ज्या काळामध्ये युरोपभर फक्त लोकरच वापरात होती, अशा मध्ययुगीन काळात युरोपमधील लोकांनी भारतभेटीच्या वेळी कापूस पाहिला त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी माहिती घेतली तेव्हा त्यांना समजले की हे तंतू झाडापासून मिळतात. त्यांनी परत गेल्यानंतर युरोपातील लोकांना सांगावयास सुरुवात केली की भारतामध्ये झाडाला मेंढय़ा लागतात आणि भारतीय लोक त्यापासून लोकर मिळवितात, म्हणूनच जर्मन भाषेमध्ये कापसाला ‘वृक्षलोकर’ हा शब्द रूढ झाला. आजही तो तसाच वापरला जातो.
तलम सुती वस्त्रांच्या निर्मितीमध्ये भारतीय कारागिरांनी फार पूर्वीच अतिशय उच्च दर्जाचे कौशल्य आत्मसात केले होते. भारतीय उद्योजक व कारागीर हे जगातील इतर उद्योजकांच्या खूपच पुढे होते. भारतात तयार होणाऱ्या या वस्त्रांच्या निर्यातीचा व्यापार हा शेकडो वष्रे अरबांच्या हातात होता. वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारताच्या किनाऱ्यावर उतरला. त्यानंतर पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स व ब्रिटन येथील व्यापाऱ्यांनी भारतात येऊन कंपन्या उभ्या केल्या व या कंपन्यांमार्फत भारतातील वस्त्रे व मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात करण्यात येऊ लागली.
औद्योगिक क्रांतीपूर्वी भारतातील उद्योगांची रचना ही युरोपातील उद्योगांच्या रचनेपेक्षा वेगळी होती. मध्ययुगात युरोपातील कारागिरांनी एकत्र येऊन संघटित गट बनविलेले असत. त्यामुळे त्यांच्या उद्योगांना संरक्षण तर मिळेच परंतु त्यांचा विकास होण्यात या गटांची मदत होत असे. ते प्रशिक्षणार्थी भरती करून त्यांना प्रशिक्षण देत व हे प्रशिक्षित विद्यार्थी हा उद्योग पुढे नेत असत.
श्रीमंतांसाठीच्या चनीच्या, शौकाच्या वस्तू या शहरामध्येच बनविल्या जात असत. अशा शहरांमध्ये कुशल कारागीर एकत्र येत असत. ढाका, वाराणसी, कांचिपूरम, मदुराई, इंदूर, पठण अशी अनेक केंद्रे निर्माण झाली, जिथं उच्च प्रतीच्या व किमती वस्तू तयार केल्या जात व निर्यात केल्या जात. आजच्या निर्यातीकडे लक्ष टाकल्यास पूर्वापार चालत आलेली निर्यात आज देशातील संपूर्ण निर्यातीचा महत्त्वाचा भाग बनली आहे, हे लक्षात येईल. वस्त्रनिर्मितीमध्ये प्रादेशिक विभागणी ही त्या त्या प्रदेशातील कारागिरांच्या कलाकुसरीने पुढे प्रचलित झाली.
चं. द. काणे, इचलकरंजी, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – भोपाळच्या बेगमा
nav03पडद्याआडून सर्व व्यवहार करणाऱ्या अठराव्या -एकोणिसाव्या शतकातील मुस्लीम स्त्रियांनी भोपाळ सारख्या मोठय़ा संस्थानाचा कारभार शतकभर योग्य रितीने चालवावा ही गोष्ट आजच्या संदर्भात अविश्वनीयच म्हणावी लागेल! कुदसिया बेगमने १८१९  साली रीजंट म्हणून जबाबदारी घेतल्यावर पुढील तीन बेगमांनी इ.स. १९२६ पर्यंत हे काम चोखपणे सांभाळले.
या कुदसिया बेगमच्या चांगुलपणाबद्दल अनेक कथा-दंतकथा सांगितल्या जातात. रयतेचे कल्याण साधणे हे आपले आद्यकर्तव्य सणजणारी कुदसिया उर्फ गोहरजान सर्व जनतेचे रात्रीचे जेवण झाले आहे असा संदेश मिळाल्यावरच स्वत भोजन करीत असे, ही कथा विशेष प्रसिद्ध आहे. याच कुदसियाने भोपाळची प्रसिद्ध जामा मशीद बांधली. तिच्या दराऱ्यापुढे अन्य सरदार, नातेवाईकांचे काही चालत नसे, आपली मुलगी सिकंदर बेगम हिला राज्यकारभाराचे धडे देऊन कुदसियाने तिला राजकारणात तरबेज केले.
सिकंदर बेमनेही आपल्या आई प्रमाणेच भोपाळला चोख प्रशासन दिले. स्वत ती युद्धकलांमध्ये निपुण होती आणि युद्धात आघाडीवर रहात असे. आईप्रमाणेच बुरखा आणि पडदा रिवाज न पाळणाऱ्या नवाब सिकंदर बेगमने रस्ते, पाणी पुरवठा योजना, मोती मसजिदीचे बांधकाम इत्यादी लोककल्याणकारी योजना राबविल्या. १८५७ च्या बंडात ब्रिटिशांच्या बाजूने तिने आपली फौज उतरविली होती.  भोपाळचे सर्व राज्यकत्रे – नवाब आणि बेगमा-  भोपाळ संस्थान भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांशी निष्ठावंत राहिले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com