23 March 2017

News Flash

कुतूहल – शेतीसाठी रोपवाटिका कशी करता येईल

आधी रोपवाटिकेत रोपे तयार करून मग ती शेतात लावणे ही पद्धती सध्या केवळ काही

मुंबई : नवनीत - [email protected] | January 12, 2013 12:01 PM

आधी रोपवाटिकेत रोपे तयार करून मग ती शेतात लावणे ही पद्धती सध्या केवळ काही भाज्या आणि भात या पिकांमध्येच अवलंबिली जाते, पण इतरही अनेक पिकांमध्ये शेतात बी पेरण्याऐवजी रोपे लावून शेती करणे फायद्याचे ठरते. पश्चिम महाराष्ट्रात जुल-ऑगस्ट ही ऊस लावण्याची सर्वोत्तम वेळ, पण अनेक शेतकऱ्यांना ही वेळ साधता येत नाही आणि त्यांचा ऊस लागतो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. लागण उशिरा झाल्याने उत्पन्न कमी येते. आमच्या अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलजी इन्स्टिटय़ूट या संस्थेने यासाठी उसाची रोपवाटिका हा एक नवा धंदा महाराष्ट्रात सुरू केला. जुल-ऑगस्टमध्ये रोपवाटिकेत उसाचे डोळे लावून तयार केलेली रोपे जर ऑक्टोबर-नोव्हेंबरात शेतात लावली, तर उसाच्या उत्पन्नात अजिबात घट येत नाही. सध्या सुमारे ५०० ग्रामीण उद्योजक उसाची रोपे तयार करून ती विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. विदर्भात पावसाळा सुरू व्हायला जुल महिना उजाडतो. त्यामुळे कपाशीची पेरणी होईपर्यंत जुल महिना संपत येतो आणि पुढे १५ सप्टेंबरला पावसाळाच संपतो. त्यामुळे शेतात बी पेरून केलेल्या कपाशी पिकाची वाढ कमी होते आणि उत्पन्नही कमी येते. जर रोपवाटिकेत जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये बी लावून रोपे तयार केली आणि पावसाळा सुरू झाल्यावर ती शेतात लावली तर जुलमध्ये पेरणी केलेल्या पिकाच्या दुप्पट उत्पन्न येते. बाजारी पिकाचीही रोपे पावसाळ्याआगोदर तयार करून ती पावसाळा सुरू झाल्यावर शेतात लावली तर दुप्पट उत्पन्न येते असा अनुभव आहे. शेतात थेट बी न पेरता रोपवाटिकेत रोपे तयार करून ती रोपेच शेतात लावावयाची हा विचार नवा आहे. या तंत्राचा उपयोग कसा करावयाचा हे त्या त्या ठिकाणच्या कृषितज्ज्ञांनी प्रयोग करून ठरवावयाचे आहे. उदाहरणार्थ कोकणात भात निघाल्यावर त्याच शेतात किलगड किंवा वालाचे पीक घेतले जाते. जर आपण काढल्या काढल्याच वरील पिकांची रोपे शेतात लावली तर त्यांपासून अधिक उत्पन्न मिळेल का? योग्य त्या प्रयोगांनंतरच अशा प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
डॉ. आनंद कर्वे, पुणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  [email protected]

