कुतूहल: थायरॉईड संप्रेरकाची गरज
आपल्या शरीरातलं आयोडिनचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून आपल्याला आयोडिनयुक्त मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. का बरं?  वेगवेगळ्या शरीरक्रिया होत असताना त्यांच्या नियंत्रणासाठी शरीरात संप्रेरकं पाझरतात. शरीरातील ऊतींचा विकास, चयापचय, प्रजनन इ. क्रियांवर या संप्रेरकांचे परिणाम घडून येत असतात. शरीराचं संतुलन राखणाऱ्या ह्या संप्रेरकांचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमीजास्त झालं तर मात्र शरीरात दोष किंवा बिघाड उत्पन्न होऊ शकतात.
गळ्यात असलेली अवघ्या १५ ते २० ग्रॅम वजनाची अवटू ग्रंथी म्हणजेच थायरॉइड शरीराच्या अनेक क्रियांना नियंत्रित करते. सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये शरीराचं योग्य पोषण आणि वाढ होण्यासाठी आणि चयापचयाच्या नियंत्रणासाठी या ग्रंथीची आवश्यकता असते. या ग्रंथीतून स्रवणाऱ्या थायरॉक्सिन या संप्रेरकामध्ये आयोडिन हा प्रमुख घटक असतो. अन्नातून घेतलं जाणारं आयोडिन रक्तात शोषलं गेलं म्हणजे ते रक्ताद्वारे थायरॉइडमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या विशिष्ट यंत्रणेमुळे तेथेच शोषलं व साठवलं जातं. शरीरात असलेल्या एकूण आयोडिनपकी एक तृतीयांशपेक्षा अधिक आयोडिन या ग्रंथीत सापडतं.
जेव्हा आहारात आयोडिनची कमतरता असते तेव्हा थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढतो. या विकाराला ‘गलगंड’ किंवा ‘गॉयटर’ म्हणतात. गर्भाशयात गर्भ वाढत असताना थायरॉईड संप्रेरकं मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. गर्भावस्थेत किंवा मेंदूची वाढ होण्यापूर्वीच थायरॉईड संप्रेरकं कमी पडली तर मेंदूची वाढ खुंटते. बाळ मतिमंद होतं. ते मूल वेगळं दिसतं. ओठ जाड होतात. नाक नकटं दिसतं. मूल ठेंगू होतं. थायरॉईड संप्रेरकांचा पुरवठा कमी पडू लागला तर शरीराला पुरेशी ऊर्जा प्राप्त होत नाही आणि खिन्नता, विस्मृती, विचार करण्यात संथपणा येतो, निरुत्साहीपणा जाणवतो.
डोंगरावर वस्ती करणाऱ्या माणसांत अशी आयोडिनची कमतरता असल्याचं ज्ञात होतं. भौगोलिक कारणास्तव या विभागाला ‘हिमालय गॉयटर बेल्ट’ असं नाव दिलं गेलं होतं. सर्व जगात गॉयटर होण्याचा हा सर्वात मोठा पट्टा आहे. गेल्या काही दशकांत आयोडिनची कमतरता भारतात सर्वत्र आढळलेली आहे.
प्रया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  

प्रबोधन पर्व:  राजकीय स्पर्धा जात्यंताच्या उद्दिष्टासाठी की सत्तेच्या लुटीसाठी?  

‘मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची ‘जनतेची लोकशाही क्रांती’ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ‘राष्ट्रीय लोकशाही क्रांती’ या दोन्ही वर्गीय असून युरोपीय उसनवारीच्या आहेत, तर नक्सलवादी माओवाद्यांची ‘नवी लोकशाही क्रांती’सुद्धा वर्गीय असून चिनी उसनवारीची आहे. या तिन्ही क्रांत्यांचे नेतृत्व आर्थिक वर्गीय सर्वहारा करणार असल्याने त्यांचा हितसंबंध जातीव्यवस्था नष्ट करण्यात नाही. जरी तात्त्विकदृष्टय़ा चिनी क्रांतीचे नेतृत्व औद्योगिक वर्गीय सर्वहारा करणार होता, तरी तिचे प्रत्यक्ष नेतृत्व ग्रामीण निमसर्वहाराने केले. जातीव्यवस्थेचे बळी माजी अस्पृश्य जाती, आजचे सामाजिक सर्वहारा आहेत. ते भारतीय लोकसंख्येच्या १६ टक्के आहेत. जात्यंतक क्रांती यशस्वी होण्यासाठी तिचे नेतृत्व त्यांनी केले पाहिजे. पण सामाजिक सर्वहाराचे दोस्त असलेल्या मिरासदारेतर शेतकरी जाती व मिरासदार शेतकरी जातीचे सामान्यजन जातिव्यवस्थेचे समर्थक आहेत. ते जर सामाजिक सर्वहाराचे पक्के दोस्त व्हायचे असतील तर सीलिंगवरची वरकड जमीन ताब्यात घेऊन ती भूमिहीन व अल्पभूधारकांना वाटण्यात त्यांना सामाजिक सर्वहाराला मदत करावी लागेल. ’’
कॉ. शरद् पाटील ‘प्रिमिटीव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (खंड ४, २०१२)’ या पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात भारतीय जनतेला जातवर्गव्यवस्था बदलायची क्रांती करावी लागणार आहे हे सांगतानाच त्यातील अडथळे नमूद करताना लिहितात- ‘‘ जातीव्यवस्था ग्रामीण भागांमध्ये उघडपणे दिसते.खेडुत जातीनिहाय वस्त्यांत रहातात, मुख्यत: अवर्ण व सवर्ण वस्त्यांत. जातीव्यवस्था विघटित होत आहे असे म्हटले जाते. जाती वर्गामध्ये फुटत नाहीत. खालच्या जातींतल्या श्रीमंतांनी आपापल्या जातींच्या वस्त्यांत संपन्न घरे बांधली आहेत आणि ते मिरासदार शेतकरी जातींच्या उच्चभ्रूंच्या राजकीय पक्षांशी व महापुरुषांशी आपापल्या जातींच्या राजकीय पक्षांनी व महापुरुषांनी स्पर्धा करीत आहेत; पण ही स्पर्धा जात्यंतासाठी नाही, तर सत्तेच्या लुटीसाठी आहे. या स्पर्धेत जातीयवाद व मूलतत्त्ववाद वाढत जातो.’’

