मुंबईच्या हवेत कोणकोणते त्रासदायक घटक आहेत याची जंत्री करणे मोठे जटिल काम आहे. १९९६ साली जपानमधील नागोया गावी एक परिषद झाली. तेथे अमेरिकेच्या हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने मुंबईच्या हवेत असलेल्या नायट्रोजन ऑक्साइड्च्या जास्तीच्या प्रमाणाबद्दलचा निबंध वाचला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे हे जास्तीचे प्रमाण असण्यात मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो.
खरे म्हणजे नायट्रोजन डाय ऑक्साइड हा सर्वव्यापी आहे. कारण खनिज आणि जैविक इंधने जाळली तर त्यांच्या ज्वलनातून हा वायू बाहेर पडतो. या वायूच्या प्रादुर्भावामुळे ज्या अनेक गोष्टी घडतात त्यातली एक म्हणजे रासायनिक स्मॉग. स्मॉग हा शब्द स्मोक आणि फॉग याच्या संमिश्रातून तयार झाला आहे. मराठीत याला धुरके म्हणतात. या धुरक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना दम्याचा त्रास होतो, असा आयआयटी पवईच्या पर्यावरण विभागातीला प्रा. रश्मी पाटील यांचा निष्कर्ष आहे. हार्वर्ड स्कूलच्या अभ्यासात प्रा. रश्मी पाटील सहभागी होत्या. नायट्रोजन ऑक्साइड अथवा त्याची इतर रसायनांबरोबरची संयुगे ही माणसाला घातकच आहेत. केरोसिनचा स्टोव्ह, लाकडे जाळणारी चूल, सिमेंटचा कारखाना, वाहनांच्या धुराडय़ातून बाहेर पडणारा धूर आणि धूम्रपान यामुळे नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो आणि तो हवेत मिसळतो.
हार्वर्ड अभ्यास मंडळाने तेरा देशांतल्या, सत्तर ठिकाणी ४९१ व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांची प्रत्येकी दोन दोन दिवस पाहणी केली. यातील फिनलंड येथील पाहणीत एक कोटी भागात फक्त साडेपाच भाग नायट्रोजन डायऑक्साइडचे भाग आढळून आले. या उलट दक्षिण कोरियात सेऊलला सर्वात जास्त म्हणजे एक कोटी भागात ४३ भाग, जपानमधील टोकुशीमा येथे ४१.९ भाग आणि मुंबईला ४०.८ भाग असे प्रमाण आढळले.
यामुळे डोकेदुखी, घसा धरणे, खोकला, छातीत जड वाटणे, असे विकार उद्भवतात. फुप्फुसाचे  विकार उद्भवतात. मुला-मुलींची वाढ नीट होत नाही. एल.पी.जी. अथवा वीज वापरली, स्वयंपाकघरात हवा खेळती ठेवली तर नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण खूप कमी आढळते.
अ. पां. देशपांडे, (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – मी आणि ‘द रेझर्स एज’
नेमक्या कोणत्या साली ती कादंबरी वाचली, ते आठवत नाही. खूप र्वष झाली इतकं नक्की. बाकी सनावळ्यांच्या गोतावळ्यात पुस्तकांना किंवा आठवणींना अडकवणं ना रुचतं, ना पटतं. पुस्तकांच्या आठवणी मनात रेंगाळत राहतात, त्यांचे तपशील हरवतात, पण त्यांनी मनावर रेखलेलं गोंदण सदैव जाणवत राहतं.
