अँग्लो-नॉर्मन्स या नार्वेजियन व्हायकिंग्जनी लंडन राजधानी ठेवून इंग्लंडवर इ.स. १०६६ ते ११५४ या काळात राज्य केले. विल्यम, हेन्री प्रथम आणि स्टीफन असे त्यांचे तीन राजे होऊन गेले. अँग्लो नॉर्मन्सनंतर लंडनवर प्लाँटाजेनट्स, लँकेस्टर, यॉर्क, टय़ुडर, स्टुअर्ट्स, हॅनोव्हर, विडसर अशा वंशांच्या राज्यकर्त्यांचा अंमल झाला. विंडसर घराण्याची राणी एलिझाबेथ द्वितीय ही सध्या राणी पदावर असून लंडन व इंग्लंडवरची ती चोपन्नावी राज्यकर्ती आहे. युरोपातील बरीचशी राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे प्रथम लंडनमध्ये घडली. सातव्या शतकात लंडनमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रवेश झाल्यावर नवीन संस्कृती, नवी जीवनशैली उदयाला आली.
याच शतकात लंडनचा व्यापार वाढून संपन्नता आली. या काळात लंडनचे दोन भाग बनले. सिटी हा भाग पूर्वेकडील तटबंदीच्या आत बंदिस्त असलेला, तर पश्चिमेकडे, राजकारणाचे केंद्र असलेला वेस्टमिन्स्टर. पुढे लंडनमध्ये व्यापाऱ्यांचे संघ म्हणजे गिल्ड्ज स्थापन झाले. वस्तू घडविणाऱ्या कारागिरांचे ‘क्राफ्ट गिल्ड्’ आणि त्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे ‘ट्रेड गिल्ड्’. या गिल्डच्या सदस्यांनाच केवळ वस्तू निर्माण करणे आणि विकण्याचा अधिकार होता. कुशल कारागिरीचे प्रमाण म्हणून त्या गिल्डचा शिक्का म्हणजे ‘हॉलमार्क’ त्या वस्तूवर उठवला जाई. असे शंभराहून अधिक गिल्ड्स तयार झाले. गुणवत्ता आणि व्यापारी व्यावसायिकता यांच्या जोरावर लंडनचा व्यापार पुढे जगभर पसरला. लंडनमध्ये ज्या वस्तू जिथं विकल्या जात त्या भागाला ती नावं पडली. जशी मिल्क स्ट्रीट, पुडिंगलेन, गाíलक हिल इत्यादी.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

वनस्पतींचे संकलन आणि संवर्धन
आपला देश जसा सांस्कृतिक विविधतेने ओळखला जातो तसाच तो जैविक विविधतेसाठीसुद्धा ओळखला जातो. जेव्हा जेव्हा आपण जैविक विविधतेबद्दल बोलतो तेव्हा बहुतांश वेळा फक्त पशू-पक्षी, कीटक यांच्याबद्दल जास्त चर्चा होते. वनस्पतींना या यादीत नेहमीच शेवटचे स्थान मिळते. वनस्पती या निसर्गाचा भक्कम पाया असून इतर सजीव त्यावर अवलंबून आहेत हे सोयीस्कररीत्या आपण विसरलो. सद्य:स्थितीत अंदाजे ज्या १५००० वनस्पतींची ओळख जगाला पटलेली आहे त्यापकी फक्त ४०० ते ५०० वनस्पती आपण अन्न म्हणून वापरतो. कालांतराने वेगवेगळ्या कारणांमुळे या वनस्पतींचा साठा नक्कीच कमी होणार. त्यासाठी आज त्या वनस्पतींची नोंद होणे आवश्यक आहे. त्यांची उपलब्धता किती आहे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्या कोठे सापडतात, त्याची उपलब्धता किती आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. हे काम भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग करते.
१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० ते १९५२ च्या दरम्यान या संस्थेची पुनर्रचना झाली तेव्हापासून ही संस्था भारतातील वनस्पतींचे संकलन व त्यांच्या नोंदी करीत आहेत. मात्र हे काम अद्याप अपूर्ण आहे. मुख्यत: वनस्पतींची ओळख पटवणे, त्यांचे वर्गीकरण करून नोंदी ठेवणे यासाठी वनस्पतींचे नमुने गोळा केले जातात व त्यांचे संवर्धन केले जाते. भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट आणि देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांत वनस्पती विभाग हे नमुने (हब्रेरियम) वनस्पतिसंग्रहालयात जतन करतात. कोलकाता येथे भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्य हब्रेरियम आहे. भारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पतींची नोंद हा विभाग ठेवतो. मुंबईत सेंट झेविअर्स महाविद्यालय येथील ब्लाटर हब्रेरियम तसेच पुणे येथील भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे हब्रेरियम महाराष्ट्रातील वनस्पतींचे नमुने जतन करतात. याव्यतिरिक्त वनौषधींचा उपयोग करणाऱ्या व्यक्ती आणि राज्याचा वनविभागही वनस्पतींचे संकलन करतात. या अगोदरच्या प्रा. लट्ट यांच्या लेखात आपण वनस्पतींचे वेगेवेगळे प्रकार पाहिलेत, यापकी सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती या प्रत्येक प्रकारच्या वनस्पतींच्या संकलनाच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.

डॉ. राजेंद्र शिंदे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org