घेऊन व्हिएतनाम सोडले, पण अमेरिकेच्या फौजा १९७३ पर्यंत होत्या.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com