गेली कित्येक र्वष लॅरी डेरेल हे सॉमरसेट मॉमच्या ‘द रेझर्स एज’मधलं पात्र माझ्याबरोबर वाटचाल करतंय. तसं लॅरीच्या आणि माझ्या जगण्यात आणि जीवनशैलीत साम्य नाही, पण आम्हा दोघांचा प्रवास समांतर आहे. तो अधूनमधून मला भेटतो, माझ्या स्वत:मध्ये नाही तर एखाद्या मित्राच्या वागण्या-बोलण्यात. लॅरीची गोष्ट जिथे संपली तिथे माझी सुरू झाली. ‘द रेझर्स एज’ ही मॉमची १९४४ सालची लोकप्रिय कादंबरी. ढोबळमानानं त्याची गोष्ट सांगतो म्हणजे उलगडा होईल. पहिल्या महायुद्धातला लॅरी हा एक अमेरिकन सैनिक, मित्राच्या उद्ध्वस्त मृत्यूचा साक्षीदार. त्यानं हादरलेला आणि आतून हललेला. सामान्य जीवनात परतण्यास, चार पैसे देणारी नोकरी करण्यास तो नकार देतो आणि ‘मला फक्त भटकायचंय, जग जवळून पाहायचंय, माणसं बघायची आहेत, त्यांचं श्रेयस आणि प्रेयस काय असतं ते पाहायचंय, असं म्हणून लग्न नाकारून भटकंती सुरू करतो. त्यासाठी पॅरिसला येतो, बोहेमियन जीवनाला भिडतो, पोटा-पाण्याकरिता खाण कामगार होतो. पुन्हा भटकतो नि अखेर भारतात येतो. तामिळनाडूमध्ये राहतो, मेडिटेशन, संमोहन, स्वत:शी संवाद शिकता शिकता आत्ममग्न होतो. रमण महर्षीसदृश गुरूंशी वाद-विवाद करतो. अद्वैताची गाठ पडते आणि शोध संपतो. पुन्हा पूर्वस्थितीत येऊन सामान्यपणे जगू लागतो. करोडो सर्वसाधारणांपैकी एक होतो.
लॅरी भेटतो असा विविध रूपात. जीवनाला शोधणारा, न थांबता, शोधणारा, नि:संग आणि स्वत:मध्ये जग शोधणारा.
कठीण असतं असं जगणं असं लॅरी नाही म्हणत, तो फक्त म्हणतो, ‘असं असतं का? हं.. पुढे काय?
लॅरीच्या आयुष्यात भेटलेली माणसं त्याची मैत्रीण, मित्र यांचं जीवन रूढ असूनही अस्थिर असतं. नाकारलेल्या मूल्यानं येणारं रितेपण, व्यसनी छंदीफंदीत बरबटलेलं, असं काहीसं पण ती माणसंही जगतात आणि त्यातले काही ऐषोरामी जीवन जगून नंतर मित्रांनी झिडकारलं, एकटेपणा वाटय़ाला आला तरी समाधानानं डोळे मिटतात. सॉमरसेट मॉमप्रमाणे लॅरी कोणाच्याच जगण्यावर भाष्य करीत नाही, अगदी स्वत:च्यादेखील. विलक्षण वाटते ती लॅरीची ही वृत्ती. शोधावी लागत्येय माझ्या मनात, असेल माझ्यातही तशीच. डायग्नोसिस आणि पॅथॉलॉजीच्या चष्म्यात. जगाकडे पाहण्याची सवय लागलीय. मुळात नसावी. तर हा लॅरी मला उपदेश करीत नाही, फक्त साथ करतो. सावलीसारखा बरोबर असतो. मला आधार देण्यासाठी वगैरे नाही, असतो म्हणून असतो.
मॉमनं कादंबरीच्या सुरुवातीला कथाउपनिषदातील एक श्लोक मांडला आहे. या श्लोकाचा अर्थ लॅरीच्या आणि त्याच्या नातेपरिवारातल्या लोकांच्या आयुष्यात मी शोधतो.
 क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया
दुर्गमं पथस्तत कवयोवदन्ति
 (हा मार्ग तलवारीच्या धारेसारखा धारदार आहे. चालणं दुर्गम असं गुरू म्हणतात.) लॅरीनं अशी मार्गक्रमणा केली. पण श्लोक म्हणतो ते खरंय. मुक्तीचा मार्ग खडतर असतो, धारदार शस्त्रासारखा. त्यावर चालणं दुरापास्त.