मनमोराचा पिसारा:  अध्र्या रात्री जागेपणी
प्रिय मित्रा,
अगदी मनापासून सांगतो, म्हणजे मनातलं, मनापासून तुझ्याशी बोलतोय. तुझ्याशी नाहीतर कोणाशी बोलू रे? नाही, हळवेपणानं म्हणत नाहीये, मला ‘आपुलाची वाद आपणाशी’ टाळायचा आहे आणि संवाद करायचाय.. नुसतं बोलून टाकलं तरी डोक्यावरचं ओझं उतरतं. तर अधून मधून अचानक मध्यरात्री किंवा उत्तर रात्री जाग येते. तसाच डोळे मिटून पडून असतो. दिवस इतक्या लवकर चालू करायचा नसतो म्हणून स्वस्थ पडून राहिलं की लागते थोडय़ा वेळानं झोप.
म्हणजे जागा होतो तो दचकूनबिचकून नाही किंवा जागा झाल्यावर काही दुष्ट विचार मनाला छेडतात त्यानं अस्वस्थ होतो.
दुष्ट विचार म्हणजे भविष्यात घडू नयेत अशा गोष्टींची भीती मनात दाटून येते. क्षणकालच टिकते आणि जाते विरून.
पूर्वी अशा विचारांचं भय वाटायचं. हे विचार असेच टिकले किंवा ज्यांची धास्ती वाटते, ते घडलं तर..?
या विचारानं व्याकूळ व्हायला व्हायचं. वाटायचं की भीतीचा हा राक्षस माझ्या झोपेवर जगतो. मला जागं करून माझ्या मनातली ऊर्जा शोषून घेतो..
हळूहळू कळू लागलं की हे सारंच काल्पनिक नाही का? म्हणजे मनाने फास्ट फॉर्वर्ड करून भीतीचा राक्षस उभा करायचा आणि मग आपण त्याच्याकडे लक्ष देऊन पोसत राहायचं. मनाची ही सगळी बेवकुफी..  आणखी काय? हे कळलं ना त्या दिवसापासून खरं म्हणजे रात्रीपासून मी बिनधास्त झालो. वाटलं आपणच माजवलेल्या या राक्षसाला का भ्यायचं? आपण त्याच्याकडे, तसल्या नकारात्मक विचारांकडे लक्ष पुरवतो म्हणजे त्या विचारांना जणू इंधन पुरवतो.
विशेष करून रात्रीच्या वेळी सर्व झोपलेले असताना आपण एकटेच असतो. अशा वेळी तर मनाचं सारं लक्ष अशा दुष्ट-नकारात्मक विचारांकडे केंद्रित होतं. नकारात्मक विचारांकडे लक्ष देणे, त्यांच्या बाधकतेचा विचार करणे, अशा गोष्टी घडण्याच्या शक्यता पुन्हा पुन्हा तपासणं म्हणजे त्या विचारांना ऊर्जा देणं.
मित्रा, आता नेमकं आठवत नाही, पण अशाच एका अडनिडय़ा वेळी हे सत्य गवसलं. आपण दुर्लक्ष केलं तर त्या नकारात्मक विचारांना चालना मिळत नाही. त्यामुळे त्यांचा आपल्या मनावरचा पगडा नाहीसा होतो..
आता, अशी अडाणी वेळी जाग आली तर त्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मनातला अस्वस्थपणा मावळतो. चार-दोन वेळा दीर्घ श्वास घेऊन हलके हलके उच्छ्वास करतो. कुस बदलतो आणि..
मित्रा, खूप खासगी अनुभव होता. तुला सांगून बरं वाटलं रे, मला सुचलेली ही ट्रिक खूप जणांना लागू पडेल.. नक्कीच.
तुझाच मी
डॉ.राजेंद्र बर्वे