वॉर अँड पीस                
आव-आमांश – जुलाब  (उपाय)
भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षांपासून आपली सर्वात पवित्र नदी गंगानदी ही अलीकडेच खूप दूषित झालेली आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या मागे आपण पाहत गेलो तर आपल्यासारख्या वाचकांच्या लक्षात असे येईल की हजारो वर्षे, अब्जावधी प्रेते या नदीतून वाहत आली. तरी या गंगा नदीचे ‘गंगाजल’ पवित्रच राहिले व त्यामुळेच शेकडो वर्षे भारतभर लोक गंगाजल श्रद्धापूर्वक पित आले. इतकी वर्षे या गंगाजलाची विशुद्धता कुठून आली? ही महान पवित्र नदी आपल्या उगम प्रदेशापासून खूप चुनखडी असलेल्या प्रदेशातून प्रथम प्रवास करते. त्यामुळे चुनखडी संस्कारित गंगेचे पाणी हजारो वर्षे शुद्ध राहिलेले आहे. ज्यांना खात्रीचे शुद्ध पाणी प्यावयाचे आहे, त्यांनी दहा ग्रॅम चुनखडी एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी ते पाणी टिपकागद, फिल्टरपेपर किंवा स्वच्छ फडक्याने गाळून घ्यावे. २०० मि.लि.च्या पाच बाटल्या भराव्या. पिण्याकरिता वापराव्यात. असे ‘सुधाजल’ – लाईम वॉटर अत्यंत सुरक्षित पाणी!
नुसते पाणी सुरक्षित असून आव ही समस्या संपत नाही. ‘कुटजारिष्ट’ वा संजीवनी वटी घेऊन जुलाब थांबू शकतात-  पण मूळ समस्या आव अजिबात निर्माण होऊ नये; संडास चिकट होऊ नये या प्रश्नाला उत्तर काय? त्याकरिता आयुर्वेदात ‘फलत्रिकादि काढा’ व ‘आरोग्यवर्धिनी’ ही दोन ‘टॉप’ औषधे आहेत. भोजनोत्तर फलत्रिकादि काढा चार चमचे दोन वेळा व त्यासोबत ‘अम्लपित्त वटी’ तीन गोळ्या बारीक करून घ्याव्या. दोन्ही जेवणाअगोदर तीन-चार तास आरोग्यवर्धिनी तीन गोळ्या बारीक करून कटाक्षाने सुंठ चूर्णाबरोबर घ्याव्या. सकाळचा आरोग्यवर्धिनीचा डोस नाष्टापाणी करून घ्यावा. सायंकाळी ६ वाजता जेवणाअगोदर तीन तास घ्यावा. सुंठ चूर्ण कदापी विसरू नये. झोपताना त्रिफळा चूर्ण हे परम रसायन औषध घ्यावे. झोपण्यापूर्वी किमान अर्धातास फिरून यावे, हे मी सांगावयाची गरज आहे का?
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      
तटबंदीपलीकडचे  ‘देवाचे घर’..
साताऱ्यातच एकदा संध्याकाळी मी मनसोक्त हुंदडून घरी परतलो तर रेडिओसमोर बसलेले आणि हुंदके देत रडणारे आई-वडील दिसले. हा प्रसंग मला हबकवणारा होता. तारीख होती ३० जानेवारी १९४८. आई-वडिलांनी मला जवळ घेतले आणि आई म्हणाली, ‘गांधी गेले.’ गांधी माहीत होते. ते भारताचे पुढारी आहेत, हे ठाऊक होते. ‘ते गेले,’ हे वाक्य मात्र फार अर्थपूर्ण होते, हे नंतर लक्षात यायचे होते. हत्या, खून, वध हे शब्द मी फार नंतर वाचले आणि लक्षात घेतले. घटनेचा अर्थ शब्द ठरवतात आणि शब्द जपून वापरावेत हे ज्ञानेश्वरांनी शिकविले.
कृष्णमूर्ती नावाचे तत्त्वज्ञानी म्हणतात तसे माझे मन ‘रिकामे आणि रिते’ होते, तरीही मी भारतीय- हिंदू- मराठी- कोकणस्थ ब्राह्मण- पुरुष आहे ही भूमिका हळूहळू मनात गोठली.. पुढे ज्ञानेश्वरी वाचनात ती हळूहळू वितळली; पण वंगण चिकटावे तशी अजून का शाबूत आहे ? अर्थात कृष्णमूर्ती काहीही म्हणोत, प्रत्येकाच्या मनात काही तरी भोज्जा असतोच. त्याच्यावरच आयुष्याचा खो-खो खेळला जातो आणि हे सत्य जगात जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या बाबतीत खरे असते.
वर्ण आणि धर्म आपल्या पाचवीला पुरलेले असतात, त्याचा असर कमी करणे एवढेच आपल्या हातात असते. अतिशिक्षित पुढारलेल्या समृद्ध देशांतही ही व्यथा मतदारांच्या मनात लुकलुकत असते आणि त्यावरून कोण निवडला जातो, हे ठरते. ओबामांच्या निवडीनंतर अमेरिकेत काळा अध्यक्ष निवडून आला आहे असे म्हटले गेले. कारण लोकांना असे वाटले की, आपल्या मनात ज्या भूमिकांची आपण तटबंदी तयार केली आहे त्याला हा माणूस धक्का लावणार नाही. एवढाच त्याचा अर्थ आहे. ‘गांधी गेले’ हे वाक्य वापरून माझ्या आईने मला पुढे ग्रासणारा कलुषितपणा थोडा लांबवला, हे मात्र खरे. ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या ओवीत गणपतीच्या दाताला संवादाची उपमा देत तो समताशुभ्रवर्ण आहे, असे त्याचे वर्णन केले आहे. उगाचच रंग न भरता जो संवाद केला जातो तो सम आणि शुभ्रवर्ण असतो, असे त्यांना सुचवाचे होते. या घटनेनंतर काही दिवसांनी मावशी अचानक घरी राहायला आली. ती म्हणाली, ‘‘तुझ्या आईला बाळ होणार आहे म्हणून मी मदत करायला आले आहे. आज रात्री बहुतेक होईल.’’ मी मोठय़ा खुषीत झोपलो. सकाळी उठलो तर मावशी रडत होती. मला म्हणाली, ‘‘तुला बहीण झाली होती, पण ती मुळी जिवंतच नव्हती म्हणून तिला देवाला परत केली.’’
 देव नावाच्या गोष्टीची ही पहिली ओळख. गेलेले गांधी आणि माझी बहीण दोघे एके ठिकाणीच गेले असणार, ही खूणगाठ मनाशी बांधल्याचे आठवते; पण देव या कल्पनेने मात्र मी आजतागायत हवालदिल आहे. पुढे आयुष्यात अगदी जवळच्यांचे अघटित अनैसर्गिक मृत्यू मला सोसावे लागणार होते, हे मात्र तेव्हा ठाऊक नव्हते.
रविन मायदेव थत्ते  
[email protected]