मॉम हा कुशल लेखक आहे याचा ही कादंबरी वाचताना रम्य अनुभव येतो. तो कादंबरीत स्वत: लेखक म्हणून वावरतो, आपल्याशी संवाद करतो, गोष्ट नॅरेट करतो लॅरीचे हे अनुभव सांगण्यासाठी मी ही कथा सांगतोय इतकंच! मला वाटतं, कधी कधी लॅरी होता होता, आपण मॉम होतो आणि लॅरीकडे पाहतो, म्हणजे आपल्याकडेच. ‘द रेझर्स एज’ ही कादंबरी, अशी माझ्याबरोबर जगत्येय, आणि हेही जगणं तसं खडतर आहे, बट सो फार सो गुड.. पुढे काय?
 डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – वि. का. राजवाडे यांचा सवाल -‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’
१९२६ साली पुण्यात भरलेल्या पहिल्या शारदोपासक संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषेविषयी मांडलेले हे चिंतन आजही तितकेच उचित आहे!
‘‘भाषा म्हणजे विकार-विचार-प्रदर्शनाचें जबरदस्त साधन. तिच्या उत्कर्षांपकर्षांसंबंधानें विवंचना ऊर्फ मीमांसा करणें देशांतील विचारी व्यक्तीचें कर्तव्यकर्म नाहीं असें कोण म्हणेल? मीमांसेला प्रारंभ करतांना, पहिलें भय मनापुढें उभें राहतें तें असें कीं, जिचा उत्कर्षांपकर्ष अजमावूं पाहणार, जिच्यांत ग्रंथसंपत्ति ऊर्फ विचारसंपत्ति आपण निर्मिणार किंवा निर्मिण्याची दिशा दाखविणार ती ही आपली मराठी भाषा आपले उदात्त हेतु सहन करण्याला व सफलतेस आणण्याला लायक आहे की नाहीं? उदात्त हेतु जिच्याद्वारां तडीस न्यावयाचे ती ही आपली मराठी मरणाच्या पंथास तर लागली नाहीं? आणि मरणाच्या पंथास जर लागली असेल तर त्या मढय़ाला गाडून टाकून ताबडतोब मोकळ होणें व नवीन एखाद्या देहाचा अंगीकार करून संसाराला नव्या हुरूपानें लागणें जास्त फलप्रद नाहीं काय? भय ज्या मानानें उद्वेगजनक आहे त्याच मानानें शोधनीय आहे. मराठी भाषा निखालस मरून जाऊन तिचें अगदीं मढें बनून गेलें आहे किंवा तिच्यांत अद्याप धुगधुगी उरली आहे किंवा तिच्या प्राणाला धक्का लागला नसून तिला फक्त मूच्र्छा आली आहे किंवा तिला कांहीं एक म्हणण्यासारखें दुखणें लाभलें नसून ती अन्नाभावामुळें फक्त कृश झाली आहे, किंवा मर्मस्थानीं जखमा लागून ती क्षयाच्या पंथास लागली आहे.. तुमच्याजवळ शास्त्र नाहीं. शास्त्र मिळविण्याला लागणारी तपश्चर्या करण्याची तुमची ताकद नाहीं.. तेव्हा तुम्ही, तुमचें राष्ट्र, तुमचे लोक, तुमचा समाज.. तुमची भाषा, यांनीं मृत्युपंथ धरला यांत विचित्र असें काय झालें?.. नशीब तुमचें कीं, तुम्ही अद्याप नामशेष झालां नाहीं-तुमच्या देशांतून तुमची अद्याप उचलबांगडी व्हावयाची आहे. अद्याप तुमची भाषा धुगधुगी धरून आहे. तिला पुन्हां सजीव करण्याची इच्छा अद्याप जर तुमच्यापैकीं कोणांत निरतिशय वसत असेल व त्याकरितां जर तुम्हांपैकी कोणी संमीलित झाला असाल तर तत्संबंध उपाय शोधून काढण्याच्या कामास आतां तुम्हीं निरलसपणें लागावें..’’