रोमन पॅरिसचा राज्यकाळ ख्रिस्तपूर्व ५२ ते इ.स. ४८६ असा झाला. चौथ्या शतकात पारिसींच्या वस्तीचे नाव रोमन लोकांनी ‘पॅरिस’ केले. त्या काळात युरोपातील हूण या रानटी लोकांचे पॅरिसवर नेहमी हल्ले होत, ते लूट करीत. त्यांचा अजिंक्य आक्रमक नेता अटीला याची सर्वत्र दहशत होती. इ. स. ४५१ मध्ये अटीला आपल्या टोळीसह पॅरिसवर येतोय असे कळल्यामुळे पॅरिसची रोमन शिबंदी आणि वस्तीतले लोक आपली घरे सोडून पळण्याच्या तयारीत होते. त्या वेळी चमत्कार झाला. ख्रिश्चन साध्वी जेनिविव्हने आपल्या दैवी शक्तीने चमत्कार करून अटीलाला पॅरिसऐवजी दिशाभूल करून पूर्वेकडे दूर आल्प्स पर्वताकडे पाठविले. पॅरिसच्या वस्तीला तिने जीवदान देऊन पुढेही तिच्या आशीर्वादाने पॅरिसची भरभराट झाल्यामुळे तेव्हापासून जेनिविव्ह ही पॅरिसची ग्रामदेवता झाली. तिला पुढे संतपण मिळून ती ‘सेंट जेनिविव्ह’ झाली. पुढे पाचव्या शतकाच्या अखेरीस रोमच्या साम्राज्याचा अस्त झाल्यावर त्यांचे पॅरिसचे राज्यही संपुष्टात आले. इ.स. ४८६ मध्ये रोमन सेनाधिकारी, त्यांचे सनिक आणि इतर रोमन लोक पॅरिस सोडून रोममध्ये परतले. इथपर्यंतच्या कालखंडाला अँटिक्विटी कालखंड म्हणतात. रोमन सत्तेच्या अस्तानंतर क्लोविस या फ्रँक वंशाच्या राजाने ५०८ साली पॅरिसचा ताबा घेऊन आपल्या मेरोिवजियन घराण्याची सत्ता स्थापन केली. त्यांच्या शार्लमेन या राजाने शैक्षणिक क्षेत्रात लक्ष घालून पॅरिस हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनविले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – संरक्षण व्यवस्था : केसांची ढाल
काही वनस्पतींमध्ये विविध अवयवांवर विषारी डंख करणारी बारीक केसांसारखी लव असते. निसर्गाने या लवाची रचना एखाद्या इंजेक्शनप्रमाणे केलेली दिसते. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता या लवाचा तळभाग फुग्याप्रमाणे असून त्यात आम्ल भरलेले असते. या फुग्याच्या बाहेर डोकवणारा भाग इंजेक्शनच्या सुईसारखा कडक व तीक्ष्ण असून हलकासा स्पर्श झाल्यावर तुटतो. त्या दाबामुळे खाली असलेल्या फुग्यातील आम्ल प्राण्याच्या कातडीत टोचले जाते. त्या ठिकाणी भयंकर आग होऊन खाज सुटते.
आपल्या परिचयाचे या प्रकारचे झाड म्हणजे खाजकुईलीचा वेल. या वेलीच्या चिंचेप्रमाणे दिसणाऱ्या शेंगांवर तपकिरी रंगाची डंख करणारी लव असते. यांचा स्पर्श शरीराच्या भागाला झाला तर खाज सुटते. खाजकुईलीच्या बीजांपासून आयुर्वेदात ‘कौचापाक’ हे औषध तयार करतात. त्यांच्या डंख करणाऱ्या लवाचा उपयोग पोटांतील कृमी मारण्यासाठी करतात. कुयलीपेक्षाही जास्त खाजरी, काटेरी अशी ‘जिरारडिया’ वनस्पती सज्जनगडाच्या पायथ्याकडील पायऱ्यांच्या बाजूला वाढताना दिसते. उत्तम प्रतीचा तंतू या वनस्पतीपासून मिळू शकतो; परंतु हिच्या अत्यंत विषारी काटेरी सर्वागामुळे तिचा तंतुउद्योगांत मोठय़ा प्रमाणात वापर होऊ शकलेला नाही. अर्थात त्यामुळेच तिचे संरक्षण होत आले आहे. मुंबईच्या आसपासच्या आढळणारे आणखी एक खाजरे रोपटे म्हणजे ‘फ्लूरिया’. त्याच्या पानांना स्पर्श केल्यास डंख करणाऱ्या लवामुळे त्वचेची आग होते. महाबळेश्वरच्या जंगलात आढळणारी आणखी एक अशीच खाजरी वेल म्हणजे ‘त्राग्या’ वनस्पती. या वेलीवरील डंख करणाऱ्या लवामुळे अत्यंत आग होते. त्यामुळे प्राण्यांपासून अशा वनस्पतींचे संरक्षण होते.
निसर्गाने काही वनस्पतींना स्वसंरक्षाणार्थ ग्रंथीयुक्त लव असलेली पाने बहाल केलेली आहेत. या लवातून डिंकाप्रमाणे चिकट असा द्रव स्रवतो. एखाद्या प्राण्याने ही पाने खाल्ल्यास त्यांच्या तोंडास चिकट द्रव लागतो व तो काढता न आल्याने तो प्राणी बेचन होतो. यामुळे प्राणी अशा वनस्पतींपासून दूर राहतात. तंबाखू , पुनर्नवा, विलायती एरंड अशा वनस्पतींमध्ये ग्रंथीयुक्त पाने आढळतात.
नॅफॅलियम किंवा फुलावा ही अत्यंत केसाळ वनस्पती खाल्ली गेली तर तिचे केस घशात अडकतात म्हणून प्राणी ही वनस्पती खाण्याचे टाळतात.
डॉ. रंजन देसाई , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org