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
१२ जानेवारी
१९०६ >  भारतीय संस्कृती कोशाचे संपादक, लेखक पं. महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. शिक्षण आणि संस्कृती यांच्या प्रसाराला वाहून घेतलेल्या जोशी यांनी ‘चैतन्य’ हे मराठी मासिक गोव्यातून चालविले. दहा कथासंग्रह तसेच अनेक माहितीपर पुस्तके त्यांनी लिहिली. बहुकेंद्री भारतीय संस्कृतीच्या अंगोपांगांची माहिती देणारा दहा खंडांचा ‘संस्कृतिकोश’ त्यांचे बुद्धिकर्तृत्व सिद्ध करणारा ठरला. १९९२ च्या डिसेंबरात त्यांचे निधन झाले.  
१९११ >  ‘हिंदुधर्मशास्त्र’ या ग्रंथाचे कर्ते विष्णू कृष्ण भाटवडेकर यांचे निधन.
१९३७ >  ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या संस्थापक- संपादक विद्या बाळ यांचा जन्म. ‘कमलाकी’, ‘अपराजितांचे निश्वास’, ‘तुमच्या माझ्यासाठी’, ‘शोध स्वत:चा’  अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
१९४८ >  ‘डाव जिंकला’, ‘कान्होपात्रा’ आदी नाटकांचे लेखक, १९४३सालच्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘अयोध्येचा राजा’ (१९१२) या बोलपटाचे संवादलेखक नारायण विनायक कुलकर्णी ऊर्फ गोविंदानुज यांचे निधन. १८९२ साली जन्मलेल्या गोविंदानुजांनी काव्यलेखनही केले.
– संजय वझरेकर

First Published on January 12, 2013 12:01 pm

Web Title: plantation of farming