इटलीतील पिसा शहराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिथला फक्त कलता मनोरा एवढी एकच गोष्ट चर्चा करण्यासारखी नाही, असे असले तरीही पिसाच्या इतिहासात फार काही विशेष आहे असेही म्हणता येणार नाही. पिसाचा ज्ञात इतिहास अधिकतर इ.स.पूर्व १८० पासून सुरू होतो. त्या वर्षी अर्नो नदीच्या मुखाशेजारची, टायऱ्हेनियन समुद्र किनारपट्टीवरील पिसा ही वस्ती रोमन साम्राज्याची एक वसाहत म्हणून उदयाला आली. रोमनांनी या वसाहतीला नाव दिले ‘पोर्तस पिसानस’. तत्कालीन काही व्यापारी शहरांना समुद्राचे सान्निध्य नसल्यामुळे पिसाच्या बंदरातूनच मालवाहतूक चालत असे. आर्नो नदी आणि सागर किनारा हे दोन्ही पिसा शहराला लागून असल्यामुळे पिसा बंदराचे महत्त्व होते. रोमन सम्राट ऑगस्टस याने पिसा बंदराचे महत्त्व ओळखून संरक्षणासाठी बंदराचा विकास करून शहराभोवती तटबंदी बांधली. अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी पिसा हे गाव समुद्र किनाऱ्यापासून दोन कि.मी.वर होते; परंतु आर्नो नदीतून वाहत येणारा गाळ आणि रेतीमुळे समुद्र किनाऱ्यावर रेतीचा थर वाढत जाऊन सध्याचे पिसा शहर आणि समुद्र किनाऱ्यात आठ ते दहा कि.मी.चे अंतर झाले. रोमन साम्राज्यात पिसा सामील झाले त्या काळात येथील प्रमुख रहिवासी लिम्युरियन आणि एट्रस्कन वंशांचे होते. वाहते बंदर असल्यामुळे पूर्वीपासूनच पिसाकडे प्रबळ नाविक दल होते. पिसाच्या नौदलाने रोमन सम्राटाने काढलेल्या अनेक सागरी मोहिमांमध्ये मोठी मदत केली आहे. सातव्या शतकात पोप ग्रेगरी प्रथम याने बायझन्टाइन साम्राज्याविरुद्ध काही सागरी मोहिमा काढल्या. या मोहिमांमध्ये पिसाने आपली जहाजे, नौसनिक आणि खलाशी यांचा मोठा सहयोग दिला. पुढे रोमन साम्राज्याच्या पडत्या काळात, पाचव्या शतकात युरोपातील रानटी टोळ्यांनी पिसा आणि टस्कनी परगण्यांत मोठा विध्वंस केला आणि अनेक शहरांची आíथक परिस्थिती, स्थर्य कोलमडले, परंतु पिसाने मात्र आपल्या बंदराच्या जोरावर आपली आíथक परिस्थिती बऱ्यापकी स्थिर ठेवण्यात यश मिळवले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

अनारोग्यास कारण परागकण
रस्त्यांच्या दुतर्फा आणि घराभोवती आपण झाडे लावतो. त्या झाडांची उपयुक्तता आपल्याला माहीत असते, पण अनेक झाडे अशीही आहेत, की जी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असू शकतात. काही झाडे रोगाची लागण होण्यास कारण ठरतात, तर काहींमुळे शरीरावर, त्वचेवर, विशेषत: श्वासनलिकेवर परिणाम करतात.
वाऱ्याच्या मदतीने परागण होणाऱ्या झाडावर परागकण फार मोठय़ा प्रमाणावर तयार होतात. इतके की हवेत आल्यावर ते धुळी प्रदूषणाचा भाग ठरतात. हिमालयात वाढणाऱ्या ‘सिद्रस’ या झाडाचे परागकण जमिनीवर सडा घालतात.
सन १८७३ साली मँचेस्टरच्या हवेत परागकण असल्याचा शोध सर्वप्रथम ब्लाक्वेल याला लागला. साधारण त्याच सुमाराला कनिन्घामला कलकत्त्याच्या हवेत परागकण दिसले. निरनिराळ्या ऋतूंत, वेगवेगळ्या प्रकारचे परागकण हवेत तरंगत असल्याचे पाहण्यात आले. त्यांचा झाडांना येणाऱ्या फुलांच्या बहराशी संबंध असल्याचे लक्षात आले. वनस्पतिशास्त्रात एरोबायोलोजी या विषयाची सुरुवात झाली. त्याचबरोबर अस्थम्यासारख्या रोगांच्या प्रादुर्भावाची जाणीवही निर्माण झाली. रहायनायतीस, अस्थमा, अनिओदेमा अशा रोगांवर उपचार करण्यासाठी एरोबायोलोजीचा अभ्यास जरुरीचा झाला.
परागकणाच्या आतल्या भागात असलेली प्रथिने वेगळी काढून, रोगावर उपाय म्हणून अशा रोग्याच्या कातडीखाली टोचतात. टोचल्यावर रोग्याच्या कातडीवर गांधी उठल्यास, ज्या परागकणातून ते प्रथिन घेतले त्या फुलांचे परागकण आणि तो रोगी यांचा संबंध असल्याचे ठरते. रोग्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच प्रथिनाचे डोस त्या रोग्याला वाढत्या प्रमाणावर दिले जातात, ज्यामुळे त्या रोग्याची प्रतिकारशक्ती वाढते. तसे न झाल्यास त्या रोग्यास त्या झाडांना फुलांचा बहर येण्याच्या ऋतूत ते क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिला जातो.
कडुनिंब, सुरू, आकासिया आणि इतर अनेक झाडांच्या परागकणांचा बऱ्याच लोकांना त्रास होतो असे लक्षात आले आहे. म्हणून घराजवळ आणि शहरातील रस्त्याच्या बाजूला झाडे लावताना परागकणामुळे होणाऱ्या रोगाबद्दल माहिती विचारात घेणे हेही जरुरीचे आहे. काही प्रगत देशांमध्ये ज्या वनस्पतींच्या परागकणामुळे आरोग्यास धोका संभवतो. त्या वनस्पतींच्या फुलोऱ्याच्या हंगामामध्ये वेळाचे कॅलेंडर त्या वनस्पतींच्या फोटोसह प्रसिद्ध केले जाते. यामुळे अगोदर काळजी घेणे शक्य होते.
– डॉ. शरद गांगल
(अनुवाद : प्रा. शरद चाफेकर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org