मध्ययुगीन काळात पॅरिस शहराचा उत्कर्ष झाला. इ.स. ९८७ मध्ये ह्य़ू कॅपे या पॅरिसच्या सरदाराने आपल्या कॅपेशियन वंशाची सत्ता स्थापन केली. कॅपेशियन वंशाची पॅरिसवरील सत्ता इ.स. ९८७ साली स्थापन होऊन १३२८ साली चार्ल्स चतुर्थ याच्या मृत्यूनंतर संपुष्टात आली. कॅपेशियन राजे जसजसे प्रबळ झाले तसा पॅरिसचाही उत्कर्ष झाला. या काळात पॅरिस हे युरोपातील सर्वात मोठे शहर होते. पॅरिसची लोकसंख्या तेराव्या शतकात झाली दोन लक्ष! याच काळात पॅरिस हे महत्त्वाची बाजारपेठ आणि व्यापारी केंद्र, सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून उदयाला आले. तेराव्या शतकात पॅरिस विद्यापीठाची स्थापना झाली. फिलिप ऑगस्टस (११८०-१२३३) या राजाच्या कारकीर्दीत पॅरिसचे सुशोभीकरण होऊन सुंदर, भव्य इमारती आणि चच्रेसचे बांधकाम झाले. त्यापकी लूव्र हा राजवाडा (ज्याचे पुढे लूव्र म्युझियम झाले) आणि पॅरिसचे प्रमुख चर्च ‘नोत्रदाम दाम ऑफ पॅरिस’ हे सध्याही सुस्थितीत आहेत. पॅरिस शहर सीन, औस, मार्न आणि येरेस या नद्यांच्या संगमानंतर बनलेल्या विशाल सीन नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे पाणी, अन्नधान्य आणि द्राक्षांचा पुरवठा मुबलक. बोटीतून व्यापार उत्तम चालल्याने शहर संपन्न झाले आणि फोफावले. आठव्या शतकापासूनच सीनच्या डाव्या किनाऱ्यावर चर्च, कॅथ्रेडल, शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ, विद्यार्थी वसतिगृहे अशा धार्मिक आणि शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. उजव्या किनाऱ्यावर बंदरे, बाजारपेठ, व्यापारी आणि इतर व्यवसाय केंद्रे आणि आइल डि ला साइट बेटावर प्रशासकीय कचेऱ्या अशी पॅरिसची ढोबळ मांडणी सध्याही टिकून आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
संरक्षण व्यवस्था : रसायनांची ढाल
नसíगक काटेरी अंगरख्याप्रमाणेच निसर्ग इतर काही क्लृप्त्या वनस्पती संरक्षणार्थ लढवतो. प्राण्यांना उपजत बुद्धी असल्याने विषारी वनस्पतींना ते स्पर्श करत नाहीत. कित्येक वनस्पतींत चीक हा सफेद किंवा पिवळसर घट्ट असा द्रव असतो. वनस्पतींना जखम झाल्यास तो जखमेतून बाहेर स्रवतो. चिकामध्ये वनस्पतींच्या दृष्टीने अनेक टाकाऊ विषद्रव्ये असतात. प्राण्याच्या त्वचेच्या संपर्कात अशी द्रव्ये आल्यास दाह होतो व सूज येते किंवा पुरळ उठते. रुई, निवडुंग, कण्हेर, अफू, पिवळा धोत्रा, पपई, शेर अशा बहुविध वनस्पतींमध्ये चीक आढळतो. प्राणी अशा वनस्पती खात नाहीत आणि त्या वनस्पती वाचतात.
काही वनस्पती कडू व अत्यंत घातक रसायने म्हणजे ‘अल्कलॉइड्स’ निर्माण करतात. अत्यल्प प्रमाणातसुद्धा ही रसायने मोठय़ा प्राण्यांनादेखील घातक ठरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर कुचल्यातील ‘स्टिकनीन’ अफूमधील ‘मार्फीन’, तंबाखूमधील ‘निकोटीन’, धोत्र्यामधील दतुरीन, तर सिंकोनामधील ‘क्वीनीन’ इत्यादी; परंतु याच रसायनांपासून आपण औषधे बनवतो.
अळू, शेवळे, सुरण, आर्वी, मनीप्लँट अशा वनस्पतींमध्ये ‘कॅल्शियम ऑक्झ्ॉलेट’ या रसायनाचे सुयांप्रमाणे दिसणारे स्फटिक मोठय़ा प्रमाणावर असतात. या वनस्पतींना खाताना जीभ व घसा यांना सुया टोचल्याप्रमाणे खाज सुटते. त्यामुळे अशा वनस्पतींचे चरणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण होते. बुद्धिमान माणसाने अळू, सुरण या भाज्यांवर चिंचेचे संस्कार करून त्यातील कॅल्शियम ऑक्झ्ॉलेटचे स्फटिक विरघळवून त्यांना खाण्यायोग्य बनवले आहे.
कडुिनब, कारली अशा काही वनस्पती कडू असून त्यामुळे प्राणी त्यांना तोंड लावीत नाहीत. तुळस वर्गातील वनस्पती, भांबुर्डा यांना तीव्र आणि उग्र वास असतो. ज्यामुळे प्राणी त्यांना टाळतात. सुरणाच्या फुलोऱ्याला अत्यंत दरुगधी येते, त्यामुळेदेखील प्राण्यांपासून अशा वनस्पती वाचतात.
काही वनस्पती निरुपयोगी किंवा टाकाऊ द्रव्ये निर्माण करतात व स्वत:च्या शरीरात साठवतात. यांत टॅनिन, रेझीन, उडनशील तेले तसेच रॅफाइड्स आणि सिलिका यांचा समावेश होतो. या रसायनांमुळे कीटक आणि प्राणी यांच्याबरोबरच बुरशीपासून वनस्पतीचेदेखील संरक्षण होते.
– डॉ. रंजन देसाई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org