पिसा शहराचे इटालीतील भौगोलिक स्थान आणि बंदरातून चालणारा व्यापार यांच्या जोरावर अनेकदा संकटांमधून पिसाचे अर्थकारण तगले आहे. सहाव्या ते नवव्या शतकांत पिसावर गोथिक, लोम्बार्ड आणि कॅरोलिंजियन अमलाखाली पिसा राहूनही बंदराच्या जोरावर पिसाने आपले महत्त्व टिकवले. दहाव्या शतकाच्या अखेरीस पिसाचा व्यापार स्पेन आणि उत्तर आफ्रिकेशी सुरू झाल्यावर परत एकदा पिसा बंदर व्यापारी आणि दलाल यांनी गजबजून गेले. १०७५ साली पिसाच्या स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांनी पाळावयाची संहिता बनवून त्यात सुसूत्रता आणली. अकराव्या आणि बाराव्या शतकाला पिसाचा सुवर्णकाळ म्हणता येईल. आसपासची लहान राज्ये घेऊन पिसाने आपला विस्तार तर केलाच, पण तिथे आपल्या बाजारपेठा आणि वसाहतीही स्थापन केल्या. या व्यापारी वसाहतींपकी अँटीऑक, ट्रिपोली आणि टय़ुनिस या पुढे जागतिक बाजारपेठा म्हणून प्रसिद्धीस आल्या. पहिल्या धर्मयुद्धात (क्रुसेड), १०९९ मध्ये पिसा प्रशासनाने व्हॅटिकनला आपली लढाऊ जहाजे आणि खलाशी पुरवून भरघोस मदत केली. या युद्धात पिसाने आपल्या १२० गॅलीज म्हणजे मोठय़ा लढाऊ युद्धनौका पुरविल्या. बाराव्या शतकात पिसाचे प्रसिद्ध कॅथ्रेडल, बाप्टिस्ट्री आणि बेलटॉवर बांधले गेले.
हा बेलटॉवर बांधत असताना एका बाजूला कलला आणि पुढे स्थापत्य शास्त्रातले एक आश्चर्य बनून राहिला. बाराव्या आणि तेराव्या शतकात पिसा हे टस्कनी प्रांतातले सर्वाधिक सामथ्र्यवान शहर बनले. या काळात पिसा आणि त्याचे व्यापारी स्पर्धक जिनोआ, फ्लोरेन्स यांच्यात संघर्ष होत राहिले. पोप आणि सम्राट यांच्यातही या काळात सत्तेसाठी रस्सीखेच चालू होती. इटालीतील संपन्न शहरे आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न पोप आणि सम्राट दोघेही करीत होते. पिसाने सम्राटाची बाजू लावून धरली तर फ्लोरेन्स, जिनोआ आणि लुक्का यांनी पोपची. बाराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पिसा आणि सम्राटाची सरशी होती; परंतु तेराव्या शतकाच्या मध्यापासूनच पोपचे प्राबल्य वाढले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

प्रा. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६)
प्रा. डेव्हिड सेन यांचे शिक्षण आग्रा विद्यापीठात झाले. भारत सरकारची स्कॉलरशिप मिळवून ते (त्या वेळच्या) झेकोस्लोवाकियातील प्राग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी गेले. त्या विद्यापीठाने बियांवरील संशोधन कार्याबद्दल डी.एस्सी. देऊन त्यांना गौरवले. भारतात परतल्यावर ते १९६३ मध्ये जोधपूर विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि सन १९९३ मध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले.
प्रा. सेन यांचे रूक्ष-रखरखीत प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पतींवरील संशोधन जगन्मान्य आहे. या वनस्पतीच्या बिया, त्यांचे आकार, उच्च तापमानात टिकून राहण्याची आणि रुजण्याची क्षमता, रोपटय़ांची वाढ आणि उष्णतेमध्ये टिकण्याची चिकाटी, यांवरचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. या कामासाठी यू.जी.सी., सी.एस.आय.आर., डी.एस.टी., डी.ओ.एन. यांच्याकडून त्यांना अनुदान मिळाले. संशोधनावर आधारित कार्य करताना त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. १३ पुस्तके आणि ३२४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. पश्चिम राजस्थानची पारिस्थितिकी यावर त्यांचे प्रभुत्व सर्वमान्य असून, त्या प्रदेशाचे वनीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग असे.
स्वत:च्या संशोधनाबरोबर तरुण संशोधकांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. सेन यांनी १९७४ मध्ये ‘जिओबायोस’ हे जर्नल सुरू केले. अतिशय नियमितपणे प्रसिद्ध होणारे जर्नल असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साहित होऊन त्यांनी १९८१ मध्ये ‘इंडिअन रिव्हू ऑफ लाइफ सायन्सेस’ हे वार्षकि जर्नल आणि नंतर १९८२ मध्ये ‘जिओबिओस न्यू रिपोर्ट्स’ सुरू केले. त्यांचा कामाचा धडाका अपूर्व होता.
प्रा. सेन इंडिअन बोटॅनिकल सोसायटी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एकोलोजी व एरिड झोन रीसर्च असोसिएशनचे फेलो होते आणि वीड आयडेंटिफिकेशन व टर्मिनॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. ऑस्ट्रियातील आंतरराष्ट्रीय मुळे संशोधन समूहाचे ते सदस्य होते.
प्रा. सेन यांना िहदी, उर्दू, इंग्लिश, जर्मन, झेक या भाषा अवगत होत्या. युरोपमधील बहुतेक सर्व देशांत ते कामानिमित्त फिरले होते.
कार्यात आणि कुटुंबात उत्साही असलेल्या या प्राध्यापकाचे २०१६ सालाच्या सुरुवातीला निधन झाले.
– प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org